‘त्या’ शिक्षकांना जि.प. सदस्यांचा पाठिंबा; वेतनश्रेणी बंद करण्यास विरो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 02:01 AM2020-02-03T02:01:27+5:302020-02-03T02:01:31+5:30
फसवणूक केलेल्या शिक्षकांना शिक्षण समितीचे अभय
ठाणे : ऑनलाइन बदल्यांद्वारे संवर्ग-२ द्वारे सोयीची शाळा मिळवण्यासाठी शाळेच्या अंतराची चुकीची व खोटी माहिती देऊन जिल्ह्यातील ६४ शिक्षकांनी प्रशासनाची फसवणूक केली. याचे गांभीर्य लक्षात घेऊन शिक्षण विभागाने धडक कारवाई करून त्यांची एक वेतनश्रेणी कायमची बंद केली. मात्र, शुक्रवारी पार पडलेल्या शिक्षण समितीच्या बैठकीत ठाणे जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी ठराव घेऊन या कारवाईला विरोध दर्शविला.
‘फसवणूक करणाºया ६४ शिक्षकांची एक वेतनश्रेणी कायमची स्थगित’ या मथळ्याखाली लोकमतने २८ जानेवारी रोजी वृत्त प्रसिद्ध करून बदल्यांमधील हा घोळ उघडकीस केला. यामुळे शिक्षकवर्गात एकच खळबळ उडाली. त्यांनी तत्काळ जिल्हा परिषदेच्या सदस्यांचे दरवाजे ठोठावले. यानुसार, शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा दीपाली पाटील, उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षण समितीची बैठक शुक्रवारी पार पडली. त्यात शिक्षकांची वेतनश्रेणी स्थगित केल्याच्या विषयावर सदस्यांनी जोरदार चर्चा करून शिक्षणाधिकारी संगीता भागवत यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला.
मात्र, राज्य शासनाच्या अध्यादेशास अनुसरून ही कारवाई झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बदल्यांसाठी शिक्षकांना मार्गदर्शन केलेले नाही. तरी पण दोन ते तीन किलोमीटरचे अंतर जादा दाखवणाºया शिक्षकांवरील कारवाई रद्द करावी, यासाठी सर्व सदस्यांनी एकमताने ठराव घेऊन शासनास पाठवण्याचे निश्चित केले, असे शिक्षण समिती सदस्य सुभाष घरत यांनी निदर्शनात आणून दिले.
ठरावाची अंमलबजावणी झाल्यास शिक्षक सुटण्याची शक्यता
मुख्यालयापासून ३० किमीचे अंतर ग्राह्य धरून पतीपत्नी एकत्रीकरणाच्या सवलतीखाली शिक्षकांनी सोयीच्या शाळेवर बदली घेतली. यासाठी त्यांनी रेल्वेचे अंतर या बदलीसाठी वापरले. मात्र, प्रशासनाच्या नियमानुसार गुगल मॅपनुसार शाळेचे अंतर निश्चित करणे अपेक्षित आहे.
गुगल मॅपचा निकष न वापरल्यामुळे या शिक्षकांनी बदलीसाठी दिलेले अंतर चुकीचे असून त्यांनी दिलेली माहिती खोटी असल्याचे ग्राह्य धरून प्रशासनाने तब्बल ६४ शिक्षकांची एक वेतनश्रेणी कायमची बंद केली आहे. या शिक्षेमुळे या शिक्षकांचे मोठे नुकसान होणार आहे.
च्शिक्षेतून स्वत:ची सुटका करण्यासाठी शिक्षकांनी जिल्हा परिषदेच्या सदस्यांकडे धाव घेऊन शिक्षण समितीच्या बैठकीत कारवाईविरोधात ठराव घेतला. या ठरावानुसार कारवाई मागे घेतल्यास बहुतांशी सर्वच शिक्षक यातून सहीसलामत सुटण्याची शक्यता आहे.
दाखल्यांची फेरतपासणी सुरू
पतीपत्नी एकत्रीकरणाच्या सवलतीचा लाभ घेतलेल्या व कारवाईस पात्र ठरलेल्या ६४ शिक्षकांसह वैद्यकीय दाखले देऊन सोयीची बदली घेतलेल्यांमध्ये बहुतांश शिक्षकांनी बनावट दाखले दिल्याचे सांगितले जाते. त्यानुसार १५३ शिक्षकांच्या दाखल्यांची फेरतपासणी सुरू आहे. त्यांच्यावरही कारवाईची टांगती तलवार आहे. कारवाईस पात्र ठरलेल्या शिक्षकांची बदलीच रद्द करून त्यांना पूर्वीच्या शाळेवर पाठवण्याच्या मागणीसाठी शिक्षकांचा एक गट जिल्ह्यात सक्रिय होत आहे. यामुळे शिक्षण समितीच्या ठरावाचादेखील फज्जा उडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
न्यायालयात दाद मागण्याच्या तयारीत
या शिक्षकांची वेतनश्रेणी स्थगित केली, तरी त्यांचे फारसे नुकसान होत नाही. त्यांना मिळणाºया वेतनामध्ये शहरी भागाच्या भत्त्याची मोठी वाढ झालेली आहे. या रकमेचा मोठा लाभ या शिक्षकांना होत आहे. तरीही, कायदेशीर कारवाई स्थगित केल्यास त्याविरोधात शिक्षक न्यायालयात जाऊन दाद मागण्याच्या प्रयत्नात आहे. यासाठी काही शिक्षकांनी एकत्र येऊन केवळ वेतनश्रेणी स्थगित न करता त्यांना पूर्वीच्या शाळेवर पाठवण्याची चर्चा सुरू झाली आहे.