तांबडमाळ येथे जि.प. शाळा झोपडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 02:27 AM2017-08-05T02:27:53+5:302017-08-05T02:27:53+5:30
शहापूर नगरपंचायतीच्या हद्दीतील तांबडमाळ येथील जिल्हा परिषदेची शाळा चक्क एका कुडाने विणलेल्या झोपडीत भरत असून येथे पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग आहेत.
किन्हवली : शहापूर नगरपंचायतीच्या हद्दीतील तांबडमाळ येथील जिल्हा परिषदेची शाळा चक्क एका कुडाने विणलेल्या झोपडीत भरत असून येथे पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग आहेत. आधीच झोपडीत भरणाºया या शाळेला पावसाळ्यात चक्क गळती लागते. विशेष म्हणजे, शहापुरातील सगळ्या शाळा या डिजिटल करण्यात आल्याची घोषणा प्रशासनाने मागेच केली आहे.
शहापूर हा अतिदुर्गम आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यातील शाळा डिजिटल झाल्याचा खूप गाजावाजा शिक्षण विभागाने केला. मात्र, शहापूर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेली जिल्हा परिषदेची ही शाळा एका कुडाच्या झोपडीत भरते, ही अत्यंत खेदाची गोष्ट असून तालुक्यातील पुढाºयांना याचे काहीच सोयरसुतक नसल्याचे दिसते.
तांबडमाळ येथील या शाळेत दोन शिक्षिका शिकवतात. वर्षा सोनावणे आणि सारिका शेळके अशी या शिक्षिकांची नावे असून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्या हे शिकवण्याचे काम करत आहेत.
या शाळेच्या जवळच वनविभागाची जागा असून शाळेसाठी काही गुंठे देण्याचे प्रयत्न येथील वनपरिक्षेत्रपाल कोकरे करत आहेत. तसेच नगराध्यक्षा योगिता धानके यांनीदेखील नवीन इमारतीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. प्रशासनाने लवकर दखल घेण्याची मागणी होत आहे.