जि.प. शाळांत मानधनतत्त्वावर शिक्षक - पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2019 12:11 AM2019-06-09T00:11:05+5:302019-06-09T00:11:32+5:30
जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची शुक्र वारी सभा झाली. अध्यक्षस्थानी पवार होते.
ठाणे : दुर्गम भागातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नये, म्हणून जिल्हा परिषदेच्या कमी शिक्षक असलेल्या प्राथमिक शाळांमध्ये मानधनतत्त्वावर शिक्षकांची तात्पुरती नियुक्ती करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची शुक्र वारी सभा झाली. अध्यक्षस्थानी पवार होते. जिल्हा परिषदेच्या काही शाळांमध्ये शिक्षकांची संख्या अपुरी आहे. जिल्हा परिषदेकडेही पुरेशा संख्येने शिक्षक नाहीत. त्यामुळे प्रत्येक शाळेमध्ये शिक्षकांची नियुक्ती करण्यास मर्यादा येतात. जिल्ह्यातील काही शाळांमध्ये एका शिक्षकावर चार वर्गांची जबाबदारी असल्यामुळे मुलांना योग्य पद्धतीने शिक्षण मिळत नाही. या पार्श्वभूमीवर जि.प.ने अपुऱ्या शिक्षक असलेल्या शाळांत मानधनतत्त्वावर शिक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. १० महिन्यांसाठी त्यांची नियुक्ती केली जाणार असून, त्यांना मासिक सहा हजार रुपये दिले जातील, असे ते म्हणाले.