एबीएल घोटाळ्याविरोधात जि.प.त गोंधळ; चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 12:24 AM2019-09-10T00:24:53+5:302019-09-10T00:25:19+5:30
सर्वसाधारण सभेत सदस्यांनी प्रशासनास धरले धारेवर
ठाणे : दुर्गम भागातील आरोग्य केंद्रांमध्ये आदिवासी, ग्रामीण रुग्ण औषधींपासून वंचित आहेत. शाळांसाठी खरेदी केलेले दोन कोटींचे डिजिटल साहित्यखरेदीतील भ्रष्टाचार आणि एबीएलच्या नावाखाली झालेला सहा कोटींच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी सोमवारी सर्वसाधारण सभेत एकच गोंधळ करून प्रशासनास चांगलेच धारेवर धरले.
नवनिर्वाचित अध्यक्षा दीपाली पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात घेण्यात आली. यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष सुभाष पवार, सर्व विषय समित्यांचे सभापती, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.बी. नेमाणे आदींसह अधिकारीवर्ग उपस्थित होता. अध्यक्षाऐवजी सर्व सदस्यांच्या प्रश्नास पवार यांनीच उत्तरे देऊन सभागृह चालवले.
दोन वर्षांपासून लॅपटॉप वापराविना पडून : लॅपटॉप देऊन दोन वर्षे झाली. मात्र, अजूनही सॉफ्टवेअर देण्यात आले नाही. यामुळे ते वापराविना पडून असल्याच्या तक्रारींसह सदस्यांना अजूनही लेटरहेड छापून देण्यात आलेले नाही. काही सदस्यांनी स्वखर्चाने लेटरहेड छापलेले आहेत. त्यांचे बिल जिल्हा परिषदेने अदा करावे आदी विषयही यावेळी सदस्यांनी चर्चेत आणून प्रशासनास जाब विचारला. जिल्हा परिषदेचे सदस्य सुचवत असलेली कामे बांधकाम विभाग करीत नाही. मात्र, ठेकेदारांनी सुचवलेली कामे घेतली जातात. ठेकेदारांची मर्जी जिल्हा परिषद का सांभाळत आहे, असा आरोपही काही महिला सदस्यांनी केला. जि.प.ची मालमत्ता ताब्यात घेण्याच्या विषयावरदेखील यावेळी गंभीर चर्चा झाली. एक कोटीचे काम घेण्याची क्षमता असलेल्या ठेकेदारास तीन कोटींचे काम दिल्याची मनमानी बांधकाम विभागाने केल्याचेदेखील यावेळी उघड करण्यात आले.
दोन महिन्यांत रस्ता गेला वाहून
कामाचा दर्जा उत्तम नसल्यामुळे लेनाड-नेहरोळी रस्ता दोन महिन्यांत वाहून गेल्याचे सभागृहाच्या निदर्शनात आणून दिले. या रस्त्याचे काम अपूर्ण असतानाच बिल काढल्याचेही यावेळी सांगण्यात आले. जीओसह अन्यही काही कंपन्यांच्या केबल जिल्हा परिषदेच्या रस्त्यांवरून टाकण्यास यावेळी सदस्यांनी विरोध दर्शविला आहे.
खर्डीच्या इंटरनॅशनल स्कूलला गळती
शहापूर तालुक्यातील १२० शाळांचे प्रस्ताव मंजूर न करताच परत पाठवून शहापूरवर हेतुपुरस्सर अन्याय केला जात असल्याचा आरोपही यावेळी झाला. खर्डी ही शाळा राज्यभरात इंटरनॅशनल स्कूल म्हणून प्रसिद्ध आहे. पण ती गळत असल्यामुळे विद्यार्थ्यांना बसण्यासाठीदेखील जागा उपलब्ध नसल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली.
जनावरांसाठी आर्थिक मदत द्या
पुराच्या कालावधीत शेतकऱ्यांची जनावरे वाहून गेली आहेत. पशुसंवर्धन विभागाकडे अधिक निधी देऊन त्यांच्या मालकांना आर्थिक मदत करण्याच्या विषयावर ही चर्चा झाली. पाणीपुरवठा योजनांवरदेखील सदस्यांनी प्रशासनास धारेवर धरले.
रुग्णवाहिका नसल्याने बाळाचा गर्भातच मृत्यू
सदस्य अशोक घरत यांनी भिवंडी तालुक्यातील चिंबीपाडा आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका नसल्यामुळे गर्भातच बाळांचा मृत्यू झाल्याची गंभीर बाब सभागृहात उघडकीस आणली. तीन महिन्यांत तीन वेळा पत्र देऊन अद्यापही औषधे प्राप्त झाली नसल्याचे संबंधित डॉक्टरांनी सांगितल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. तर, जिल्ह्यातील कोणत्याही आरोग्य केंद्रात सायंकाळनंतर डॉक्टर, कर्मचारीच नसतो. रात्री या आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टर उपलब्ध असलेच पाहिजे, असा ठराव घेऊन डॉक्टर उपलब्धच नसतात, असा आरोप सुभाष घरत व उल्हास बांगर यांनी केला.