एक तारखेला वेतन मिळविण्यासाठी जि.प. कर्मचाऱ्यांचे आत्मक्लेश उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:44 AM2021-09-27T04:44:11+5:302021-09-27T04:44:11+5:30
ठाणे : येथील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना वेतन व निवृत्तिवेतन दरमहा एक तारखेस मिळावे, यासाठी २ ऑक्टोबर म्हणजे महात्मा गांधी ...
ठाणे : येथील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना वेतन व निवृत्तिवेतन दरमहा एक तारखेस मिळावे, यासाठी २ ऑक्टोबर म्हणजे महात्मा गांधी जयंती दिनी येथील कर्मचारी मंत्रालयाजवळील महात्मा गांधी पुतळ्याजवळ एक दिवसाचे आत्मक्लेश-लाक्षणिक उपोषण राज्यस्तरीय आंदोलन छेडणार आहेत.
राज्यातील जिल्हा परिषदेचे कर्मचारी व निवृत्त कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शासनाकडून अनुदान वेळेवर दिले जात नाही. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून दरमहा १ तारखेस वेतन दिले जात नाही, असा या कर्मचाऱ्यांचा आरोप आहे; मात्र शासकीय निवृत्तिवेतनधारकांना व कर्मचाऱ्यांना दरमहा एक तारखेस निवृत्तिवेतन व वेतन देण्याचा भेदभाव राज्य शासनाकडून केला जात आहे. यामुळे संतापलेल्या या जि. प. कर्मचाऱ्यांनी आत्मक्लेश उपोषणाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे राज्याध्यक्ष बलराज मगर यांच्या नेतृत्वाखाली या कर्मचाऱ्यांनी या लाक्षणिक उपोषणाचा निर्णय घेतला आहे, असे या संघटनेचे संपर्क सचिव रामचंद्र मडके यांनी सांगितले.
राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमान्वये निवृत्तिवेतन व वेतनासाठी शासनाकडून १०० टक्के अनुदान दिले जाते. यातून वेतन व निवृत्तिवेतन दरमहा १ ते ५ तारखेपर्यंत द्यावे असे शासनाचेच आदेश आहेत. हा खर्च अनिवार्य खर्चात येत असतानाही शासन महसूल कमी जमा होत असल्याचे निमित्त करीत जि.प. कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तांचे वेतन रखडवले जात असल्याचा या कर्मचाऱ्यांचा आरोप आहे; मात्र शासकीय कर्मचारी व निवृत्तिवेतनधारकांना महसुलाची अडचण येत नाही का, असा सवाल या कर्मचाऱ्यांकडून विचारला जात आहे.