शिक्षकांनी बदलीसाठी दिलेली खोटी माहिती जि.प.ला भोवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 02:27 AM2019-04-27T02:27:56+5:302019-04-27T02:28:07+5:30
चौकशी करून अभिप्राय पाठवा : कोकण आयुक्तांचे सीईओंना आदेश
- सुरेश लोखंडे
ठाणे : शहराजवळील सोयीची शाळा मिळवण्यासाठी बहुतांशी शिक्षकांनी बनावट कागदपत्रे जोडल्याच्या तक्रारी अन्यायग्रस्त शिक्षकांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे केल्या होत्या. त्यानुसार, आयुक्तांनी सर्व कागदपत्रे तपासणीसाठी सादर करण्याचे आदेश दिल्यानंतर बदल्यांमधील गंभीर घोळ निदर्शनात आला असून यावर स्वत: निर्णय घेण्याऐवजी आयुक्तांनी आता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीच (सीईओ) तक्रारींवरील चौकशीसह अभिप्राय देण्याचे आदेश २४ एप्रिलला दिले आहेत. यामुळे ठाणे, पालघरसह कोकणातील बनवाबनवी करणाºया शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत.
ठाणे जि.प.च्या दोन हजार शिक्षकांसह पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषदांच्या हजारो शिक्षकांच्या बदल्या आॅनलाइन झाल्या. कोकणातील या पाच जिल्ह्यांच्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या दोन महिन्यांपूर्वी झाल्या. राज्यातील अन्य जिल्हा परिषद शिक्षकांच्या या आॅनलाइन बदल्या वर्षभरापूर्वीच झाल्या. त्यातही काही शिक्षकांनी विविध निकषांचा लाभ घेऊन शहराजवळ व सोयीच्या शाळा मिळवल्या. यातील बहुतांश शिक्षकांनी वैद्यकीय प्रमाणपत्र, अवघड शाळेत काम केल्याचे अर्जात नमूद करणे, पतीपत्नी एकत्रीकरणासाठी नोकरीचे अंतर दूर दाखवणे आदींची बनावट कागदपत्रे आणि चुकीची माहिती दिल्याचे निदर्शनात आले. यासंदर्भात लोकमतने ‘बदल्यांसाठी शिक्षकांची बनावटगिरी’ या मथळ्याखाली १० मार्च रोजी वृत्त प्रसिद्ध करून हा विषय उघड केला होता. या आॅनलाइन बदल्यांमध्ये ठाणे जिल्हा परिषदेच्या दोन हजार ११९ शिक्षकांचा समावेश आहे. यातील बहुतांशी शिक्षकांनी बनावट वैद्यकीय दाखले व चुकीची दिशाभूल करणारी माहिती अर्जात दिली. यामुळे बनावटगिरी करणाºया शिक्षकांची सोयीच्या शाळेवर बदली झाली. यामुळे संतापलेल्या शिक्षकांनी तक्रारी करून न्यायप्राप्तीसाठी प्रयत्न केले. लोकमतच्या या वृत्ताची दखल घेऊन ठाणे जिल्हा परिषदेचे सीईओंनी कागदपत्रांच्या तपासणीसाठी समिती गठीत करून अहवाल सादर करण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले होते.
विभागीय आयुक्तांनी घेतली गंभीर दखल
या संवर्ग-३ व ४ च्या बदल्यांचीदेखील कागदपत्रे तपासण्याची जाणीव लोकमतने १५ मार्च रोजी वृत्त प्रसिद्ध करून दिली. याची दखल जिल्हा परिषदेऐवजी विभागीय आयुक्तांनी तत्काळ घेऊन सर्व बदल्यांबाबतच्या आवश्यक कागदपत्रांची परिपूर्ण माहिती सोमवार, ८ एप्रिल २०१९ रोजी सादर करण्याचे आदेश जारी केले होते. परंतु, यातील बदल्यांचा घोळ निदर्शनात आल्यानंतर मात्र आयुक्तांनी २४ एप्रिल रोजी पुन्हा आदेश जारी करून प्राप्त अर्जांवर चौकशी करून नियुक्ती प्राधिकारी म्हणून स्वयंस्पष्ट अभिप्रायासह प्रकरणनिहाय अहवाल २ मे रोजी सादर करण्याचे आदेश सीईओंना दिले आहेत.
याशिवाय, आयुक्त कार्यालयात आलेले सर्व तक्रार अर्ज संबंधित बदली आस्थापनेवरील कर्मचारी व कक्ष अधिकारी यांना घेऊन जाण्याचे आदेशही कोकण विभागीय उपायुक्त गणेश चौधरी यांनी जारी केले. यामुळे ठाणे जिल्हा परिषदेसह आता पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सीईओंनाही हे आदेश जारी झाले आहेत. यामुळे या आॅनलाइन बदल्यांमधील बनावटगिरी करणाºया शिक्षकांवर कडक कारवाई होण्याचे संकेत दिसून येत आहेत. यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पारदर्शक चौकशी करून अहवाल सादर करण्याची अपेक्षा अन्यायग्रस्त शिक्षकांकडून होत आहे.