‘टीडीसी’कडून कोट्यवधींच्या रकमेवर जि.प.ला व्याज नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 01:58 AM2020-02-21T01:58:59+5:302020-02-21T01:59:08+5:30
सर्वसाधारण सभेत वादळी चर्चा : ठेवी अन्य बँकेत ठेवण्याची सदस्यांनी केली मागणी
सुरेश लोखंडे
ठाणे : येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसी) बँकेत ठाणे जिल्हा परिषदेच्या बहुतांश विभागांची खाती आहेत. त्यात विविध योजनांचा करोडो रुपयांचा निधी जमा असतो. मात्र, या रकमेवर या बँकेकडून व्याज मिळत नसल्याचा आरोप सोमवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्य सुभाष घरत यांनी केला. जिल्हा परिषदेच्या विविध योजनांचा करोडो रुपयांचा निधी टीडीसी बँकेत जमा केला जातो. यासाठी शेकडो खाती या बँकेत जिल्हा परिषदेने सुरू केली आहेत. मात्र, या खात्यांतील रकमेवर बँकेकडून व्याज केले जात नाही. अन्य बँकांमधील खात्यांमधील रकमेवर मात्र चार टक्के वार्षिक व्याजदर आकारून ती रक्कम खात्यात दरवर्षी जमा होत असल्याचे घरत यांनी सभागृहाच्या निदर्शनात आणून दिले. या मुद्यास अनुसरून अन्यही सदस्यांनी त्यांना पाठिंबा देऊन सभागृह डोक्यावर घेतले.
बँकेतील खात्यांवर करोडो रुपये निधी जमा असतो. विविध योजनांचा हा निधी खात्यात पडून राहत असतो. त्या रकमेचा वापर बँक करते. मात्र, त्याच्या बदल्यात वार्षिक चार ते साडेचार टक्के व्याज देणे अपेक्षित असल्याच्या चर्चेवर सदस्य गोकूळ नाईक, कैलास जाधव यांच्यासह अन्यही सदस्यांनी सहभाग घेतला. मात्र, टीडीसी बँकेकडून एक टक्का जादा व्याज दर दिला जात असल्याचे उपाध्यक्ष व टीडीसीसी बँकेचे विद्यमान संचालक सुभाष पवार यांनी स्पष्ट केले. याविषयी अधिक चौकशी लवकरच करून चौकशी करण्याचे सूतोवाचही त्यांनी केले.
ठेवी अन्य बँकेत वळत्या करा
मुरबाड तालुक्यातील एका ग्रामपंचायतीचे आठ लाख रुपये टीडीसीसी बँकेत काही वर्षांपासून जमा आहेत. त्यात आता किती जमा झाले, अशी माहिती घेतली असता त्यात व्याजाची रक्कम जमा झाली नसल्याचे निदर्शनात आले. याविषयी बँकेने लेखी उत्तरात केवळ सेवा देत असल्याचे नमूद केल्याचे घरत यांनी सभागृहात स्पष्ट केले. यास अनुसरून बँक व्याज देत नसेल, तर त्यातील खाते अन्य बँकांमध्ये वळते करून व्याजाचा लाभ जिल्हा परिषदेला करून देण्याची अपेक्षा अन्य सदस्यांनीदेखील लावून धरली. यावर प्रशासनाकडून होणाऱ्या पुढील कार्यवाहीकडे सदस्यांचे लक्ष लागून आहे.