जि.प.मुख्यालय, पदाधिकारी जाणार भाड्याच्या घरात, प्रस्ताव मंत्रालयीन मंजुरीच्या प्रतीक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 01:26 AM2019-08-16T01:26:21+5:302019-08-16T01:26:56+5:30

ठाणे येथील जिल्हा परिषदेच्या मुख्यालयाजवळील सर्व चार इमारती पाडून त्या जागी भव्य नवीन प्रशासकीय इमारत बांधली जाणार आहे.

ZP headquarters, office bearers to rent, waiting for ministry approval | जि.प.मुख्यालय, पदाधिकारी जाणार भाड्याच्या घरात, प्रस्ताव मंत्रालयीन मंजुरीच्या प्रतीक्षेत

जि.प.मुख्यालय, पदाधिकारी जाणार भाड्याच्या घरात, प्रस्ताव मंत्रालयीन मंजुरीच्या प्रतीक्षेत

Next

- सुरेश लोखंडे
ठाणे  - येथील जिल्हा परिषदेच्या मुख्यालयाजवळील सर्व चार इमारती पाडून त्या जागी भव्य नवीन प्रशासकीय इमारत बांधली जाणार आहे. तत्पूर्वी जिल्हा परिषदेची सर्व कार्यालये चरईतील एमटीएनएल इमारतीत हलवण्यात येणार आहेत. याप्रमाणेच पदाधिकाऱ्यांची निवासव्यवस्था केली जात आहे. यासाठी भाड्याची घरे शोधली जाणार आहेत. या घरभाड्याच्या रकमेच्या बंदोबस्ताचे नियोजनही जिल्हा परिषदेने आधीच केल्याचे निदर्शनात आले आहे.
जिल्हा परिषदेची मुख्य इमारत धोकादायक झाली आहे. यामुळे या पावसाळ्यात ती खाली करण्यात आली. त्यातील सर्व कार्यालये या परिसरातील अन्य इमारतींमध्ये हलवली आहेत. धोकादायक झालेली ही मुख्य इमारत पाडून नवीन बांधण्याचा निर्णय याआधी घेण्यात आला. आता या आवारातील चारही इमारती पाडून एक भव्य इमारत बांधण्याच्या निर्णयावर जिल्हा परिषदेने शिक्कामोर्तब केले आहे. यामुळे या मुख्य इमारतीसह जवळचे आगरकर भवन, प्रशासकीय भवनची इमारत, पदाधिकाऱ्यांचे निवासस्थान असलेली प्रगती इमारत आदी चार इमारती पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी मंत्रालयीन पातळीवरील मंजुरीसाठी प्रस्तावही देण्यात आलेला आहे.
नवी प्रगती इमारतही पाडणार
धक्कादायक बाब म्हणजे प्रशासकीय इमारत आणि पदाधिकाºयांच्या निवासस्थानाची प्रगती इमारत काही वर्षांपूर्वीच बांधण्यात आलेल्या आहेत. या नव्या इमारती असूनही त्या पाडण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी घेतल्याची गंभीर बाबही उघडकीस आली आहे.
या निवासस्थानाची इमारत पाडल्यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि चारही सभापतींच्या निवासव्यवस्थेची समस्या निर्माण होणार आहे. यावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने सर्व पदाधिकाºयांसाठी ठाणे शहरात घरे भाड्याने घेण्याचे निश्चित झाले आहे. या इमारतींचे बांधकाम बरेच वर्ष चालणार आहे.
तोपर्यंत पदाधिकाºयांच्या निवासव्यवस्थेसह कार्यालयांच्या भाड्यापोटी जिल्हा परिषदेला करोडो रुपयांचा भुर्दंडही पडणार आहे. घरे व कार्यालयांच्या भाड्याच्या खर्चाला जिल्हा परिषदेने मंजुरीही दिली आहे. हा भूर्दंड सहन करावा लागणार आहे.

प्रशासनाच्या हट्टापायी भाड्यापोटी बसणार लाखोंचा भुर्दंड

अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवासव्यवस्थेचे नियोजनही जिल्हा परिषदेने केले. हॉल, तीन बेडरूम व किचन असलेली घरे अध्यक्ष व उपाध्यक्षांना भाड्याने घ्यावी लागणार आहेत. प्रत्येकास सुमारे २०० चौरस मीटरचे घर लागणार आहे.

तर, चार विषय समित्यांच्या सभापतींसाठी प्रत्येकी दोन बेडरूम, हॉल आणि किचन असलेल्या सुमारे १५० चौ.मी.च्या घरांचे नियोजन करण्यात आले आहे. ठाणे शहरात या १५० ते २०० चौरस मीटरच्या घरासाठी प्रत्येकी दरमहा ३० ते ६० हजार रुपये भाडे भरावे लागणार आहे.

वर्षाकाठी लाखो रुपये या भाड्याच्या घरांवर जिल्हा परिषद खर्च करणार आहे. या खर्चासही तयारी दर्शवली आहे. काही वर्षांपूर्वीच बांधलेली प्रशासकीय व प्रगती इमारत पाडण्याची गरज नसतानाही पाडण्याचा हट्ट केला जात आहे.

Web Title: ZP headquarters, office bearers to rent, waiting for ministry approval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.