जि.प. अध्यक्षांची निवडणूक १५ जुलैला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 01:00 AM2020-06-25T01:00:42+5:302020-06-25T01:00:47+5:30
अध्यक्षपदासाठी १५ जुलै तर पंचायत समिती सभापती निवड प्रक्रिया ५ जुलैला होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि पंचायत समितीच्या सभापतीपदांचा कार्यकाळ जुलै महिन्यात संपुष्टात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर या सर्व पदांच्या निवडणुका जुलै महिन्यात होणार आहेत. यामध्ये अध्यक्षपदासाठी १५ जुलै तर पंचायत समिती सभापती निवड प्रक्रिया ५ जुलैला होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
ठाणे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिकनिवडणुका २०१७ मध्ये पार पडल्या. त्यावेळी अडीच वर्षांसाठी अध्यक्षांसह पंचायत समिती सभापतीपदासाठी निवडणुका घेतल्या होत्या. यात अध्यक्षपदासाठी महिला एसटी संवर्ग आरक्षण जाहीर झाले होते.
आता येत्या १५ जुलै रोजी ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व ८ जुलै रोजी पंचायत समिती सभापतीपदाचा अडीच वर्षांचा कार्यकाल संपुष्टात येणार आहे. त्यामुळे उर्वरित अडीच वर्षांच्या कालावधीसाठी अध्यक्षपदाच्या आरक्षणाची घोषणा नुकतीच झाली आहे. यावेळी अध्यक्षपदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) आरक्षण जाहीर झाले असून शहापूर पंचायत समिती सभापतीपदासाठी अनुसूचित जमाती (महिला), अंबरनाथ पंचायत समिती सभापतीपदासाठी अनुसूचित जमाती (महिला), मुरबाड सभापतीपदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग, कल्याण सभापतीपदासाठी सर्वसाधारण महिला आणि भिवंडी सभापतीपदासाठी सर्वसाधारण असे आरक्षण जाहीर करण्यात आले.
दरम्यान, निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने सगळेच तयारीला लागले आहेत.
>प्रशासनाकडून हालचाली सुरू
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासह शहापूर, कल्याण आणि अंबरनाथ या तीन पंचायत समिती सभापतीपदांवर महिला आरक्षण पडले आहे. त्यात आता जिल्हा प्रशासनाने जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापतीपदाच्या निवडणुका घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार, १५ जुलै रोजी होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून ठाणे उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे यांची नियुक्ती केली असल्याचे सांगण्यात आले आहे.पंचायत समिती सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी तहसीलदार हे पीठासीन अधिकारी असतील. अध्यक्षपदासाठी १५ जुलै तर पंचायत समिती सभापती निवड प्रक्रि या ५ जुलैला होणार असल्याची माहिती तहसीलदार (सा.प्र) राजाराम तवटे यांनी दिली.