जि.प. अध्यक्षपदी शिवसेनेच्या सुषमा लोणे, तर उपाध्यक्षपदी सुभाष पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 03:29 AM2020-07-16T03:29:55+5:302020-07-16T03:30:44+5:30
स्थानिक शिवसेना नेत्यांच्या आग्रहानुसार यावेळी भाजपाने उमेदवार न दिल्याने शिवसेनेच्या या दोन्ही उमेदवारांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा होऊन जिल्हा परिषदेवर पुन्हा अडीच वर्षे भगवा फडकणार आहे.
ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या सुषमा लोणे, तर उपाध्यक्षपदी सुभाष पवार यांची बिनविरोध निवड झाली. राज्यातील महाविकास आघाडीचा प्रयोग पाहून यावेळी उपाध्यक्षपदासाठी आग्रह धरणाऱ्या राष्ट्रवादीची शिवसेनेने अपेक्षानुरूप आगामी काळात दोन विषय समित्यांचे सभापतीपद देण्यात येईल, असे सांगून बोळवण केली. यामुळे या खेपेला शिवसेना जि.प. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला ठेंगा दाखविणार, हे लोकमतचे वृत्त खरे ठरले. येथील एनकेटी कॉलेजच्या सभागृहात पीठासीन अधिकारी अविनाश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रि या बुधवारी पार पडली.
स्थानिक शिवसेना नेत्यांच्या आग्रहानुसार यावेळी भाजपाने उमेदवार न दिल्याने शिवसेनेच्या या दोन्ही उमेदवारांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा होऊन जिल्हा परिषदेवर पुन्हा अडीच वर्षे भगवा फडकणार आहे.
जिल्हा परिषदेच्या प्रथम सार्वत्रिक निवडणुकीनंतर सध्या कार्यरत असलेल्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचा पदावधी १५ जुलै रोजी पूर्ण झाला. त्यामुळे ही निवडणूक प्रक्रि या पार पडली. या निवडणुकीत दोन्ही पदांसाठी एकेकच अर्ज प्राप्त झाल्याने दोन्ही पदांची निवडणूक बिनविरोध झाल्याचे पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शिंदे यांनी घोषित केले.
नवनिर्वाचित अध्यक्ष सुषमा लोणे या कल्याण तालुक्यातील खडवली गटातून जिल्हा परिषदेवर निवडून आल्या आहेत. या आधी सेनेच्याच दीपाली पाटील अध्यक्ष होत्या. तर, विद्यमान उपाध्यक्ष सुभाष पवार हे मुरबाड तालुक्यातील कुडवली गटातून जिल्हा परिषदेवर निवडून आले आहेत. ते यावेळी पुन्हा उपाध्यक्ष झाले आहेत.
राष्ट्रवादीला दोन सभापतीपदे मिळणार
सेना-राष्ट्रवादी एकत्र येऊन महाआघाडी गठीत करण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर सकाळी बैठक होऊन उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाआघाडी गठीत झाली. यावेळी सर्वानुमते अध्यक्ष-उपाध्यक्ष उमेदवार देण्यात आले. जिल्हा परिषदेच्या या सत्तेत राष्ट्रवादीला दोन सभापतीपदे मिळणार असल्याचे प्रमोद हिंदुराव यांनी ‘लोकमत’ला सांगितले.