चंद्रताल लेक ट्रेकिंगमध्ये घ्या चंद्रावर चालण्यासारखा अनुभव!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2018 03:15 PM2018-10-19T15:15:15+5:302018-10-19T15:18:55+5:30
सध्या फिरायला जाण्याचा सीझन सुरु झाला आहे. अनेकजण लॉन्ग विकेंड बघून वेगवेगळ्या ठिकाणांवर फिरायला जाण्याचा बेत आखत आहेत.
सध्या फिरायला जाण्याचा सीझन सुरु झाला आहे. अनेकजण लॉन्ग विकेंड बघून वेगवेगळ्या ठिकाणांवर फिरायला जाण्याचा बेत आखत आहेत. खासकरुन अशा जागांचा शोध घेतला जातोय जिथे त्यांना रिलॅक्स होता येईल आणि पूर्णपणे एन्जॉयही करता येईल. अशाच ठिकाणांच्या यादीत चंद्रताल हे ठिकाण आहे. या ठिकाणाला भेट देऊन तुमची ट्रिप मजेदार होण्यासोबतच अॅडव्हेंचरसही होईल. ट्रेकिंग करताना येथील बर्फाने झाकलेले डोंगर, तलाव आणि नद्यांचे सुंदर नजारे तुम्हाला कधीही न मिळालेला अनुभव देतील.
चंद्रताल लेक ट्रेक
चंद्रतालला 'मून लेक' या नावानेही ओळखले जाते. हिमाचल प्रदेशच्या लाहोल आणि स्पीति जिल्ह्यात कुंजुमजवळ ६ किमी अंतरावर चंद्रताल लेक आहे. चंद्रताल ट्रेक करताना तुम्हाला वाटेल की तुम्ही चंद्राच्या प्रवासा निघाले आहात. आजूबाजूला दोन मोठ-मोठे मोउलकिला आणि चंद्रभाग डोंगर आहेत, ज्यांवर ट्रेकिंग करणे फारच अवघड काम आहे. चंद्रताल लेक देशातील पवित्र तलावांपैकी एक आहे. या तलावात पाणी असताना याचा रंग बदलताना बघता येऊ शकतं.
चंद्रताल लेक ट्रेकची सुरुवात मनालीपासून होते, जी ३१०० मीटर उंचावर स्थित चिकापासून होत सेथान आणि नंतर बालूच्या घेरावर जाऊन संपते. 'बालू का घेरा' पोहोचायला जवळपास ५ तासांचा वेळ लागतो. रस्त्यात फूल, पक्षी आणि खळखळून वाहणाऱ्या नद्या मनाला मोहिनी घालतात.
कधी जाल?
चंद्रताल लेक आणि हॅम्पटा पास जाण्यासाठी जून ते ऑक्टोबर हा परफेक्ट कालावधी मानला जातो. जसजशी थंडी वाढते आणि तापमान कमी होत जातं रस्ते बर्फाने झाकले जातात. अशात ट्रेकिंग करणं आणखी कठीण होऊन बसतं.
कसे पोहोचाल?
दिल्लीहून बसने तुम्ही मनाली पोहचू शकता. बस डेपोमधून दर तासाला बसेस असतात. हिमाचल रस्ते परिवहन मंडळ दिल्लीतही हिमाचल भवन येथून मनालीसाठी बसेस चालवतात. मनालीपासून ५० किमीच्या अंतरावर जोगिंदर रेल्वे स्टेशन आहे. येथून भुंटर एअरपोर्टही ५० किमी अंतरावर आहे.