गुजरातमधील या 'मिनी आफ्रिकेला' भेट दिलीय का? आहे मोठा इतिहास
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 06:09 PM2022-06-15T18:09:57+5:302022-06-15T18:12:01+5:30
गुजराथी बोलणारे, आफ्रिकी येथे राहत असतील याची अनेकांना माहिती नाही. गुजराथच्या जम्बुर या ठिकाणी असे लोक तुम्हाला भेटतील. येथे मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात. हे लोक गुजराथी भाषा बोलतात, गुजराथी जेवण त्यांना प्रिय आहे पण सणाउत्सवाची वेळ येते तेव्हा मात्र ते आफ्रिकी रीतीरिवाज आणि आफ्रिकी नृत्यच करतात.
पर्यटक किंवा भटकंतीची आवड असणाऱ्यांना नव्या जागांचा शोध नेहमीच असतो. त्यांच्यासाठी ही माहिती अधिक उपयुक्त ठरेल. भारतात विविध जातीधर्माचे लोक राहतात पण गुजराथी बोलणारे, आफ्रिकी येथे राहत असतील याची अनेकांना माहिती नाही. गुजराथच्या जम्बुर या ठिकाणी असे लोक तुम्हाला भेटतील. येथे मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात. हे लोक गुजराथी भाषा बोलतात, गुजराथी जेवण त्यांना प्रिय आहे पण सणाउत्सवाची वेळ येते तेव्हा मात्र ते आफ्रिकी रीतीरिवाज आणि आफ्रिकी नृत्यच करतात. विशेष म्हणजे हे आफ्रिकी ज्यांना हबशी म्हणून सुद्धा ओळखले जाते, भारताच्या अन्य प्रांतातही आहेत, गुजराथ मध्ये या गावात हे लोक गेली किमान २०० वर्षे राहत आले आहेत असे सांगतात.
या लोकांना सिद्दी असेही म्हटले जाते. जम्बुर या गावी भेट दिली तर मिनी आफ्रिका पाहिल्याचे समाधान मिळू शकते. पूर्व आफ्रिका आणि अरब देशात पूर्वी पासून मजुरी करणाऱ्या मजुरांचे हे वंशज मानले जातात. जुना गढच्या नबाबाने त्यांना गुलाम म्हणून येथे आणले आणि अन्य राजा महाराजांना दिले. तेव्हापासून हे लोक भारताचे रहिवासी आहेत. भारतात सुमारे २५ हजार हबशी असल्याचे सांगितले जाते.
अशी कथा सांगतात कि जुनागढचा नबाब आफ्रिकेत गेला तेव्हा तिथल्या एका महिलेच्या प्रेमात पडला. ही महिला नबाबाबरोबर भारतात आली तेव्हा तिने सोबत हे गुलाम आणले होते. कर्नाटकात, गोव्यात सुद्धा हे हबशी काही प्रमाणात आहेत आणि ते कोंकणी भाषा बोलतात. या जमातीत अन्य जमातीतील लोकांशी विवाह संबंध जुळविले जात नाहीत. त्यामुळे हे लोक आफ्रिकीच दिसतात. त्यांच्यासाठी भारतात राहणे सोपे नव्हते, अनेकदा भेदभावाला त्यांना सामोरे जावे लागते. तरीही हे लोक आनंदाने भारतात राहत आहेत.