साधं, रांगडं पण अस्सल आनंदाचं कृषी पर्यटन

By admin | Published: April 10, 2017 04:36 PM2017-04-10T16:36:58+5:302017-04-10T16:36:58+5:30

शहरात राहताना शेतात भटकणं, शेतातल्या घरात राहणं, चुलीवरचं जेवण जेवणं असा अनुभव घेणं शक्यच नाही.

Agriculture, Tourism, and Tourism | साधं, रांगडं पण अस्सल आनंदाचं कृषी पर्यटन

साधं, रांगडं पण अस्सल आनंदाचं कृषी पर्यटन

Next

- अमृता कदम
शहरात राहताना शेतात भटकणं, शेतातल्या घरात राहणं, चुलीवरचं जेवण जेवणं असा अनुभव घेणं शक्यच नाही. त्यासाठी पर्यटन’ हा एकमेव पर्याय. अगदी साधेपणानं निवांत दिवस घालवण्याची संधी हे कृषी पर्यटन देतं. शेतात मनसोक्त हुंदडणं, विहिरीमध्ये पोहणं, झाडांवर चढून कैऱ्या-चिंचा शोधणं, दमून झाडाच्या दाट सावलीमध्ये विसावणं...शहरं वाढत गेली तसं गावाकडे घालवलेल्या या धमाल सुट्यांचं चित्र धूसर होत गेलं. पिकनिक, बाहेरगावी काढलेल्या ट्रिपचा पर्याय समोर असला तरी मातीची ओढ मनात कायम असतेच. शहरी वातावरणातच वाढलेल्यांना गावाकडची मजा लुटता यावी यातूनच अ‍ॅग्रो टूरिझमच्या अर्थात कृषी पर्यटनाच्या संकल्पनेचा जन्म झाला. कृषी-पर्यटनामध्ये तुम्ही एखाद्या शेतामध्ये जाता. इथे तुम्ही दिवसभरही राहू शकता किंवा अगदी दोन-तीन दिवसही. शेतात भटकायचं, शेतातल्याच घरात रहायचं, चुलीवरचं जेवण असा सगळा बेत असतो. टूरिस्ट स्पॉट्सना भेटी, शॉपिंग, चमचमीत, वेगवेगळ्या डिशेस असं काहीच या टूरिझममध्ये नसतं. अगदी साधेपणानं, निवांत दिवस घालवायचे असतात या सहलीत जे आपल्या जीवनशैलीमध्ये अगदी दुर्मीळ झाले आहेत. मुंबईकरांसाठी कृषी-पर्यटन म्हटल्यावर सगळ्यांत आधी आठवतं ते म्हणजे सगुणा बाग. मालेगाव-नेरळ रोडवर 16 हेक्टरच्या परिसरात सगुणा बाग पसरली आहे. अमेरिकेहून परत आल्यावर शेखर भडसावळेंनी आपल्या वडिलांचं स्वप्न साकार करण्यासाठी या फार्मची निर्मिती केली. इथे शेतातल्या भटकंतीशिवाय काही युनिक गोष्टीही आपल्याला पहायला आणि हो, करायलाही मिळतात. सगुणा बागेमध्ये सहा तलाव आहेत, जिथे तुम्ही मासेमारीचा आनंद घेऊ शकता. इथला अजून एक विशेष अनुभव म्हणजे पाण्यात डुंबणाऱ्या म्हशींच्या पाठीवर बसण्याचा. हे बफेलो रायिडंग लहानांसोबतच मोठ्यांसाठीही आनंदाची पर्वणी असतं. शेतात-बागेत मेहनत करु न, गोठ्यामध्ये गाईची धार काढून मस्त जेवण केल्यावर सगळा शिणवटा दूर होतो. राहण्यासाठी कॉटेज, मड हाऊस, पाँड हाऊस असे वेगवेगळे आॅप्शन्सही तुम्हाला सगुणा बागेमध्ये मिळतात. पुण्यापासून अवघ्या 10 किलोमीटरवर असलेलं मुळशी अ‍ॅग्रो-टूरिझम फार्म ही नेहमीच्या रूटिनपेक्षा काहीतरी वेगळं करण्यासाठी, विकेन्ड घालवण्यासाठी उत्तम ठिकाण. बैलगाडीतून शेतात फेरफटका मारायचा, पोहायचं, अगदी काही करायचं नसेल तर शांतपणे आपल्या कॉटेजमध्ये पडून पक्षांची किलबिल ऐकत पडायचं. पारंपरिक पद्धतीचं बोटिंग ही इथली खासियत. केवळ पुण्या-मुंबईजवळच नाही तर छोट्या-छोट्या शहरांच्या जवळपासही हे कृषी पर्यटनाचं प्रस्थ वाढत आहे. म्हणजे अगदी निपाणी-आंबोली हायवेवर बेळगावच्या इथेही अलुरकर रिसॉर्ट्स हे ठिकाण आहे. विशेष म्हणजे इथलं सगळं व्यवस्थापन हे स्थानिक लोकांच्या मदतीनेच पाहिलं जातं. त्यामुळे गावामध्येच रोजगाराच्या संधी निर्माण होतात. कृषी-पर्यटनातला एक थोडासा वेगळा प्रकार म्हणजे वाईनयार्ड्सची सफर. अर्थात आपल्याकडे हा प्रकार फारसा रूळलेला नाही. वाईनयार्डस म्हटलं की आपल्याला सगळ्यांत आधी आठवतं ते म्हणजे नाशिक. इथले द्राक्षांचे मळे आणि वायनरीज महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. पण ज्यांनी ही संकल्पना सर्वांत प्रथम रु जवली ते म्हणजे ‘सुला वाइन्स’. 1996 साली राजीव सामंतांनी सुला वाईन्सची सुरूवात केली. आज जवळपास 3000एकरांच्या परिसरात सुलाच्या स्वत:च्या आणि काँट्रॅक्टवर घेतलेल्या वाईनयार्डसचा पसारा पसरलेला आहे. सुला वाईन्सची सफर आणि वाइन टेस्टिंग सकाळी साडे अकरा ते साडे सहा या वेळेत दररोज अगदी दर तासातासाला होतं. वाइनयार्डच्या सफरीनंतर मस्तपैकी जेवणाचा आस्वादही इथे घेता येतो. सुलाच्याच शेतातून येणाऱ्या ताज्या सेंद्रिय भाज्या जेवणात ा चाखायला मिळतात. इथे इतरही वायनरीज आणि वाईनयार्डस आहेत, जिथे तुम्ही तुमची ट्रिप अरेंज करु शकता. शिवाय काही ठिकाणी राहण्याचीही सोय उपलब्ध आहे. कृषी पर्यटनाच्या वाढत्या प्रस्थामुळे पर्यटनाला तर चालना मिळतेच, पण त्यामुळे कृषी क्षेत्रालाही फायदा होऊ शकतो. लोकांना, नवीन पिढीला शेतकऱ्यांचं जीवन, त्यांचे कष्ट जवळून पहायला, अनुभवायला मिळतात. शेतकऱ्यांच्याविषयी त्यांच्या मनात आदराची भावना निर्माण व्हायला मदत होते. शेतकऱ्यांनाही आपल्या शेतीला जोडून आर्थिक उत्पन्नाचं एक साधन निर्माण होत आहे. लहान क्षेत्र असलेले शेतकरी एकत्र येऊन सगळ्यांच्या जमिनीचा योग्य तो वापर करून लोकांसाठी पर्यटनाचा पर्याय निर्माण करु शकतात. कृषीपर्यटनामुळे निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या, शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाच्या शक्यता लक्षात घेऊन राज्य तसेच केंद्र सरकारच्या कृषी खात्याकडूनही कृषी पर्यटनाला उत्तेजन मिळत आहे. त्यामुळेच शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांच्या वेगवेगळ्या गरजा भागवणारा हा पर्याय भविष्यातली एक चांगली संधी आहे. 

Web Title: Agriculture, Tourism, and Tourism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.