प्रवासात ‘मोशन सिकनेस’नं तुम्ही हैराण होता?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 01:03 PM2017-09-02T13:03:44+5:302017-09-02T13:05:24+5:30
या आठ गोष्टी करा आणि बिनधास्त बॅग उचलून निघा..
- मयूर पठाडे
प्रवास करणं प्रत्येकालाच आवडतं, पण हा प्रवास जर रोजचाच असेल, तर त्याचा नुसता कंटाळाच नाही, तर आरोग्याच्या अनेक समस्याही तो बरोबर घेऊन येतो. प्रवासादरम्यान ‘मोशन सिकनेस’ तर अनेकांना जाणवतो आणि त्यावर मग आराम केल्याशिवाय आणि बºयाचदा डॉक्टरांकडे गेल्याशिवाय दुसरा पर्याय नसतो.
मोशन सिकनेस टाळण्यासाठी काय कराल?
१- कुठल्याही प्रवासाला निघण्यापूर्वी आपली रात्रीची झोप पूर्ण आणि अगदी व्यवस्थित झालेली असली पाहिजे याकडे कटाक्षानं लक्ष द्या. मोशन सिकनेसचा त्रास त्यामुळे जाणवणार नाही.
२- अगदी छोट्या छोट्या गोष्टी, पण प्रवासात त्या तुमच्याजवळ असल्याच पाहिजे. टिश्यू पेपर, सिक बॅग, पाण्याची बाटली आणि आपला जेवणाचा डबा. अनेक विपरित गोष्टी त्यामुळे तुम्हाला टाळता येतील.
३- बस असो, रेल्वे असो किंवा जहाज.. कुठल्याही प्रकारचा प्रवास असला तरी आपलं सिट काळजीपूर्वक निवडा. अगोदरच बुकिंग करून ठेवलेलं असलं तर केव्हाही चांगलं. ज्या ठिकाणी आपल्याला धक्के बसणार नाही, आरामशीरपणे प्रवास होईल अशीच जागा तुम्ही निवडायला हवी.
४- प्रवासात ज्या ठिकाणी त्यातल्या त्यात प्रमाणात फ्रेश हवा मिळेल अशाच ठिकाणी बसावं. बसण्याची जागा कुबट, वास येणारी असली तर त्याचा नॉशिया येतो, मळमळ होते, उलटीही. असा बिकट प्रसंग टाळण्यासाठी फ्रेश हवा हा उत्तम उपाय आहे.
५- टेन्शन प्रत्येकालाच असतं, पण प्रवासाला निघताना ते घरी ठेवा आणि प्रवासाचा, निसर्गाचा आनंद घेत मस्तपणे एन्जॉय करा.
६- स्वत:लाही मुक्त ठेवा. प्रवासातही व्हॉट्स अॅप, वाचन, व्हीडीओ गेम्स.. कशाला हव्यात या गोष्टी? त्यापेक्षा आपल्या बरोबरच्या लोकांशी मस्त गप्पा मारा. हसीमजाक, काव्य, गाणी याचा आस्वाद घेत आपला प्रवास संस्मरणीय करा.
७- स्वत:ला कायम हायड्रेटेड म्हणजे शरीरातील पाणी कमी पडणार नाही याकडे लक्ष द्या. सतत पाणी पित राहा.
८- डॉक्टरांकडून तपासणी आणि आपली अत्यावश्यक औषधेही आठवणीनं सोबत ठेवा.