नेहेमीपेक्षा वेगळं पाहायचं असेल तर कर्नाटकातील बदामी गावात जा! काय आहे तिथे? हे वाचा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 06:50 PM2017-08-09T18:50:54+5:302017-08-09T18:58:42+5:30

प्राचीन इतिहास, कला, संस्कृतीबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असेल तर बदामी हे अत्यंत योग्य ठिकाण आहे. कर्नाटकातील या छोट्याशा गावात चालुक्य, पल्लव आणि राष्ट्रकुट राजवटीच्या इतिहासाच्या खुणा सापडतात. गुंफा, मंदिरं, किल्ले, पाण्याची टाकं असं बरंच काही इथे पहायला मिळतं.

Badami. A village in karnataka gives opportunity to see and know prosperous and beatuiful history | नेहेमीपेक्षा वेगळं पाहायचं असेल तर कर्नाटकातील बदामी गावात जा! काय आहे तिथे? हे वाचा!

नेहेमीपेक्षा वेगळं पाहायचं असेल तर कर्नाटकातील बदामी गावात जा! काय आहे तिथे? हे वाचा!

ठळक मुद्दे* बदामीमध्ये चालुक्यकालीन म्हणजे इसवी सन पूर्व सहाव्या ते बाराव्या शतकातील एक दोन नाही तर शंभरच्या आसपास मंदिरं आहेत.* बदामीमध्ये शैव, वैष्णव आणि बौद्ध धर्माच्या परंपरांचं दर्शन घडवणार्या  गुंफा आहे.* बदामीमध्ये तुम्हाला हॉटेल्सचे मर्यादित पर्यायच मिळू शकतात. पण होम स्टेचे काही पर्याय तुम्हाला इथे मिळू शकतात.

- अमृता कदम

सर्व प्रवास हे फक्त फिरण्यासाठी आणि फिरणं फक्त मौजमजेसाठी असतं असं नव्हे. अनेकदा प्रवासातून, फिरण्यातून इतिहास आणि संस्कृती समजून घेण्याचाही उद्देश असतो. आपल्या प्राचीन इतिहास, कला, संस्कृतीबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असेल तर बदामी हे तुमच्यासाठी अत्यंत योग्य ठिकाण आहे.
कर्नाटकातील या छोट्याशा गावात तुम्हाला चालुक्य, पल्लव आणि राष्ट्रकुट राजवटीच्या इतिहासाच्या खुणा सापडतील. गुंफा, मंदिरं, किल्ले, पाण्याची टाकं असं बरंच काही इथे पहायला मिळेल. या सर्व गोष्टी इथला समृद्ध इतिहास समजून द्यायला मदत करतात. ट्रॅव्हल मॅन्युअलवरच्या त्याच त्याच पर्यटनस्थळांना जर विटला असाल तर बदामीला एकदा तरी जाऊन यायलाच हवं.

 

पुराणांनुसार बदामीचं नाव वातापी होतं. पुढच्या काळात कदाचित त्याचाच अपभ्रंश होऊन त्याचं नाव बदामी पडलं असावं. बदामीमध्ये चालुक्यकालीन म्हणजे इसवी सन पूर्व सहाव्या ते बाराव्या शतकातील एक दोन नाही तर शंभरच्या आसपास मंदिरं आहेत. यातली काही मंदिरं ही अपूर्णावस्थेतच आहेत. नैसर्गिक आपत्ती किंवा आक्र मणामुळे कदाचित या मंदिरांचं काम पूर्ण झालं नसावं. या मंदिराची स्थापत्यशैली वैशिष्ट्यपूर्ण आहे. भारतीय पुरातत्त्व विभागानं इथे हाती घेतलेल्या कामांमुळे इथल्या बर्याच वास्तू अत्यंत नीट आहेत.
बदामीमध्ये शैव, वैष्णव आणि बौद्ध धर्माच्या परंपरांचं दर्शन घडवणार्या  गुंफा आहे. नटराजाची अत्यंत सुंदर मूर्ती, अर्धनारीनटेश्वराचं शिल्प, हरीहर, महिषासूरमर्दिनी, विष्णुचे दशावतार, पद्मपाणी बुद्धाचं शिल्प...डोळ्यांचं पारणं फेडतील अशा सुंदर शिल्पांनी या गुंफा नटलेल्या आहेत. लाल वालुकाश्मामध्ये या सार्या गुंफा खोदून काढलेल्या आहेत. यासर्वांसोबतच काही मंदिरं ही आवर्जून पाहावीत अशीच आहे.



भूतनाथ मंदिर

संध्याकाळची वेळ या मंदिराला भेट द्यायला एकदम उत्तम आहे. मावळत्या सूर्याची किरणं इथल्या अगस्त्यतीर्थाच्या पाण्यावर पडून या तळ्याला सोनेरी रंगात उजळवून टाकतात. पंचभूतांचा स्वामी मानून इथे भगवान शंकराची उपासना होते. या मंदिराचं सुरूवातीचं बांधकाम चालुक्यकालीन असलं तरी मंदिराचं शिखर कदंबकालीन आहे. या मंदिराच्याच मागच्या बाजूला प्राचीन जैन गुंफा आहेत. ज्यामध्ये जैन तीर्थंकर पार्श्वनाथांची प्रतिमा आहे.
 

विरूपाक्ष मंदिर

आवर्जून भेट द्यावं असं इथलं एक महत्त्वाचं मंदिर आहे. इसवी सन पूर्व आठव्या शतकातलं हे मंदिर त्याच्या भिंती, आधाराचे खांब, प्रवेशद्वारावरच्या कोरीवकामासाठी प्रसिद्ध आहे.

यल्लमादेवीचं मंदिर

आपल्याला ही देवी जोगत्यांची देवी म्हणूनच माहिती असते. पण मूलत: हे मंदिर विष्णूचं होतं. नंतर तिथे पार्वतीचाच अवतार मानल्या जाणार्या यल्लमादेवीची स्थापना करण्यात आल्या. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराला चारही बाजूंनी पायर्या आहेत. म्हणजे चारही बाजूंनी तुम्ही या मंदिरात प्रवेश करु शकता.
बदामीमधली दोन शिवालयंही अत्यंत सुंदर आहेत. ज्यांना भेट दिल्याशिवाय तुमची बदामीची ट्रीप पूर्ण होत नाही.

इथून काय आणाल?

आपण जेव्हा फिरायला जातो तेव्हा तिथली काहीतरी खासियत घेऊन येणं हेसुद्धा महत्त्वाचं असतं. त्यामुळे ट्रीपमधला एक महत्त्वाचा भाग असतो शॉपिंग. पण बदामीसारख्या ठिकाणी तुम्हाला शॉपिंगसाठी फार काही आकर्षक पर्याय नाहीत सापडणार. पण बदामीपासून जवळच असलेल्या इरकलला भेट देऊन तुम्ही इथली प्रसिद्ध इरकल साडी किंवा ड्रेसचं कापड घेऊ शकता.

राहायचं कुठे?

बदामीमध्ये तुम्हाला हॉटेल्सचे मर्यादित पर्यायच मिळू शकतात. पण तुम्ही मित्रमंडळींसोबत गेला असाल आणि गावात फिरण्याची तसदी घेणार असाल तर होम स्टेचे काही पर्यायही तुम्हाला मिळू शकतात.
निवांत राहून एखाद्या मंदिराला, गुंफेला भेट द्यायची, मग गावामध्ये मस्त फेरफटका मारायचा आणि रूमवर येऊन छानपैकी विश्रांती घ्यायची असा दिनक्र म मनात ठेवून गेला असाल तर तीन-चार दिवस तुम्ही आरामात बदामीमध्ये राहू शकता. पण जर थोडे जास्त दिवस हातात असतील आणि एकाच ठिकाणी थांबायचं नसेल तर बदामीला जोडून हंपीची ट्रीपही होऊ शकते.

 

 

Web Title: Badami. A village in karnataka gives opportunity to see and know prosperous and beatuiful history

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.