शहराच्या गोंगाटापासून जरा वेळ शांतता मिळवण्यासाठी परफेक्ट आहे तीर्थन व्हॅली!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 12:11 PM2019-02-22T12:11:08+5:302019-02-22T12:13:52+5:30
शहरातील सततच्या धावपळीचा कंटाळा येत नसेल असा एकही व्यक्ती सापडणार नाही. अशात काही दिवस मनाला शांतता देणाऱ्या ठिकाणावर घालवावे असा विचार डोक्यात येणे सामान्य बाब आहे.
(Image Credit : TravelTriangle)
शहरातील सततच्या धावपळीचा कंटाळा येत नसेल असा एकही व्यक्ती सापडणार नाही. अशात काही दिवस मनाला शांतता देणाऱ्या ठिकाणावर घालवावे असा विचार डोक्यात येणे सामान्य बाब आहे. यासाठी आम्ही तुमच्यासाठी एक पर्याय घेऊन आलो आहोत. हिमाचलमधील सुंदर आणि शांत तीर्थन व्हॅली असंच एक ठिकाण आहे.
तीर्थन व्हॅलीला भेट देण्यासाठी तुम्हाला महिनाभरापासून प्लॅनिंग करण्याची गरज नाही. इथे तुम्ही दोन ते तीन दिवस आरामात सुट्टी एन्जॉय करू शकता. हिमाचलमध्ये पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत, पण सगळीकडे फिरत बसण्यापेक्षा एका ठिकाणीच काही दिवस घालवले तर तुम्हाला जास्त आनंद मिळेल. डोंगरावर पसरलेली बर्फाची चादर तर तुम्ही अनेकदा पाहिली असेल पण इथला नजारा काही वेगळाच तुम्हाला बघायला मिळेल.
जिभी वॉटरफॉल
पावसाळ्यात या वॉटरफॉलचं सौंदर्य काही औरच असतं. डोंगरांमधून खळखलत खाली येणारं पाणी मनाला एक वेगळीच शांतता देऊन जातं. सोबतच पक्षांची चिवचिवाटही या आनंदात भर घालते. अशा शांत वातावरणात तुम्ही स्वत:ला वेगळ्याच विश्वात घेऊन जाऊ शकता.
जलोरी पास आणि सिरोलसार लेक
ही दोन्ही ठिकाणे येथील आकर्षण म्हणता येतील. इथे पोहोचण्याचा रस्ताही फार मनमोहक आहे. कारण इथून जाताना असं वाटतं की, रस्त्यावर बर्फाची चादर अंथरलेली आहे. मधे गोठलेला तलाव आणि चारही बाजून बर्फच बर्फ. उंचीवर असलेलं मंदिर. इथे एकदा आल्यानंतर तुमचा वेळ कसा जाईल याचा अंदाजही येणार नाही.
चैहणी गांव
हे येथील एक छोटंसं गाव आहे. इथे चैहणी कोठी आहे. लाकडांपासून तयार केलेली ही कोठी १५०० वर्ष जुनी आहे. इथे कुल्लूचे राजा राणा ढाढिया राहत होते. १५ मजल्यांची ही इमारत १९०५ मध्ये आलेल्या भूकंपात १० मजलीच शिल्लक राहिली आहे.
कधी जाल?
तीर्थन व्हॅलीला भेट देण्याची सर्वात चांगली वेळ म्हणजे मार्च ते जून दरम्यान सांगता येईल. यावेळी वातावरण फारच चांगलं असतं. जास्त थंडीही नसते. त्यासोबतच वेगवेगळ्या थरारक खेळांचाही तुम्ही इथे आनंद घेऊ शकता. उन्हाळ्यात जलोरी पास आणि हिमालयन नॅशनल पार्कची ट्रेकिंग सुद्धा करू शकता.
कसे जाल?
तीर्थन व्हॅलीला पोहोचण्यासाठी भुंटर हे येथील सर्वात जवळचं एअरपोर्ट आहे. या एअरपोर्टहून तुम्ही टॅक्सीने तीर्थन व्हॅलीला पोहोचू शकता. तीर्थन व्हॅलीला रेल्वे स्टेशन नसल्याने तुम्हाला शिमलापर्यंत रेल्वेची तिकीट बुक करावी लागेल. तेथून तुम्ही टॅक्सीने जाऊ शकता.