बॉलिवूड सिनेमात दाखवण्यात आलेली सुंदर ७ गावं, सुट्यांमध्ये एकदा फिरुन याच!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2018 03:04 PM2018-07-26T15:04:02+5:302018-07-26T15:04:58+5:30
अनेक बॉलिवूड सिनेमांचं शूटिंग भारतातील अनेक सुंदर गावांमध्ये झालं. त्यामुळे ही गावं आणि तेथील लोकेशन फारच लोकप्रिय झाले. महत्वाची बाब म्हणजे तुम्ही वेगळ्या ठिकाणांवर फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर या गावांनाही भेट देऊ शकता.
बॉलिवूड सिनेमात सिनेमाची कथा, हिरो-हिरोईनसोबतच आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे सिनेमाचं लोकेशन. अनेक सिनेमे हे त्यांच्या लोकेशनमुळे आजही चर्चेत आहे. खासकरुन परदेशातील लोकेशनची एकेकाळी फारच क्रेझ होती. पण भारतातही अनेक सुंदर लोकेशन्स आहेत. अनेक बॉलिवूड सिनेमांचं शूटिंग भारतातील अनेक सुंदर गावांमध्ये झालं. त्यामुळे ही गावं आणि तेथील लोकेशन फारच लोकप्रिय झाले. महत्वाची बाब म्हणजे तुम्ही वेगळ्या ठिकाणांवर फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर या गावांनाही भेट देऊ शकता.
१) रामगढ
'शोले' सिनेमातील रामगढ गाव तुम्हाला आठवत असेलच. या सिनेमामुळे हे गाव चांगलंच लोकप्रिय झालं होतं. शोलेमध्ये जे गाव दाखवण्यात आलं ते गाव बंगळुरू आणि मैसूर यांच्यामधील रामनगरम पाव आहे. हे गाव खूप सुंदर आणि सुट्या घालवण्यासाठी एक चांगलं ठिकाण आहे.
२) चंबा
'ताल' या सिनेमात हिमाचल प्रदेशातील सुंदर गाव दाखवण्यात आलंय. सिनेमाच्या टायटल सॉंगमध्ये ऐश्वर्या ज्या गाण्यावर डान्स करताना दिसते ते हेच गाव आहे. तसा तर संपूर्ण हिमाचल प्रदेशच सुंदर आहे. पण चम्बा घाटीला येथील सर्वात सुंदर जागांपैकी एक मानलं जातं.
३) अभानेरी
राणी मुखर्जीच्या 'पहेली' सिनेमाचं शूटिंग अभानेरी गावात झालं होतं. हे सुंदर गाव जयपूरपासून ९७ किमी अंतरावर आहे. हे गाव पर्यटकांनाही वेगळाच आनंद देणारं ठरू शकतं.
४) चरणपूर
(Image Credit: topyaps.co)
शाहरूख खानच्या 'स्वदेस' सिनेमाचं शूटिंग सातारा जिल्ह्यातील चरणपूर येथे झालं होतं. हे गाव आपल्या नैसर्गिक सौंदर्य, मंदिरे आणि डोंगरांसाठी लोकप्रिय आहे. परिवारासोबत क्वालिटी टाइम स्पेंड करण्यासाठी तुम्ही या गावाला भेट देऊ शकता.
५) चंपानेर
(Image Credit: topyaps.co)
'लगान' सिनेमातील चंपानेर गाव सर्वांनाच आठवत असेल. हे गुजरातमधील एक ऐतिहासिक गाव असून सिनेमात भूवनचं गाव म्हणून दाखवलं आहे.
६) पुरुलिया
(Image Credit: topyaps.co)
रणवीर सिंग आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या 'लुटेरा' सिनेमाचं शूटिंग इथे झालं होतं. सिनेमाच्या कथेप्रमाणेच हे गावही सुंदर आहे. पुरुलिया हा पश्चिम बंगालमधील जिल्हा आहे आणि हा जिल्हा आपल्या सुंदर डोंगर आणि तलावांसाठी लोकप्रिय आहे.
७) सुंदरपांडियनपुरम
'रोजा' सिनेमातील सुंदर झऱ्यांचं गाव कुणीही विसरु शकत नाही. या सिनेमात सुंदरपांडियनपुरम नावाचं गाव दाखवण्यात आलंय जे तामिळनाडूतील कुत्रालम गाव आहे. आता हे गाव राज्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ झालं आहे.