कमी बजेटमध्ये फिरायला जायचय? तर या हिवाळ्यात पैसा वसूल ट्रीपचा नक्की आनंद घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2019 02:44 PM2019-12-08T14:44:07+5:302019-12-08T15:07:00+5:30
नाताळ आणि नविन वर्षाच्या सुट्ट्या सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी राहिले आहेत
(Image credit- oyo)
नाताळ आणि नविन वर्षाच्या सुट्ट्या सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी राहिले आहेत. दरवर्षी डिसेंबरमध्ये लोकांना सुट्ट्या असतात. पण होणारा अतिरीक्त खर्च आणि कमी असलेलं बजेट यांमुळे लोकं कुठेही बाहेर फिरायला न जाता घरी राहून सुट्टीचा आनंत घेतात. कमी पैशात सुट्टीचा आनंद घ्यायचाय तर आम्ही तुम्हाला काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. जिथे गेल्यानंतर तुम्ही हिवाळ्याचा पुरेपुर आनंद घेऊ शकता.
हिवाळ्यात फिरण्यासाठी दार्जिलिंग हे उत्तम पर्यटन स्थळ आहे. दार्जिलिंग हे भारताच्या पूर्वेक़डे असलेले सुंदर थंड हवेचं ठिकाण आहे. या ठिकाणी फिरायला गेल्यानंतर हॉटेलच्या रूम राहण्यासाठी स्वस्तात उपलब्ध असतात. आणि खाण्यापिण्याच्या पदार्थांचे दर सुध्दा जास्त नाहीत. या ठिकाणी पहाडी जेवणाचा आनंद तुम्हाला घेता येईल. दार्जीलिंग हे उभ्या डोंगरावर वसलेले असल्याने तिथे चालायची अंतरे थोडी असली तरी ती प्रचंड चढ उताराची आहेत.
अरुणाचल प्रदेश येथील पर्यटन स्थळांमध्ये तवांग हे महत्त्वपूर्ण पर्यटन स्थळ आहे. याठिकाणी वर्षाचे १२ ही महिने पर्यटकांची रेलचेल पहायला मिळते. ट्रॅवल एजंसीच्या म्हणण्यानुसार डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात या भागातील हॉटेल्सचे दर वर्षाच्या इतर दिवसांच्या तुलनेत कमी असतात.
उत्तराखंडच्या पर्यटनाचे आकर्षण असलेले मसूरी हे पर्यटन स्थळ आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणून मसूरीला विशेष महत्त्व आहे. उत्तराखंड ची राजधानी डेहराडून पासून 28 किलोमीटर अंतरावर उंच डोंगरांच्या रांगेत मसूरी हे थंड हवेचे सुंदर ठिकाण वसलेले आहे तेथे जाण्यासाठी रस्ते चांगले आहेत. डिसेंबर ते फेब्रुवारी बर्फाच्छादित प्रदेश बऱ्यापैकी असतो. हॉटेल्स मसूरी पासून खाली सात-आठ किलोमीटर अंतरावर डोंगरउतारावर आहेत. या उतारावरील हॉटेल्समध्ये समोर पाहिले तर खाली डेहराडून शहर रात्रीच्या अंधारात चमचमत असते आणि वर पाहिले तर मसूरी गाव अंधारात चमचमत असते.