एकटे असाल किंवा फॅमिलीसोबत कर्नाटकातील 'या' खास स्पॉट्सवर करा एन्जॉय!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 01:07 PM2018-10-24T13:07:51+5:302018-10-24T13:11:05+5:30
आम्ही कर्नाटकातील काही खास ठिकाणांची माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. कर्नाटकातील हिरव्या डोंगरांचा नजारा पावसाळ्यानंतर आणखी मनमोहक होतो.
नुकतीच देशातील काही भागांमध्ये थंडीला सुरुवात झाली आणि या रोमॅंटिक वातावरणात अनेकजण फिरायला जाण्याचा प्लॅन करत आहेत. आम्ही कर्नाटकातील काही खास ठिकाणांची माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. कर्नाटकातील हिरव्या डोंगरांचा नजारा पावसाळ्यानंतर आणखी मनमोहक होतो. निसर्गासोबतच इथे अॅडव्हेंचरचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. चला जाणून घेऊ त्या काही खास ठिकाणांबाबत...
कर्नाटकात कुठे फिराल?
(Image Credit : Bangalore Mountaineering Club)
कर्नाटकातील वेस्टर्न घाटात मुल्लयानगिरी आणि बाबा बूदनगिरी ही दोन सुंदर फिरण्यासारखी ठिकाणे आहेत. पण इथे पोहोचणे फार कठीण मानले जाते. कारण मुल्लयानगिरी हा कर्नाटकातील सर्वात उंच डोंगर आहे. या डोंगराच्या माथ्यावर मुल्लपा स्वामीचं मंदिर आहे. त्यामुळेच या डोंगराला मुल्लयानगिरी हे नाव पडलं. इथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला फार लांब ट्रेकिंग करावं लागेल. पण रस्त्यात दिसणारे सुंदर नजारे तुमचा प्रवास नेहमीसाठी स्मरणात राहिल असाच करतील. येथून सूर्याला बघणे हा फार वेगळा आणि अद्भुत अनुभव ठरतो.
दुसरा आहे बाबा बुदनगिरी डोंगर. या डोंगराचं नाव सूफी संत बाबा बूदन यांच्या नावावरुन पडलं. पर्यटक येथील तीन प्रसिद्ध गुहा बघायला येत असतात. हायकिंग आणि ट्रेकिंग प्रेमींसाठी ही फेव्हरेट जागा आहे. याच ठिकाणी मुनायनगिरी आणि दत्तगिरी नावाचे दोन डोंगर आहेत.
जोग फॉल्स
कर्नाटकात गेलात आणि जोग फॉल्स न बघताच आलात तर ही ट्रिप पूर्ण होऊ शकत नाही. शारावती नदीवर स्थित जोह फॉल्स भारतातील दुसरा सर्वात मोठा वॉटर फॉल आहे. याच्या २५३ उंचावरुन पडणारं पाणी आणि आजूबाजूचे डोंगर एखाद्या चित्रकाराच्या चित्रासारखं भासतात. जोग फॉल्सच्या आजूबाजूलाही एक दिवस फिरता येऊ शकतं.
कुटजाद्रि
कुटजाद्रि डोंगराला येथील सरकारने नैसर्गिक वारसा घोषित केलं आहे. इथे इंडियन रॉक पायथन ते हॉर्नबिल आणि मालाबर लंगूरसारखे अनेक दुर्मिळ प्राणीही बघायला मिळतात.
अगुंबे
कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यात अगुंबे हा सुद्धा प्रसिद्ध टुरिस्ट स्पॉट आहे. समुद्र सपाटीपासून २७२५ फूट उंचीवर असलेल्या या ठिकाणाला दक्षिणेतील चेरापूंजी म्हटलं जातं. कारण इथे वर्षभर पाऊस होत राहतो.
ही सर्व ठिकाणे पाहिल्यानंतरही तुमच्याकडे वेळ शिल्लक असेल तर आणि तुम्हाला फिरायचं असेल तर चिकमंगलूर, म्हैसूर आणि बंगळुरुचा प्लॅन करु शकता.
कसे पोहोचाल?
मुल्लयानगिरी आणि बाबा बूदनगिरी, चिकमंगलूरपासून २५ किमी आणि राजधानी बंगळुरुपासून २५० किमी अंतरावर आहे. या दोन्ही ठिकाणांवर जाण्यासाठी मोठ्या शहरांमधून सतत टॅक्सी आणि बसेस मिळतात. येथील सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन चिकलमंगलूर आहे आणि सर्वात जवळचं एअरपोर्ट बंगळुरु आहे. इथे राहण्यासाठी हॉटेल्स, रिजॉर्ट, होम स्टे आणि इको कॅम्प आहेत.