सीमा सडक संघटनेकडून भारत-चीन सीमेवर तयार होणार ७५ कॅफे, पर्यटकांसाठी खास सोय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 10:54 AM2022-07-13T10:54:08+5:302022-07-13T10:55:01+5:30
१२ राज्ये आणि काही केंद्रशासित प्रदेशात असे ७५ कॅफे बांधले जाणार आहेत. यामुळे सीमा भागात व्यावसायिक उलाढाल वाढेल आणि सीमावर्ती भागातील जनतेला रोजगार निर्माण होणार आहे. शिवाय पर्यटकांसाठी पायाभूत सुविधा त्यामुळे उपलब्ध होणार आहेत.
देशभरातील आंतरराष्ट्रीय, दुर्गम भागात रस्ते बांधण्याचे काम करणाऱ्या सीमा सडक संघटन म्हणजे बीआरओ तर्फे आता भारत चीन आणि भारत पाकिस्तान सीमा भागात कॅफे उभारण्याचे काम सुरु झाले असून रक्षा मंत्रालयाने यासाठी परवानगी दिली आहे. १२ राज्ये आणि काही केंद्रशासित प्रदेशात असे ७५ कॅफे बांधले जाणार आहेत. यामुळे सीमा भागात व्यावसायिक उलाढाल वाढेल आणि सीमावर्ती भागातील जनतेला रोजगार निर्माण होणार आहे. शिवाय पर्यटकांसाठी पायाभूत सुविधा त्यामुळे उपलब्ध होणार आहेत.
सेनेच्या युद्ध गरजा पूर्ण करतानाच बीआरओ पाकिस्तान आणि चीन सीमा भागातील नागरिकांच्या आर्थिक आणि सामाजिक उत्थानासाठी प्रयत्नशील आहे. या दुर्गम भागात पर्यटन वाढू लागले आहे. या भागातील प्रेक्षणीय स्थळांना मोठ्या संखेने पर्यटक भेटी देऊ लागले आहेत. त्यामुळे दीर्घकाळ दुर्लक्षित राहिलेला हा भाग आता विकसित होऊ लागला आहे.
विषम भौगोलिक परिस्थिती आणि विचित्र हवामान यामुळे पर्यटकांना पायाभूत सुविधा मिळणे या कॅफे मुळे शक्य होणार आहे. हे कॅफे खोलण्यासाठी परवाने दिले जात असून त्याची मुदत १५ वर्षे आहे. ही मुदत पाच वर्षे नंतर वाढवून घेता येणार आहे. या कॅफे परिसरात पार्किंग, फूड प्लाझा, रेस्टरूम, मेडिकल रूम अश्या सुविधा मिळणार आहेत. एकूण ७५ कॅफे पैकी १९ अरुणाचल प्रदेशात, १२ जम्मू काश्मीर मध्ये, १४ लदाख मध्ये, ११ उत्तराखंड, ७ हिमाचल, ५ राजस्थान, २ आसाम आणि १-१ नागालँड, पंजाब, सिक्कीम आणि प.बंगाल, मणिपूर येथे असतील.