राजघराण्यातील कुणीही या प्राचीन मंदिरात पुजा केली तर होऊ शकतो मृत्यू, आहे भयानक शाप!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 03:40 PM2022-02-16T15:40:31+5:302022-02-16T15:45:02+5:30
नेपाळची राजधानी काठमांडू पासून ८ किमी असलेले एक अतिप्राचीन रहस्यमयी मंदिर, ‘बुदानीकंथा’ नावाने ओळखले जाते आणि वेगळ्याच कारणाने ते चर्चेत असते.
भारताप्रमाणे जगात अन्य देशात सुद्धा अनेक प्रसिद्ध आणि प्राचीन हिंदू मंदिरे आहेत. आपला शेजारी देश नेपाळ हे तर हिंदू राष्ट्र म्हणूनच ओळखले जाते. नेपाळ मध्येही अनेक प्रसिद्ध हिंदू मंदिरे आहेत आणि हजारो भारतीय या मंदिरांना दर्शनासाठी दरवर्षी भेट देतात. नेपाळची राजधानी काठमांडू पासून ८ किमी असलेले एक अतिप्राचीन रहस्यमयी मंदिर, ‘बुदानीकंथा’ नावाने ओळखले जाते आणि वेगळ्याच कारणाने ते चर्चेत असते. या मंदिरात कुणीही सर्वसामान्य भाविक पूजा अर्चा करू शकतात पण असे म्हणतात कि नेपाळच्या राजघराण्यातील कुणी येथे पूजा केली तर त्याचा मृत्यू होतो. नेपाळ राजघराण्याला हा शाप आहे असे सांगितले जाते. त्यामुळे राजघराण्यातील कुणीही येथे पूजा करण्यास धजावत नाहीत.
शिवपुरी पहाडात असलेले हे प्राचीन मंदिर भगवान विष्णूचे आहे. एका शेतकऱ्याला या मंदिराचा शोध लागला असे सांगितले जाते. या मंदिरात पाण्याचे मोठे कुंड असून त्यात विष्णूची ११ सर्पांच्या वेटोळ्यावर निद्रा घेत असलेली प्रचंड मोठी मूर्ती आहे. विष्णूच्या मस्तकावर नागाच्या फडा आहेत. हे कुंड किंवा तलाव १३ मीटर लांबीचा असून त्यात ५ मीटर लांबीची ही शयनमुद्रेतील मूर्ती आहे. मूर्ती काळ्या रंगाची आहे.
नेपाळ राजपरिवार या मूर्तीची पूजा करू शकत नाही म्हणून अशीच दुसरी मूर्ती येथे स्थापित केली गेली असून त्या मूर्तीची राजघराण्यातील लोक पूजा करतात. या मंदिरात शंकर मूर्ती सुद्धा आहे. असे सांगतात कि समुद्र मंथन केल्यावर त्यातून बाहेर पडलेले हलाहल विष शंकराने प्राशन केले आणि त्यामुळे त्यांच्या घश्यात जळजळ होऊ लागली. तेव्हा त्यांनी त्रिशुळाने वार करून निर्माण केलेल्या पाण्याने तहान भागविली आणि त्यांची जळजळ कमी झाली. त्या पाण्याचे हे सरोवर बनले. गोसाईकुंड असे या सरोवराचे नाव आहे. दरवर्षी ऑगस्ट महिन्यात येथे शिव महोत्सव होतो तेव्हा कुंडात खाली असलेल्या शंकराच्या मूर्तीचे दर्शन होते असे सांगतात.