येथे गोठलेल्या नदीवर करता येतं ट्रेकिंग; जाणून घ्या कुठे आहे 'हा' ट्रॅक!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 12:34 PM2019-08-08T12:34:46+5:302019-08-08T12:43:01+5:30
उन्हाळ्यामध्ये ही नदी थंड पाण्याने अगदी दुथडी भरून वाहत असते. तर थंडीमध्ये ही नदी अशाप्रकारे गोठते की, लोक हिचा वापर येण्या-जाण्यासाठी करतात.
लडाखमधील जंस्कार क्षेत्रामध्ये एक असा ट्रॅक आहे, जो पर्यटकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. खरं तर अनेकांना प्रश्न पडतो की, या ट्रॅकमध्ये असं काय आहे, ज्यामुळे फक्त देशातीलच नव्हे तर जगभरातील पर्यटक येथे येत असतात. हा ट्रॅक म्हणजे, लडाखमधील एक गोठलेली नदी आहे. या नदीचं नाव जंस्कार आहे. उन्हाळ्यामध्ये ही नदी थंड पाण्याने अगदी दुथडी भरून वाहत असते. तर थंडीमध्ये ही नदी अशाप्रकारे गोठते की, लोक हिचा वापर येण्या-जाण्यासाठी करतात.
(Image Credit : zanskar-valley-trek - LLI Blog)
जंस्कारा नदी थंडीमध्ये अशाप्रकारे गोठते की, यावर अनेक लोक ट्रेकिंगचाही आनंद घेतात. यामुळे जगभरामध्ये हा ट्रॅक 'चादर ट्रॅक' म्हणून प्रसिद्ध आहे. हे नाव देण्यामागील कारण म्हणजे, थंडीमध्ये या नदीवर बर्फाची चादर जमा होते.
(Image Credit : www.lehladakhxp.com)
दरम्यान, ही जागा फक्त त्याच लोकांना आवडते ज्यांना ट्रेकिंग आणि अॅडव्हेंचर करण्याची आवड आहे. परंतु, या ट्रॅकच्या आजूबाजूला तुम्हाला अनेक नयनरम्य दृश्य पाहता येतील. येथील निसर्गरम्य दृश्य म्हणजे, जणू काही स्वर्ग सुखचं... हा जगभरातील एकमेव असा ट्रॅक आहे, जिथे ट्रेकिंग गोठलेल्या नदीवर करण्यात येते. त्यामुळेच कदाचित असं करणं फार रिस्की आणि अॅडव्हेंचर्स मानलं जातं. खरं तर या ट्रॅकवर चालणं जेवढं सोपं वाटतं तेवढं सोप खरचं नाही.
(Image Credit : http://trekchadar.com)
बर्फावर चालणं सोपं नाही, परंतु या ट्रॅकवर चालताना संपूर्ण रस्त्यावर तुम्हाला बर्फावरच चालावं लागतं. त्यामुळे येथे ट्रेकिंग करणारी माणसं खरचं, आपल्या जीवाची बाजी लावून ट्रेकिंग करत असतात. गोठलेल्या नदीच्या खालून वाहणारं पाणी अगदी स्पष्ट दिसत असतं. त्यामुळे छातीत धडकी भरल्याशिवाय राहत नाही.
(Image Credit : https://adventuresindbad.com)
दरम्यान, येणाऱ्या दिवसात हा ट्रॅक बंद केला जाऊ शकतो. 2018मध्ये आलेल्या अहवालानुसार, चादर ट्रॅकवर येणाऱ्या पर्यटकांची वाढणारी संख्या आणि त्याच्याकडून पसरवण्यात येणारी अस्वच्छता, तसेच ग्लोबल वॉर्मिंगमुळे वाढता धोका लक्षात घेऊन हा ट्रॅक पर्यटकांसाठी बंद करण्यात येऊ शकतो. तसेच येथे असणाऱ्या कमी तापमानामुळे लोक येथे दिवसा ट्रेकिंग करतात आणि रात्री कॅम्पिंग, त्यामुळे येथील पर्यावरण आणि शांतीवर वाईट परिणाम होतो. अहवालानुसार, येणाऱ्या 2 ते 3 वर्षांत हा ट्रॅक बंद केला जाऊ शकतो.