'या' समुद्रात बिनधास्त पोहण्याचा घेऊ शकता आनंद; बुडण्याची नाही भिती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 03:55 PM2019-02-07T15:55:16+5:302019-02-07T15:56:17+5:30
आपल्या पृथ्वीचा जवळपास 70 टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे. त्यामुळे जगभरात आपल्याला अनेक समुद्र किनारे पाहायला मिळतात. पाण्याचा विशाल स्त्रोत म्हणून समुद्राला ओळखलं जातं. समुद्रापर्यंत जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत फक्त पाणीच पाणी दिसून येतं.
आपल्या पृथ्वीचा जवळपास 70 टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे. त्यामुळे जगभरात आपल्याला अनेक समुद्र किनारे पाहायला मिळतात. पाण्याचा विशाल स्त्रोत म्हणून समुद्राला ओळखलं जातं. समुद्रापर्यंत जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत फक्त पाणीच पाणी दिसून येतं.
अनेक लोकं पर्यटनासाठी जगभरातील अनेक सुंदर समुद्रकिनाऱ्यांची निवड करतात. हा पण समुद्रात पोहण्यासाठी मात्र अनेक जण घाबरतात. अगदी पट्टीचे पोहणारेही समुद्रात पोहताना अनेकदा विचार करतात.
पण तुम्हाला माहीत आहे का? आपल्या पृथ्वीवर असा एक समुद्र आहे. ज्यामध्ये लाइफ जॅकेट शिवाय तुम्ही पोहण्याचं धाडस करू शकता. कारण कोणतीही वस्तू किंवा एखादा सजीव प्राणी अजिबात बुडत नाही. ते पाण्यावर तरंगतात. गोंधळलात ना? खरचं असा एक समुद्र आहे. ज्यामध्ये तुम्ही अगदी बिनधास्त लाइफ जॅकेटशिवाय पोहू शकता आणि पोहता येत नसेल तरी अजिबात काळजी करू नका. तरीही तुम्ही या पाण्यावर तरंगू शकता.
संपूर्ण जगभरामध्ये या समुद्राला डेड सी म्हणून ओळखलं जातं. आज आम्ही तुम्हाला या खास डेड सी बाबत सांगणार आहोत. हा समुद्र जॉर्डन आणि इज्राइलच्या मध्यावर आहे. या समुद्राला 'सॉल्ट सी' असंही म्हटलं जातं.
या समुद्राच्या आजूबाजूला कोणतीही जीवसृष्टी नाही. यामागेही एक कारण आहे. ते म्हणजे, या समुद्राच्या पाण्यामध्ये क्षार जास्त असून ते खारट आहे. त्यामुळे या पाण्यामध्ये कोणताही जीव जगू शकत नाही. या समुद्राला सर्वात मोठा खाऱ्या पाण्याचा तलाव म्हणूनही ओळखलं जातं. खरं तर समुद्राच्या पाण्यामध्ये मुबलक प्रमाणात मिनरल्स आढळून येतात. जे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात.
डेड सी जवळपास 48 मील लांबपर्यंत पसरलेला आहे. हे क्षेत्र पृथ्वीवरील पाण्याचे सर्वात खाली असलेलं क्षेत्र आहे. हा डेड सी समुद्र सपाटीपासून 400 मीटर खाली आहे. याचा दक्षिणेकडील भाग उथळ आहे, परंतु उत्तरेकडील खोली जवळपास 400 मीटर खोलपर्यंत आहे.
डेड सीमधून कोणत्याही नदीचा उगम होत नाही परंतु जॉर्डन नदी आणि काही छोट्या-मोठ्या नद्या या समुद्राला येऊन मिळतात. इतर समुद्रांच्या तुलनेमध्ये या समुद्राचे पाणी जवळपास 6 पटींनी खारट आहे. जगभरातील सर्वात जास्त खारट पाण्याचा समुद्र म्हणून हा समुद्र ओळखला जातो.