Travel Facts: शहाजहानने ताजमहल बांधुन झाल्यानंतर मजुरांचे हात कापले होते का? 'हे' आहे सत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 05:02 PM2022-02-24T17:02:40+5:302022-02-24T17:05:37+5:30
अशी वास्तू पुन्हा बांधता येऊ नये म्हणून बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या कारगिरांचे हात कापण्यात आले होते, असं म्हटलं जातं. परंतु, हे कितपत सत्य याबद्दल आज आपण जाणून घेऊया.
ताजमहाल जगातील सात आश्चर्यांपैकी (Seven Wonders of the World) एक आश्चर्य आहे. हा स्थापत्यकलेचा सुंदर नमूना आहे. आग्य्रातील प्रेमाचं प्रतीक असलेला ताजमहाल पाहण्यासाठी दूर देशाहून पर्यटक येतात. येथे दरवर्षी ताज फेस्टिवल (Taj Festival) आयोजित केला जातो. येत्या २० मार्चपासून ताज फेस्टिवल सुरू होणार आहे. यासाठी जगातील अनेक देशांतून पर्यटक येतील.
मुघलसम्राट शहाजहानने त्याची राणी मुमताजच्या स्मरणार्थ ताजमहाल बांधला होता. ताजमहाल बांधण्यासाठी कारगिरांनी अथक परिश्रम घेतले होते. त्यांना अशी वास्तू पुन्हा बांधता येऊ नये म्हणून बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या कारगिरांचे हात कापण्यात आले होते, असं म्हटलं जातं. परंतु, हे कितपत सत्य याबद्दल आज आपण जाणून घेऊया.
ताजमहाल पाहायला आलेल्या पर्यटकांना याबद्दलची सर्व माहिती जाणून घेण्यात रस असतो. त्यांची उत्सुकता टुरिस्ट गाईड आणखी वाढवतात आणि मजेशीर किस्से ऐकवून त्यांचे मनोरंजन करतात. ताजमहाल बांधणाऱ्या कारागिरांचे शाहजहानने हात कापले, हाही त्याचाच एक भाग आहे. सुंदर असा ताजमहल पाहिल्यानंतर त्यांनाही ते सत्य वाटतं. बीबीसीच्या रिपोर्टनुसार, कारागिरांचे हात कापल्याची गोष्ट निव्वळ एक कल्पना आहे. यासंदर्भात आतापर्यंत इतिहासामध्ये एकही पुरावा सापडलेला नाही. तसेच इतिहासकारांनीही त्याचा उल्लेख केलेला नाही.
ताजमहल बांधण्यात शाहजहानने कोणतीही कसर सोडली नव्हती. वेगवेगळ्या ठिकाणांवरून कारागीर बोलवण्यात आले. सर्वांनी रात्रंदिवस एकत्र काम केले आणि मग स्थापत्यकलेतील एक उत्कृष्ट कलाकृती निर्माण झाली. 'शाहजहान द राइज अँड फॉल ऑफ द मुगल एम्परर' (Shah-Jahan: The Rise and Fall of the Mughal Emperor) शाहजहानच्या या चरित्रामध्ये ताजमहलाच्या बांधकामाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. फर्गस निकोल यांनी हे चरित्र लिहिले आहे. ताजमहाल बांधणारे कारगिर हे कन्नौजमधील हिंदू होते. पोखरा येथून फुलांचे कोरीव काम करण्यासाठी कारगिरांना बोलवण्यात आले होते. तर ताजमहालासमोरची बाग बनवण्याची जबाबदारी काश्मीरच्या राम लाल यांच्यावर सोपवण्यात आली होती, असे या चरित्रामध्ये लिहलेलं आहे.
या रिपोर्टमध्ये असं नमुद करण्यात आलं आहे, की शाहजहानचे आपल्या आयुष्यात अनेक महिलांशी संबंध होते. पण, त्यांचे सर्वांत जास्त प्रेम हे मुमताज यांच्यावर होते. मुमताजप्रती शाहजहान पूर्णपणे समर्पित होते. मुमताजशिवाय इतर पत्नींना त्याच्या वैयक्तिक आयुष्यात फारसं स्थान नव्हते. शाहजहान मुमताजशिवाय राहू शकत नव्हते, असे शाहजहानच्या दरबारी असलेल्या इतिहासकार इनायत खान यांनी आपल्या पुस्तकात लिहिलं आहे.
खरं तर ताजमहाल बांधण्याचं स्वप्न मुमताजने पाहिलं होतं. शाहजहान गादीवर बसले आणि त्याच्या चार वर्षानंतर मुमताज यांचा मृत्यू झाला. मृत्यूच्या अखेरच्या क्षणी आपण स्वप्नात एक सुंदर महाल आणि बगीचा पाहल्याचं त्यांनी शहानजहाला सांगितले. माझ्या आठवणीत असाच सुंदर महाल बांधण्याची इच्छा त्यांनी शेवटच्या क्षणी बोलून दाखवली होती. पत्नी मुमताजच्या स्मरणार्थ बांधलेला ताजमहाल आज जगभरात प्रेमाचं प्रतीक झालं आहे.