हिवाळ्यात हवं तितकं फिरा पण तब्येत बिघडणार नाही म्हणून काही गोष्टी अवश्य करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 05:23 PM2017-11-23T17:23:33+5:302017-11-23T17:34:25+5:30
थंडीच्या दिवसात सहलीदरम्यान तब्येत बिघडली, सर्दी-डोकेदुखी सुरु झाली की रसभंग होतो. म्हणूनच हिवाळी सुट्टी मजेत जावी यासाठी काही टिप्स जरूर लक्षात ठेवाव्यात.
- अमृता कदम
हिवाळा म्हटलं की जवळ, लांब भटकायची, फिरायला जायची हुक्की येतेच. विशेषत: नोव्हेंबरच्या शेवटी आणि डिसेंबरमध्ये फिरण्याचे बेत आखले जातात. या काळात थंडीही चांगलीच वाढलेली असते. त्यामुळे या काळात फिरताना काळजीही घ्यावी लागते. सहलीदरम्यान तब्येत बिघडली, सर्दी-डोकेदुखी सुरु झाली की रसभंग होतो. म्हणूनच हिवाळी सुट्टी मजेत जावी यासाठी काही टिप्स जरूर लक्षात ठेवाव्यात.
हिवाळ्यात फिरण्याचे नियम
1. हिवाळ्यातल्या सुट्टीसाठी पॅकिंग करताना कपड्यांच्या बाबतीत अजिबात कंजुषी करु नका. ज्या ठिकाणी तुम्ही जात आहात, तिथे तापमान किती कमी होतं, याची थोडीशी माहिती आधीच करून घ्या. त्यानुसार पुरतील असे शॉल, स्वेटर आणि थर्मल्स असे कपडे सोबत ठेवा.
2. टॉवेल आणि मोज्यांचे जास्ती जोड घ्यायला विसरु नका. हिवाळ्यात रोजच्या वापरातल्या या गोष्टी लवकर सुकत नाहीत. त्यामुळे दोनपेक्षा अधिक जोड घेतले तर काळजीचं कारण उरत नाही. ओले किंवा मळकेच कपडेही घालवे लागत नाहीत.
3. सामानात हळद जरु र ठेवा. हवेत अचानक बदल झाला की अनेकांना लगेचच सर्दीचा त्रास सुरु होतो. अशावेळी थोडीशी हळद तुमच्यासोबत असू द्या. थंडीपासून वाचण्यासाठी हे आयुर्वैदिक औषध एकदम रामबाण उपाय आहे. हळद उष्ण असल्यानं ती दुधासोबत घेणं अशावेळी फायदेशीर ठरतं.
4. अधूनमधून स्नायू ताण देऊन मोकळे करा. जेव्हा प्रवास लांबचा असतो तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवून करण्याची गरज असते. गाडीतून थोड्या वेळासाठी जरी उतरलात तरी शरीराचे स्नायू एकदम ताण देऊन मोकळे करा. कारण त्यामुळे शरीरात रक्त गोठून, स्नायू आखडत नाहीत. म्हणजे प्रवासानं जाम व्हायला होत नाही.
5. बर्फाळ प्रदेशात स्नो फॉल पाहण्यासाठी जाणार असाल तर थोडी जास्त काळजी घ्या. बर्फावर जास्त काळ चालू नका. त्यामुळे स्नायू बधीर होऊन त्रास होण्याची शक्यता असते.
6. प्रवासात इकडचं तिकडचं पाणी पिऊन सर्दी, घसा खराब होण्याची शक्यता असते. अशावेळी शक्य असेल तिथे गरम पाणीच प्या. शिवाय सोबत एखादी गरम पाण्याची बाटलीही जरु र ठेवा.
7. प्रवास बसने असेल किंवा रेल्वेने. जास्त वेळ खिडकी उघडी ठेवू नका. कारण थंड हवेचा झोत थेट शरीरावर येत राहिल्यास शरीर आखडून जातं.
8. हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते. त्यामुळे सोबत विंटर केअर लोशन, लिप बाम, तेलाची छोटी बाटली असू द्या.