लडाखमध्ये फिरण्यासाठी आता जास्त दिवसांचं परमिट!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 01:11 PM2018-12-20T13:11:31+5:302018-12-20T13:12:03+5:30
रोमांचक प्रवासाची आवड असणारे लोक आता लडाखला आता आणखीही सहजपणे वेगवेगळ्या ठिकाणांवर फिरु शकतील.
रोमांचक प्रवासाची आवड असणारे लोक आता लडाखला आता आणखीही सहजपणे वेगवेगळ्या ठिकाणांवर फिरु शकतील. त्यासोबतच पर्यटक आता जास्त दिवस या ठिकाणावर थांबू शकतील. कारण सरकारने जम्मू-काश्मीरच्या लदाख क्षेत्रात रोमांचकारी पर्यटन वाढवण्यासाठी नवीन पर्यटक आणि ट्रेकिंग मार्गांना मंजूरी देण्यात आली आहे. म्हणजे तुम्ही आता लडाखमध्ये जास्त दिवसही राहू शकाल आणि मनसोक्त एन्जॉय करु शकाल.
मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीर सरकारने लडाख क्षेत्रातील गौरव, समृद्ध संस्कृती आणि परिसराची सुंदरता आणखी मोठ्या स्तरावर घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच आता नव्याने पर्यटक आणि ट्रेकिंग मार्ग सुरु करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
इतकेच नाही तर सध्या मिळत असलेल्या परमिटमध्येही वाढ करण्यात आली आहे. आता लडाखमध्ये फिरण्यासाठी पर्यटकांना १५ दिवसांचं परमिट दिलं जाणार आहे. आधी हे परमिट ७ दिवसांसाठी मिळत होतं. याने पर्यटक आता आणखी निवांत आणि फुरसतीने लडाखची सफर करु शकतील. नव्या मार्गांमधील अनेक मार्ग हे फार वेगळे आणि १४ हजार फूटांपेक्षाही अधिक उंचीवर आहेत. चीनच्या सीमेलगत असलेल्या या रस्त्यांवर चालणे फार कठीण आहे.
दरवर्षी लडाखमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक फिरायला येतात. एका अंदाजानुसार, २०१८ मध्ये इथे ३ लाख पर्यटक आले होते. आता इथे थांबण्याचं परमिटही वाढत असल्याने आणि मार्गांमध्येही वाढ होत असल्याने आणखी जास्त पर्यटक इथे भेट देऊ शकतात.