Travel News: पॅरिसनगरीचे भूषण असलेला आयफेल टॉवर अवघ्या १० मिनिटात झाला ६ मीटर अधिक उंच
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 02:59 PM2022-03-16T14:59:17+5:302022-03-16T15:04:51+5:30
पॅरीसनगरीचे भूषण असलेला आयफेल टॉवर मंगळवारी अवघ्या १० मिनिटात ६ मीटर अधिक उंच झाला आहे. या टॉवरची उंची १९.६९ फुटांनी वाढली असून आता तो ३३० मीटर उंच झाला आहे.
जगातील सर्वाधिक लोकप्रिय आणि लाखो पर्यटक आवर्जून ज्याला भेट देतात असा पॅरीसनगरीचे भूषण असलेला आयफेल टॉवर मंगळवारी अवघ्या १० मिनिटात ६ मीटर अधिक उंच झाला आहे. या टॉवरची उंची १९.६९ फुटांनी वाढली असून आता तो ३३० मीटर उंच झाला आहे. या उंची वाढीसाठी कारणीभूत आहे एक रेडीओ अँटेना. हेलीकॉप्टरच्या सहाय्याने ही अँटेना आयफेल टॉवरच्या डोक्यावर बसविली गेली.
आयफेल टॉवर १९२९ पर्यंत जगातील मानवनिर्मित सर्वात उंच संरचना म्हणून ओळखला जात होता. १९ व्या शतकाच्या अखेरीस गुस्ताव आयफेल यांनी हा टॉवर कागदावर आकडेमोड करून बनविला होता. त्यावेळी त्यांची नोंद जगातील सर्वात उंच मानवनिर्मित मनोरा अशी झाली होती. ४० वर्षे ही ओळख कायम राहिली होती. मात्र त्यानंतर १९२९ मध्ये न्यूयॉर्क क्रिसलर इमारत उभी राहिली आणि आयफेलचा हा ताज हिरावला गेला.
हा लोखंडी जाळीदार मनोरा जगातील सर्वाधिक भेट दिले जाणारे पर्यटनस्थळ आहेच पण १०० वर्षाहून अधिक काळ याचा उपयोग प्रसारणासाठी सुद्धा केला जात आहे. त्यामुळे वेळोवेळी आयफेलच्या शिखराची उंची बदलती राहिली आहे. जुने अँटेना बदलून नवा अँटेना बसविल्यामुळे या वेळी आयफेलची उंची ६ मीटर वाढली असे सांगितले जात आहे. या कामासाठी फक्त १० मिनिटे लागली असे समजते.