हिमालयातील करसोग घाटात घ्या मनसोक्त फिरण्याचा आनंद!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 11:33 AM2018-12-26T11:33:50+5:302018-12-26T11:37:03+5:30
तुम्ही जर या नेहमीच्या हिल्स स्टेशनला जाऊन कंटाळला असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक चांगला पर्याय घेऊन आलो आहोत.
जेव्हा विषय हिल्स स्टेशनचा निघतो तेव्हा अनेकांच्या मनात सर्वात आधी हिमाचल प्रदेश, शिमला आणि मनालीचा विचार येतो. पण तुम्ही जर या नेहमीच्या हिल्स स्टेशनला जाऊन कंटाळला असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक चांगला पर्याय घेऊन आलो आहोत. हिमाचल प्रदेशातच फिरण्यासाठी आणि मजा करण्यासाठी अशी अनेक ठिकाणे आहेत जी अजूनही अनेकांना माहीत नाहीत. त्यतीलच एक म्हणजे करसोग घाटाची. हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात हे हिल्स स्टेशन आहे. करसोगमध्ये असलेल्या मंदिरांचा संबंध महाभारत काळाशी जोडला जोता.
करसोग समुद्र सपाटीपासून १ हजार ४०४ मीटर उंचीवर आहे. हे ठिकाण आपल्या सुंदर जंगलांसाठी आणि सफरचंदाच्या बागांसाठी लोकप्रिय आहे. करसोग घाटात कामाक्षा देवी आणि महुनागाचं मंदिर सर्वात लोकप्रिय आहे. करसोग भलेही मंडी जिल्ह्यात येत असेल पण हे मुख्य मंडी शहरापासून १२५ किमी दूर आहे. तर शिमलाहून हे अंतर केवळ १०० किमीचं आहे. तुम्ही तत्तापानी येथून शिमला येऊन करसोगला पोहोचू शकता.
करसोग घाटातील डोंगर चढून तुम्ही संपूर्ण परिसराचं ३६० डिग्री दर्शन करु शकता. करसोगी घाटाखाली उत्तरेला शिकारी देवीचं मंदिर आहे. त्यासोबतच काही प्रसिद्ध डोंगर आणि पर्वत आहेत जिथे येऊन तुम्हाला आनंद मिळेल. त्यात कुन्हू धार, पीर पंजल, हनुमान टिब्बा, शैली टिब्बा आणि नारकंडा हट्टू पीक यांचा समावेश आहे. येथील शांततेमुळे अनेकजण या ठिकाणाला प्राधान्य देतात.