आइस्क्रीम म्हणजे आइस्क्रीमच!

By Admin | Published: April 10, 2017 04:29 PM2017-04-10T16:29:54+5:302017-04-10T16:29:54+5:30

आइस्क्रीम म्हणजे ते दुधाचंच असणार यात काय शंका?

Ice cream is ice cream! | आइस्क्रीम म्हणजे आइस्क्रीमच!

आइस्क्रीम म्हणजे आइस्क्रीमच!

googlenewsNext

आइस्क्रीम म्हणून आपण
भलतंच काही थंड, गारे गार खात नाही ना ..
घेण्याआधी हे तपासाच!

आइस्क्रीम म्हणजे ते दुधाचंच असणार यात काय शंका? पण ही शंका आता आता येऊ लागलीये. कारण दुकानात आपण आइस्क्रीम घ्यायला जातो आणि हातात फ्रोझन डेझर्ट पडतं. ते आइस्क्रिमसारखंच थंड गारेगार असतं हे नक्की पण ते आइस्क्रीम नसतं हे ही खरंच. त्यामुळे आपण खातो की फ्रोझन डेझर्ट हे आधी ओळखून घ्यायला हवं. आणि त्यासाठी मुळात आपल्याला आइस्क्रीम आणि फ्रोझन डेझर्टचा मूळ स्वभाव तर माहिती असायलाच हवा!

आइस्क्रीम म्हणजे?

मुळात आइस्क्रीम हे दुधाचंच असलं पाहिजे. त्यात दुधाच्या क्रीमचं प्रमाण कमीत कमी १० टक्के असावं असं आपल्या देशाच्या अन्नविषयक कायद्यात नमूद केलेलं आहे. मान्यवर आइस्क्रीम कंपन्या दुधाच्या क्रीमचं प्रमाण साधारणत: १२-१३ टक्के ठेवतात. पण अनेक कंपन्या आइस्क्रीम न बनवता ‘फ्रोझन डेझर्ट’ नावानं उत्पादन बनवतात. ‘फ्रोझन डेझर्ट’ म्हणजे थंड (गोठवलेली) मेजवानी! या ‘फ्रोझन डेझर्ट’मध्ये दूध नसतंच. किंवा असलं तरी अगदी अल्प प्रमाणात असतं. त्यात मुख्य पदार्थ असतो, वनस्पतीजन्य चरबी. पाम तेल, सोयाबीन तेल किंवा खोबऱ्याचं तेल यापासून ही वनस्पतीजन्य चरबी तयार केली जाते. वनस्पतीजन्य चरबी हायड्रोजनेटेड ट्रान्स फॅटच्या रूपात असते.

फ्रोझन डेझर्ट.. काय असतं ते?

दुधाच्या क्रीमपेक्षा वनस्पतीजन्य चरबी खूपच स्वस्त असते. म्हणजे दुधाच्या क्र ीमचा भाव ४०० रुपये प्रतिकिलो असेल, तर वनस्पतीजन्य चरबी असते ती फक्त ५०-६० रुपये प्रतिकिलो. शिवाय आइस्क्रीम दुधापासून तयार होत असल्यानं ते टिकवणं म्हणजे मोठ्या कसरतीचं काम. त्यामानानं फ्रोझन डेझर्ट जास्त काळ टिकतं. त्याचं शेल्फ लाइफ आइस्क्रीमपेक्षा अधिक असतं. आइस्क्रीमची वाहतूक फ्रोझन डेझर्टच्या मानानं कठीण, कारण आइस्क्रीम कायम उणे २० ते ३० इतक्या कमी तपमानात ठेवावं लागतं. त्यामानानं फ्रोझन डेझर्टला कमी थंड वातावरण पुरतं. फ्रोझन डेझर्ट निर्मितीची प्रक्रियाही आइस्क्रीमच्या तुलनेनं कमी खर्चिक असते. एकंदरच फ्रोझन डेझर्ट तयार करणं, टिकवणं, वाहतूक आणि त्याची विक्री आइस्क्रीमपेक्षा स्वस्त आणि सुलभ असते.
फ्रोझन डेझर्टमध्ये असलेला हायड्रोजनेटेड ट्रान्स फॅट हा घटक आपल्या शरीराला फारसा उपकारक नाही. अर्थात, म्हणून तो भयंकर वाईटही नाही. मात्र काही जणांना हायड्रोजनेटेड ट्रान्स फॅटचं वावडं असू शकतं. किंवा तो घटक त्यांच्या आरोग्यासाठी त्रासदायक असू शकतो. म्हणून आपल्याला खाण्यापूर्वी माहीत हवं की हे आइस्क्रीम आहे की फ्रोझन डेझर्ट!
आइस्क्रीमची बाजारपेठ खूप मोठी आहे. ती दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र त्यातील ४०-५० टक्के हिस्सा हा फ्रोझन डेझर्टनं व्यापलेला आहे.
त्यामुळे, यापुढे आइस्क्रीम खाताना आधी लेबल वाचावं. तो पदार्थ नेमका काय आहे, ते समजून घ्यावं आणि नंतरच ते खावं.

....जर आइस्क्रीमच खायचं असेल तर

1) आपण आइस्क्रीम घ्यायला जातो, तेव्हा त्यावरील लेबल नीट वाचावं.
2)कँडीबार, कप, कोन, फॅमिली पॅक काहीही घेताना ते आइस्क्रीम आहे की फ्रोझन डेझर्ट, हे आधी बघावं.
3)आपण कधीतरी मजा म्हणून फ्रोझन डेझर्ट खायला हरकत नाही, पण त्यात हायड्रोजनेटेड ट्रान्स फॅट आहे, दुधाचं क्र ीम नाहीयाची जाणीव ठेवूनच आणि आपल्याला हे चालणार आहे का याची खात्री करूनच फ्रोझन डेझर्ट घ्यावं.
4) थंड पदार्थ रोज किंवा वरचेवर खाण्याची सवय असेल तर फ्रोझन डेझर्टऐवजी आइस्क्रीम खाणं केव्हाही उत्तमच.
5) जर लेबलवर आइस्क्रीम किंवा फ्रोझन डेझर्ट असा उल्लेख नसेल तर त्यातील घटक पदार्थांची यादी वाचूनही ते ओळखता येतं. यादीत जर ट्रान्स फॅट, प्रोटीन्स, इमल्सिफायर असे उल्लेख असतील तर ते नक्कीच आइस्क्रिम नसून फ्रोझन डेझर्टच असतं.

Web Title: Ice cream is ice cream!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.