बर्फाचं हॉटेल. गाद्यांपासून खाण्याच्या प्लेटपर्यंत इथे सर्व काही बर्फाचंच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 07:24 PM2018-02-14T19:24:16+5:302018-02-14T19:30:17+5:30

बर्फानं बनलेलं हॉटेल खरोखरच अस्तित्वात आहे आणि इथे येण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडालेली असते. या हॉटेलमध्ये राहण्यासाठी कित्येक दिवस आधी तयारी केल्याशिवाय बुकिंगही मिळत नाही.

Ice hotel in Sweden .It is not imaginary . | बर्फाचं हॉटेल. गाद्यांपासून खाण्याच्या प्लेटपर्यंत इथे सर्व काही बर्फाचंच!

बर्फाचं हॉटेल. गाद्यांपासून खाण्याच्या प्लेटपर्यंत इथे सर्व काही बर्फाचंच!

googlenewsNext
ठळक मुद्दे* स्वीडनमधल्या लॅपलॅण्ड भागात जुकासजार्वी गावात बर्फाचं हॉटेल आहे.* या हॉटेलचं बांधकाम हे पक्कं नाहीये. म्हणजे उन्हाळा सुरु झाला की हे हॉटेल विरघळून जातं.* आर्ट स्वीट, आइस रु म, स्नो रु म या नावानं हॉटेलमध्ये वेगवेगळ्या खोल्या आहेत.

 




- अमृता कदम



तापमान शून्य डिग्रीच्या खाली गेलेलं असताना एखाद्यानं जर तुम्हाला सांगितलं की, ‘एक रात्र अशा हॉटेलमध्ये काढा जिथे सर्व बाजूंनी केवळ बर्फाच्या भिंती आहेत, झोपण्यासाठी बेडपण बर्फांच्या लाद्यांचा बनलेला आहे !’ तर तुम्ही अशा व्यक्तीला वेड्यात काढाल. पण ही वेडसर कल्पना नसून वास्तव आहे. असं बर्फानं बनलेलं हॉटेल खरोखरच अस्तित्वात आहे आणि इथे येण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडालेली असते. या हॉटेलमध्ये राहण्यासाठी कित्येक दिवस आधी तयारी केल्याशिवाय बुकिंगही मिळत नाही.

 



जगातलं सर्वात मोठं बर्फाचं हाँटेल

उत्तर युरोप आणि कॅनडामध्ये अशा पद्धतीची बर्फाची हॉटेल्स आहेत. पण हे जे बर्फाचं हॉटेल आहे ते जगातलं सर्वात मोठं बर्फाचं हॉटेल मानलं जातं. स्वीडनमधल्या लॅपलॅण्ड भागात जुकासजार्वी गावात हे हॉटेल आहे. या गावाची लोकसंख्या जेमतेम एक हजार इतकीच आहे. आर्किटक ध्रुवापासून दोनशे किलोमीटर अंतरावरचं हे ठिकाण आहे. इथलं हवामान असं आहे की उन्हाळ्यात इथे 100 दिवस सूर्यास्त होत नाही आणि हिवाळ्यात 100दिवस सूर्य उगवत नाही. त्यामुळे अशा बर्फाळ प्रदेशात आइस हॉटेलची कल्पनाच रोमांचित करणारी आहे. वीस वर्षापूर्वी अशा पद्धतीचं हॉटेल इथं सुरु करण्यात आलं.

 



प्रत्येक बाबतीत खास

सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या हॉटेलचं बांधकाम हे पक्कं नाहीये. म्हणजे उन्हाळा सुरु झाला की हे हॉटेल विरघळून जातं. डिसेंबर ते एप्रिल या पाच महिन्यांतच हे बर्फाचं हॉटेल टिकतं. काही पर्यटक तर या हॉटेलची निर्मिती कशी होतीये हे पाहण्यासाठीही आवर्जून येतात. जगातले अनेक कलाकार, आर्किटेक्ट, डिझायनर आणि स्नो बिल्डर या बर्फात हॉटेलचे विविध आकार साकारण्यात व्यस्त असतात. जसजशी त्याची निर्मिती व्हायला सुरूवात होते तसे तयार झालेल्या भागात लोक राहायला लागतात.
या दिवसांत इथे सूर्य कधी क्षितिजावर उगवतच नाही. लोकही त्याच्या प्रकाशाऐवजी उत्तर ध्रुवीय प्रकाशाचा आनंद घेण्यासाठीच जास्त आतुर असतात.एप्रिलच्या शेवटाला हळुहळू सूर्याची किरणं हॉटेलच्या भिंतींना स्पर्श करायला लागतात. आणि ही खरंतर हॉटेलच्या निरोपाची सुरूवात असते.

 

हॉटेलमध्ये काय काय?

आर्ट स्वीट, आइस रु म, स्नो रु म या नावानं हॉटेलमध्ये वेगवेगळ्या खोल्या आहेत. तुम्हाला इथे नेमकं काय अनुभवायचं आहे त्या पद्धतीनं तुम्ही त्या निवडू शकता.
बाहेरचं तापमान कितीही असलं तरी आइस हॉटेलचं तापमान मात्र नेहमी शून्य ते उणे पाच सेल्सियसपर्यंतच असतं. बर्फाच्या लादीवर तुमचा बिछाना गरम राहावा यासाठी रेनडियरची कातडी लावलेली असते. शिवाय झोपण्यासाठी थर्मल स्लीपिंग बॅगही दिल्या जातात. त्यामुळे एकदा या आवरणात शिरल्यावर बर्फाचा कसलाही त्रास होत नाही, उलट तुम्ही त्याचा हवा इतकाच आनंद लुटता. या हॉटेलमधलं रेस्टॉरण्ट हे बर्फाच्या भिंतींचं नाहीये, पण खाण्यासाठी ज्या ताट-वाट्या आहेत त्या मात्र बर्फाच्याच आहेत. इथे तुम्ही बर्फातल्या अनेक खेळांचा आनंद लुटू शकता.
भारतीय रूपयांमध्ये तुलना केली तर इथे एका रात्रीच्या मुक्कामासाठी 11 हजार रूपयांपासून ते 44हजार रूपयांच्या खोल्या उपलब्ध आहेत.
www.icehotel. com या वेबसाइटवर तुम्ही त्याचं बुकिंग करु शकता. किरूना विमानतळापासून हे हॉटेल अवघ्या 15 किमी अंतरावर आहे. स्वीडनशिवाय युरोपातल्या इतर ठिकाणाहूनही तुम्ही विमानाने इथे पोहचू शकता.
ज्यांच्यासाठी हिवाळा आवडता ॠतू आहे, ज्यांना बर्फाची मजा घेण्याची हौस आहे, अशा सर्वांना हे आइस हॉटेल खुणावतंय.

 

Web Title: Ice hotel in Sweden .It is not imaginary .

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.