युरोपला फिरायला गेलात तर बेल्जियम बघायला विसरू नका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 06:52 PM2017-08-17T18:52:01+5:302017-08-17T19:01:29+5:30

राजधानी ब्रुसेल्सपासून अगदी एका तासाच्या अंतरावरचं बेल्जियम हे शहर. बेल्जियमची ट्रीप तुम्हाला जुन्या आणि नव्या गोष्टींच्या मेळाची एक अनोखी झलक दाखवते.

If you plan a trip of Europe.. Then never forget to see Belgium | युरोपला फिरायला गेलात तर बेल्जियम बघायला विसरू नका!

युरोपला फिरायला गेलात तर बेल्जियम बघायला विसरू नका!

Next
ठळक मुद्दे* बेल्जियममधल्या ब्रुजेस इथल्या गल्ल्यांमधून पायी सफर तुम्हाला थेट मध्ययुगीन काळात घेऊन जाते.* शहराच्या मध्यवर्ती भागात वसलेलं हे मार्केट ब्रुजेसचे शेकडो रंग एकत्रित दाखवणारं ठिकाण आहे. नवव्या शतकापासूनच या मार्केटची उभारणी सुरु झाली होती.* बेल्जियममधलं अजून एक आकर्षण म्हणजे नॉर्थ सी. खरंतर ‘नॉर्थ सी’ची फारच थोडी किनारपट्टी बेल्जियमला लाभलीये. पण तरीही या किनारपट्टीचं दृश्य अगदी पाहण्यासारखं आहे.



- अमृता कदम


युरोपची सफर म्हणजे लंडन, फ्रान्स, इटली, स्वित्झर्लण्ड हे देशच चटकन आठवतात. पण युरोपमधले इतरही छोटे-छोटे देश आहे ज्यांची स्वत:ची वेगळी ओळख, सांस्कृतिक वारसा आहे, त्यापैकीच एक देश म्हणजे बेल्जियम. बेल्जियमची ट्रीप तुम्हाला जुन्या आणि नव्या गोष्टींच्या मेळाची एक अनोखी झलक दाखवते.
बेल्जियममधल्या ब्रुजेस इथल्या गल्ल्यांमधून पायी सफर तुम्हाला थेट मध्ययुगीन काळात घेऊन जाते. शतकांहून अधिक जुन्या इमारती, त्याच्या शेजारून जाणारी कालव्यांची छोटी रांग, स्वच्छ आणि शांत रस्ते. हे सगळं अगदी जुन्या काळातल्या युरोपची ओळख सांगणारं चित्र इथं पाहायला मिळतं. इथल्या वास्तू आणि कालव्यांच्या सफरीमुळे याला ‘व्हेनिस आॅफ नॉर्थ’ असंही म्हटलं जातं.

राजधानी ब्रुसेल्सपासून अगदी एका तासाच्या अंतरावरचं हे शहर. इथून समुद्रही जवळ आहे बेल्जियममधल्या वेस्ट फ्लॅण्डर्स प्रांताची ही राजधानी. दुसर्या महायुद्धाच्या संकटातूनही या शहराचं बरंचसं वैभव जसंच्या तसं टिकून राहिलंय. मध्ययुगीन काळातल्या अनेक वास्तू इथे आजही जतन केल्या आहेत. यातल्या कितीतरी वास्तू या युनेस्कोच्या जागतिक वारसा हक्क यादीतही समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. या शहरातली नुसती पायी सफरही खूप आनंद देणारी ठरते. शिवाय अगदी आवर्जून बघाव्यात अशा काही गोष्टीही शहराच्या आसपास आहेत, ज्यात मायकेल एंजेलोच्या अत्यंत प्राचीन अशा चित्रांचा समावेश आहे.


द मार्केट

शहराच्या मध्यवर्ती भागात वसलेलं हे मार्केट ब्रुजेसचे शेकडो रंग एकत्रित दाखवणारं ठिकाण आहे. नवव्या शतकापासूनच या मार्केटची उभारणी सुरु झाली होती. पादचारी, सायकलस्वारांची इथे सतत वर्दळ असते. शिवाय जागोजागी जॅन ब्रेडेल, पीटर दी कॉनिक यासारख्या मध्ययुगीन स्वातंत्र्यसैनिकांचे पुतळेही पाहायला मिळतात. मॅजेस्टिक बेलफ्राय टॉवर, संस्थानिकांचा राजवाडा, संस्थानी काळातल्या न्यायालयाची जुनी इमारत या मार्केटलाच लागून आहे. बुधवार हा इथल्या बाजाराचा दिवस असतो, ज्या दिवशी बेल्जियमची पारंपरिक यात्राही तुम्हाला पाहायला मिळते.

 

 

चर्च आॅफ लेडी

जगात केवळ विटांनी बांधलेल्या ज्या वास्तू आहेत, त्यापैकी सर्वात उंच वास्तू म्हणून या लेडी टॉवरचा उल्लेख होतो. 381 फूट म्हणजे 116 मीटर इतके उंच हे टॉवर आहेत. त्याच्या आत वसलेलं कलासंग्रहालय अनेक दुर्मिळ चित्रांचा खजिना आहे. चित्ररसिकांसाठी सगळ्यात मोठी मेजवानी म्हणजे मायकेल एंजेलोचं मार्बल मॅडोना आणि चाईल्ड ही चित्रं इथे आहेत. जवळपास 1505 च्या आसपासची ही चित्रं आहेत. या संग्रहालयासाठी प्रौढांना 6 युरो इतकं तिकीट आहे.

सेंट जॉन्स हाऊस मिल

खरंतर नेदरलॅण्ड हा पवनचक्क्यांसाठी प्रसिद्ध देश आहे. पण बेल्जियममधल्या ब्रुजेसमध्येही चार पवनचक्क्या आहेत. सेंट जॉन्स हाऊस मिल ही तर 1770 मध्ये बांधलेली आणि पर्यटकांसाठी खुली असलेली एकमेव पवनचक्की. आजही आपलं जुनं रु प टिकवून असलेल्या या पवनचक्कीची सफर तुम्हाला नक्कीच अविस्मरणीय आनंद देऊन जाईल.

बेजिनहॉफ

हे बेल्जियममधलं शहराच्या धकाधकीपासून अगदी दूर, निवांतपणाचा फील देणारं ठिकाण. 1245 मध्ये याची स्थापना झाली होती. बेग्विन्स या धार्मिक जीवन जगणार्या महिलांच्या पंथाचं हे ठिकाण. या महिला मठात न राहता या ठिकाणी येऊन राहात. सध्या पोपच्या संमतीनुसार निवडलेल्या काही सिस्टर्स या ठिकाणी येतात. इथल्या एका भव्य लॉनमध्ये चर्चचं कार्य नेमकं कसं चालतं, बेग्विन्स महिलांचं जीवन कसं असायचं याची माहिती देणारं एक छोटेखानी प्रदर्शन आहे.

बेल्जियममधलं अजून एक आकर्षण म्हणजे नॉर्थ सी. खरंतर ‘नॉर्थ सी’ची फारच थोडी किनारपट्टी बेल्जियमला लाभलीये. पण तरीही या किनारपट्टीचं दृश्य अगदी पाहण्यासारखं आहे. विशेषता उन्हाळ्यात. ब्रुजेसपासून अवघ्या 30 मिनिटांत हे अंतर पार करता येतं. आऊटडोअर अ‍ॅक्टिव्हिटीजसाठी हे अगदी उत्तम ठिकाण. इथे तुम्ही मनसोक्त स्विमिंग करु शकता, बीच व्हॉलिबॉल खेळू शकता किंवा साहसी वॉटर स्पोर्टसचा आनंदही लुटू शकता.
त्यामुळे युरोपच्या सहलीसाठी तयारी करत असाल तर बेल्जियमचा पर्याय आवर्जून लक्षात ठेवा.

Web Title: If you plan a trip of Europe.. Then never forget to see Belgium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.