स्वत:ला ओळखायचं असेल तर प्रवासासारखं उत्तम साधन नाही!..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 01:50 PM2017-08-30T13:50:54+5:302017-08-30T14:58:53+5:30
प्रवासातून मिळणारं संचित आपल्याला आयुष्यभर पुरतं.
- मयूर पठाडे
कोणकोणत्या गोष्टींपासून आपल्याला फार फायदा होतो, हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. त्यासंदर्भातली एक आर्याही खूप प्रसिद्ध आहे..
केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार
शास्त्र ग्रंथ विलोकन, मनुजा येतसे चातुर्य फार
म्हणजे काय, तर परदेश प्रवास, पंडितांशी मैत्री, वेगवेगळ्या सभांमधील नामांकित वक्त्यांचे विचार ऐकणं आणि ग्रंथांचं वाचन यामुळे आपल्यात फार चातुर्य, शहाणपण येतं या अर्थाची ही आर्या आहे.
यात देशाटन म्हणजेच परदेश प्रवासाचा उल्लेख केला आहे. अर्थात फक्त परदेश प्रवास केल्यानंच तुमच्यात चातुर्य, शहाणपण येतं असं नाही, कुठल्याही प्रवासानं, जग पाहिल्यानं आपल्याला अनेक गोष्टी कळतात. त्यामुळेच नियमितपणे आणि डोळे उघडे ठेऊन प्रवास केला तर ते आपल्या फारच फायद्याचं आहे असा या आर्याचा साधारण आशय..
प्रवासाच्या फायद्यांची यादी केली तर ती फारच मोठी होईल. त्यातील काही मोजक्या फायद्यांचा विचार आपण करू.
प्रवासाचे काय फायदे आहेत?
१- प्रवासामुळे आपल्याला ‘दृष्टी’ येते. अनेक गोष्टी आपल्याला लख्खपणे कळतात.
२- मुख्य म्हणजे प्रवासात इतक्या गोष्टी आणि इतकी माणसं पाहिल्यामुळे आपण नेमकं कोण आहोत, किती पाण्यात आहोत, आपण काय केलं पाहिजे याची समजही येते. म्हणजेच स्वत:ची ओळख प्रवासानं येते.
३- प्रवासात जी निरनिराळी माणसं आपल्याला भेटतात, त्यांच्याशी जर संवाद साधला तर अनेक आश्चर्यकारक आणि महत्वाच्या गोष्टी आपल्याला कळतात. या लोकांशी जर आपलं मैत्र जुळलं, तर त्या मैत्रीची शिदोरीही आपल्याला आयुष्यभर पुरते.
४- प्रवासामुळे आपल्यातही आपोआपच सुधारणा होत जाते. अनेक गोष्टी आपल्याला स्वत: कराव्या लागतात. ऐनवेळी निर्णय घ्यावे लागतात. अडचणींतून मार्ग काढावा लागतो. काही वेळा संयमाचीही परीक्षा होते. आपल्यातले विविध स्किल्स डेव्हलप करण्यासाठी प्रवासासारखा दुसरा मार्ग नाही.
५- तुम्ही कुठेही जा, पण संस्कृती आणि भाषेतलं वैविध्य तुम्हाला जाणवतंच. अगदी मराठी मुलखातच जरी तुम्ही गेलेला असलात, तरी तिथली बोली भाषा, काही शब्द, बोलण्याचा हेल इत्यादि अनेक गोष्टी पाहायला मिळतात. त्यामुळे भाषेचा व्यासंग सुधारण्यासही मदत होते.
६- प्रवास हा खरं म्हणजे एक प्रकारचं अॅडव्हेन्चरच असतं. अशा अॅडव्हेन्चरची तुम्हाला प्रवासामुळे सवय होते.
प्रवासानं अशा अनेक गोष्टी आपल्याला मिळतात. आपल्याला त्या समृद्ध करतात. त्याविषयी पुढच्या भागात..