भारतात वसलेला अनोखा भारत पाहायचा असेल तर ही 7 गावं चुकवू नका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 06:13 PM2017-09-07T18:13:49+5:302017-09-07T18:24:55+5:30

शहरीकरण वाढतय, खेडी ओस पडताय, खेड्यात काय आहे? सगळी चमकधमक तर शहरातच! ही आणि अशी कितीतरी नकारात्मक विधानं खेड्याबद्दल केली जात असली तरी खरा भारत त्यापेक्षाही सुंदर भारत पाहायचा असेल तर भारतात वसलेली काही खेडीच तुम्हाला हा अनुभव देवू शकता. मग अशी खेडी चुकवायची कशाला?

If you want to see real beautiful India then never miss these 7 villages. Why? Read it! | भारतात वसलेला अनोखा भारत पाहायचा असेल तर ही 7 गावं चुकवू नका!

भारतात वसलेला अनोखा भारत पाहायचा असेल तर ही 7 गावं चुकवू नका!

ठळक मुद्दे* म्यानमार आणि चीनच्या सीमेला लागून वसलेल्या या गावाचं नाव आहे डोंग.भारतात पहिल्यांदा सूर्याचं दर्शन घेण्याचं भाग्य इथल्या लोकांना लाभतं. अगदी पहाटे 4 वाजून 28 मीनिटांनीच या ठिकाणी सूर्योदय होतो.* आशियातलं सर्वात स्वच्छ गाव म्हणून मावलांगची ओळख आहे. मेघालयच्या पूर्वेकडे खासी डोंगररांगांमध्ये हे गाव वसलेलं आहे.* गुजरातमधलं पुंसारी गाव हे हायटेक खेडं मानलं जातं. या गावात एसी पासून ते अगदी वायफाय, आॅप्टिक फाईबर बिलबोर्डपर्यंतच्या सगळ्या आधुनिक गोष्टी आहेत.* मुलीच्या जन्माकडे नाकं मुरडून पाहणा-या गावांनी आदर्श घ्यावा असं पिपलांतरी हे गाव. राजस्थानातल्या पिपलांतरी गावातली मुलीच्या जन्मानंतरची एक प्रथा एकदम वेगळी आहे.

 

- अमृता कदम


भारत हा खेडयांचा देश आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे शहराकडे सगळ्यांचा ओढा वाढत चाललेला असला तरी काही छोटी गावं आहेत जी आजही आपली वेगळी ओळख टिकवून आहेत.
एखादं गाव ‘सर्वांत हायटेक गाव’ म्हणून ओळखलं जातं, तर एखाद्या गावाची ओळख देशातलं ‘सर्वांत स्वच्छ गाव’ म्हणून आहे. त्यामुळे आपल्याच देशातला हा न पाहिलेला भारत तुम्हाला खूप काही देवून जाईल हे नक्की.

‘डोंग’
सर्वांत आधी  सूर्यदर्शन होणारं गाव

 

म्यानमार आणि चीनच्या सीमेला लागून वसलेल्या या गावाचं नाव आहे डोंग. अगदी पर्वतीय प्रदेशात वसलेलं असल्यानं गावची लोकसंख्या अगदी तुरळक आहे. पण भारतात पहिल्यांदा सूर्याचं दर्शन घेण्याचं भाग्य इथल्या लोकांना लाभतं. अगदी पहाटे 4 वाजून 28 मीनिटांनीच या ठिकाणी सूर्योदय होतो, तर सूर्यास्तही अगदी लवकर म्हणजे साडेचारच्या सुमारास होत असतो. अरूणाचल प्रदेशच्या तेजू शहरापासून 200 किमी अंतरावर हे गाव आहे. इथे जाण्यासाठी तुम्हाला बस किंवा खासगी वाहनाचा पर्याय उपलब्ध आहे. अरूणाचलला जाण्याचा विचार असेल तर डोंगला भेट द्यायला अजिबात विसरु नका.

‘मावलांग’
सर्वांत स्वच्छ गाव

आशियातलं सर्वात स्वच्छ गाव म्हणून मावलांगची ओळख आहे. मेघालयच्या पूर्वेकडे खासी डोंगररांगांमध्ये हे गाव वसलेलं आहे. या गावात तुम्हाला ठिकठिकाणी बांबूनं बनलेल्या कचराकुंडी दिसतील. गावातले लोक सगळं टाकाऊ सामान याच कचरा कुंडीत टाकतात. त्यानंतर एका मोठ्या खड्डयात हा कचरा नेऊन त्यापासून खताचीही निर्मिती केली जाते. 2003मध्ये या गावाला आशियातलं सर्वांत स्वच्छ गाव म्हणून घोषित केलं गेलं. 2005 मध्ये भारत सरकारनंही या गावाला पुरस्कार देऊन गौरव केला.
शिलॉंगपासून भारत-बांगलादेश सीमेकडे 90 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. सरकारी बस शिवाय या ठिकाणी जाण्यासाठी खासगी टॅक्सीही उपलब्ध आहेत.

‘धरनाई’
सौर ऊर्जेवर तळपणारं गाव


 

30 वर्षापासून जे गाव अंधारात होतं, ते आज सौरउर्जेनं पूर्णपणे स्वयंभू बनलंय. बिहारमधल्या धरनाई गावात वीज आणण्यासाठी एकही वीजेचा खांब टाकला गेलेला नाहीये. केवळ आणि केवळ सौर उर्जेवरच हे गाव दिवसरात्र झगमगताना दिसतं. सौर ऊर्जेचे मायक्रो ग्रिड या गावाला 24 तास वीजेचा पुरवठा करतात.
बिहारमधल्या गयेपासून 26 किमी अंतरावर हे गाव आहे.

‘पुंसारी’
हायटेक गाव

गुजरातमधलं पुंसारी गाव हे हायटेक खेडं मानलं जातं. या गावात एसी पासून ते अगदी वायफाय, आॅप्टिक फाईबर बिलबोर्डपर्यंतच्या सगळ्या आधुनिक गोष्टी आहेत. शिवाय मिनी बस वाहतूक सेवाही इथे चालते. गावात ठिकठिकाणी सीसीटीव्ही देखील लावले गेले आहेत.
अहमदाबादपासून 74 किमी अंतरावर हे गाव वसलंय. धंसुरा हे सर्वांत जवळचं रेल्वे स्टेशन आहे.

‘खोनोमा’
ग्रीन व्हिलेज

नागालॅडण्डमधलं खोनोमा गाव सर्वात हरित गाव आहे. इथं तुम्हाला जिकडे तिकडे केवळ हिरवळच दिसेल. या ठिकाणी वृक्षतोडीवर कडक बंदी आहे. भारताचं पहिलं ग्रीन व्हिलेज म्हणून या गावाची ओळख आहे.नागालॅण्डची राजधानी कोहिमापासून अवघ्या 20 किमी अंतरावर हे गाव वसलेलं आहे.

‘किला रायपूर ’
ग्रामीण आॅलिम्पिक भरवणारं गाव

पंजाबमधल्या लुधियानामधलं हे किला रायपूर गाव ग्रामीण आॅलिम्पिकसाठी प्रसिद्ध आहे. इथला क्र ीडा महोत्सव मोठ्या प्रमाणावर होत असल्यानं त्याला ग्रामीण आॅलिम्पिक असं म्हटलं जातं. फेब्रुवारी महिन्यात होणारा हा महोत्सव तीन दिवसांचा असतो.

‘पिपलांतरी’
मुलीच्या जन्मानंतर 111 वृक्ष लावणारं गाव

मुलीच्या जन्माकडे नाकं मुरडून पाहणा-या गावांनी आदर्श घ्यावा असं हे गाव. राजस्थानातल्या पिपलांतरी गावातली ही प्रथा एकदम वेगळी आहे. इथे मुलीच्या जन्मानंतर 111 वृक्ष लावण्याची परंपरा आहे. उदयपूरपासून 64 किमी अंतरावर हे गाव वसलेलं आहे. राजस्थान म्हटलं की उदयपूरला तर सगळेच जण आवर्जून जातात. पण एक सकारात्मक पायंडा पाडणा-या या गावालाही आवर्जून भेट द्यावी.
अजूनही अशी काही गावं आहेत, जी स्वत:ची वेगळी ओळख जपून आहेत. त्यामुळं हटके व्हेकेशन प्लॅन करायचं असेल तर अशा एखाद्या गावाला जायला हरकत नाही.

 

Web Title: If you want to see real beautiful India then never miss these 7 villages. Why? Read it!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.