भारतातील 'या' गावात सगळ्यात आधी होतो सूर्योदय, निसर्गाच्या सानिध्यात घालवू शकता वेळ!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 03:03 PM2024-10-19T15:03:33+5:302024-10-19T15:07:41+5:30
तुम्हाला माहीत आहे का की, भारतातील कोणत्या गावात सगळ्यात आधी सूर्योदय होतो? क्वचितच लोकांना याचं उत्तर माहीत असेल.
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. वेगवेगळ्या संस्कृती, वेगवेगळे खाद्यपदार्थ, वेगवेगळ्या भाषा, परंपरा बघायला मिळतात. परदेशातून लोक येथील विविध रंग बघण्यासाठी येतात. सोबतच आणखी एक खास गोष्ट बघण्यासाठी येतात. ती बाब म्हणजे भारतातील एका गावात सगळ्यात आधी होणारा सूर्योदय. तुम्हाला माहीत आहे का की, भारतातील कोणत्या गावात सगळ्यात आधी सूर्योदय होतो? क्वचितच लोकांना याचं उत्तर माहीत असेल. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
आज आम्ही तुम्हाला भारतातील एका अनोख्या गावाबाबत सांगणार आहोत जिथे भारतात सूर्योदय (First sunrise in India) सगळ्यात पहिले होतो. हे एक असं ठिकाण आहे जिथे तुम्ही तुमचं शहरातील धावपळीचं जीवन सोडून काही दिवस शांत आणि आनंदी वेळ घालवू शकता.
1999 मध्ये अरूणाचल प्रदेशातील डोंग नावाच्या एका जागेचा शोध घेण्यात आला. तेव्हा समजलं की, देशात सगळ्यात आधी इथेच सूर्योदय होतो. जेव्हा आपण आपल्या साखर झोपेत असतो तेव्हा इथे सूर्योदय होतो. इथे साधारण पहाटे 4 वाजता सूर्योदय होतो आणि लोक आपापली कामे करू लागतात.
हे गाव जमिनीपासून साधारण 1240 मीटर उंचीवर स्थित आहे. आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी हे गाव ओळखलं जातं. इथे राहणाऱ्या लोकांची संख्या जास्त नाही. कारण हे गाव डोंगराळ भागात आहे. इथे साधारण केवळ चार ते पाच परिवार राहतात. अरूणाचल प्रदेशातील डोंग व्हॅली पर्यटकांची पहिली पसंत असतं. इथे लोक सूर्याची पहिली किरण कॅमेरात कैद करण्यासाठी गर्दी करतात.