३३ हजारात काश्मीरची सहल, आयआरसीटीसीने लॉन्च केलं १२ दिवसांचं पॅकेज!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 03:09 PM2018-08-22T15:09:16+5:302018-08-22T15:09:56+5:30
भारतीय रेल्वेकडून एक १२ दिवसांचं खास पॅकेज लॉन्च करण्यात आलंय. या पॅकेजचं सुरुवातीचं भाडं ३३ हजार रुपये आहे.
नवी दिल्ली : जर तुम्ही काश्मीरला फिरायला जाण्याचा विचार करताय आणि तुम्हाला ही ट्रिप कमी बजेटमध्ये करायची असेल तर एक चांगली संधी आहे. भारतीय रेल्वेकडून एक १२ दिवसांचं खास पॅकेज लॉन्च करण्यात आलंय. या पॅकेजचं सुरुवातीचं भाडं ३३ हजार रुपये आहे.
या पॅकेजमध्ये भारतीय रेल्वे तुम्हाला पंजाब आणि जम्मू-काश्मीरसहीत अनेक शहरांचा प्रवास करवणार. या शहरांच्या यादीत जालंधर, अमृतसर, श्रीनगर, कटरा, गुलमर्ग आणि सोनमर्ग यांचा समावेश आहे. प्रवाशांना एकीकडून रेल्वेने आणि दिल्लीहून विमानाने प्रवास करण्याची संधीही मिळेल.
आयआरसीटीसीनुसार, या पॅकेजसाठी प्रवाशांना त्यांचा प्रवास चेन्नई किंवा विजयवाडा येथून सुरु करावा लागेल. १४ सप्टेंबरला एक स्पेशल रेल्वे कुचुवेली येथून सुटेल आणि २५ सप्टेंबरला दिल्लीला पोहोचेल, १५ सप्टेंबरला ही रेल्वे विजयवाडा पोहोचेल आणि १७ तारखेला सायंकाळी ६ वाजता जालंधरला पोहोचेल.
१८ सप्टेंबरला सर्व प्रवाशांना रस्त्यामार्गे अमृतसरला जावं लागेल. इथे पूर्ण दिवस सुवर्ण मंदिर, जालियनवाला बाग, वाघा बॉर्डर फिरवले जाईल. येथून पुन्हा जालंधरला आणलं जाईल. रात्रभर कटरासाठी प्रवास करावा लागेल. कटरा मार्गे रस्त्यामार्गे श्रीनगरला नेले जाईल.
२० सप्टेंबर ते २३ सप्टेंबरपर्यंत प्रवाशांना काश्मीर घाटीमध्ये फिरण्याची संधी मिळेल. यात एक दिवस श्रीनगर, सोनमार्ग आणि गुलमार्ग यांचा समावेश असेल. २३ तारखेला प्रवाशी निशात बाग आणि शालीमारला फिरू शकतील.
२४ तारखेला प्रवाशांना पुन्हा दिल्लीला आणले जाईल. येथून त्यांना विमानाने चेन्नई, कोच्ची आणि विजयवाडा येथे सोडले जाईल. प्रत्येक प्रवाशाला या पॅकेजसाठी कमीत कमी ३३ हजार ३०० रुपये आणि जास्तीत जास्त ५२ हजार ७५० रुपये द्यावे लागतील.