'ही' ट्रेन नव्हे,चालते-फिरते फाईव्ह स्टार हॉटेल; उन्हाळ्याच्या सुट्टीत करू शकता बुक, रेल्वेची खास ऑफर!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 03:10 PM2024-04-04T15:10:05+5:302024-04-04T15:10:28+5:30
irctc : ट्रेन हेच फिरते पंचतारांकित हॉटेल आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.
नवी दिल्ली : लोकांनी आतापासूनच उन्हाळ्याच्या सुट्यांचे नियोजन सुरू केले असेल. ट्रेन किंवा फ्लाइट बुकिंग, हॉटेल बुकिंग अशा अनेक गोष्टी आधीच लोकांकडून केल्या जातात. अशा लोकांसाठी भारतीय रेल्वेने एक खास पॅकेज आणले आहे, ज्यामध्ये ट्रेनमध्येच पंचतारांकित हॉटेल्ससारख्या सुविधा आहेत. ट्रेन हेच फिरते पंचतारांकित हॉटेल आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.
ही ट्रेन पर्यटकांना, भाविकांना भगवान रामाशी संबंधित ठिकाणावर घेऊन जाईल. IRCTC उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी एसी डिलक्स ट्रेन चालवणार आहे. यामध्ये एसी फर्स्ट कूप, एसी फर्स्ट, एसी सेकंड आणि एसी थर्ड अशा तीन श्रेणीतील कोच असतील. ज्याद्वारे प्रत्येक वर्गातील लोक प्रवास करू शकतात. ही ट्रेन 7 जून रोजी धावणार आहे. संपूर्ण प्रवास 17 रात्र आणि 18 दिवसांचा असेल.
या ट्रेनने प्रवास करणारे प्रवासी देशातील 14 शहरांना भेट देऊ शकतील आणि 39 धार्मिक स्थळांना भेट देऊ शकतील. ही ट्रेन दिल्लीतील सफदरजंग स्टेशनवरून धावणार आहे. रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, श्री रामायण यात्रा ट्रेन अयोध्या, नंदीग्राम, सीतामढी, जनकपूर, वाराणसी, प्रयागराज, चित्रकूट, नाशिक, हम्पी, रामेश्वरम, भद्राचल आणि नागपूर मार्गे दिल्लीला परतेल. यामध्ये प्रवाशांना प्रभू रामाशी संबंधित ठिकाणांना भेट देता येणार आहे.
श्री रामायण यात्रा ट्रेनमध्ये चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी अनेक पर्याय असतील. याचा अर्थ प्रवासी त्यांच्या सोयीनुसार जवळच्या स्थानकावरून चढू आणि उतरू शकतात. दिल्ली व्यतिरिक्त, गाझियाबाद, अलीगढ, तुंडला, इटावा, कानपूर आणि लखनऊ स्थानकांवर ट्रेनमध्ये चढता येते आणि परतीच्यावेळी झाशी, ग्वाल्हेर, आग्रा कँट, मथुरा आणि सफदरजंग स्टेशनवर उतरता येते.
काय आहे प्रवासाचे भाडे?
चारही श्रेणींचे भाडे वेगवेगळे आहे. हे सिंगल, डबल आणि ट्रिपल शेअरिंगसाठी बुक केले जाऊ शकतात. फर्स्ट एसी कूपे 166810 रुपये, फर्स्ट एसी 145745 रुपये, सेकंड एसी 134710 रुपये, थर्ड एसी 94600 रुपये आहे. दरम्यान, हे भाडे 33 टक्के डिस्काउंटनंतर आहे.
'या' ठिकाणांना देता येईल भेट!
- अयोध्या- रामजन्मभूमी मंदिर, हनुमान गढी, सरयू घाट.
- नंदीग्राम- भारत-हनुमान मंदिर आणि भारत कुंड.
- जनकपूर- राम जानकी मंदिर, धनुष धाम मंदिर आणि परशुराम कुंड.
- सीतामढी- जानकी मंदिर आणि पुनौरा धाम.
- बक्सर- राम रेखा घाट, रामेश्वर नाथ मंदिर.
- वाराणसी- तुलसी मानस मंदिर, संकट मोचन मंदिर, विश्वनाथ मंदिर आणि गंगा आरती.
- सीता संहित स्थळ, सीतामढी - सीता माता मंदिर.
- प्रयागराज- भारद्वाज आश्रम, गंगा-यमुना संगम, हनुमान मंदिर.
- शृंगावेरपूर- शृंगी ऋषी समाधी आणि शांता देवी मंदिर, रामचौरा.
- चित्रकूट- गुप्त गोदावरी, रामघाट, सती अनुसुईया मंदिर.
- नाशिक- त्र्यंबकेश्वर मंदिर, पंचवटी, सीतागुफा, काळाराम मंदिर.
- हंपी: अंजनाद्री टेकडी, विरुपाक्ष मंदिर आणि विठ्ठल मंदिर.
- रामेश्वरम- रामनाथस्वामी मंदिर आणि धनुषकोडी.
- भद्राचलम- श्री सीता रामचंद्र स्वामी मंदिर, अंजनेय मंदिर.
- नागपूर- रामटेक किल्ला आणि मंदिर.