पर्यटन करताना अँडव्हेन्चरसारखं काही थ्रील अनुभवायचं असेल तर इस्त्राएलला जा.. ‘डिफेन्स टूरिझम’ ही भन्नाट कल्पना या देशानं शोधून काढली आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 04:34 PM2017-09-08T16:34:49+5:302017-09-08T16:48:51+5:30
लोकांना कसं लपायचं, वेळप्रसंगी बंदूक कशी चालवायची, अनपेक्षित हल्ल्याला प्रत्युत्तर कसं द्यायचं हे शिकण्यात रस आहे. इस्त्राएलमधल्या काही आंत्रेप्रिनर्सनी या सगळ्याचा नीट विचार केला आणि त्यातून व्यवसाय संधी शोधली. त्याचाच परिणाम म्हणजे ही ‘डिफेन्स टूरिझम’ची कल्पना .
- अमृता कदम
भारतानं चीन आणि पाकिस्तानला वठणीवर आणण्यासाठी काय केलं पाहिजे, याच्याबद्दल सामान्य नागरिक जेव्हा तावातावानं चर्चा करतात तेव्हा हमखास उदाहरण दिलं जातं ते इस्त्राएलचं. इस्त्राएलची संरक्षण आणि गुप्तचर यंत्रणा ही जगभरात औत्सुक्य, कौतुक आणि अभ्यासाचा विषय आहे. लोकांच्या याच कुतूहलाचा वापर आपल्या पर्यटन व्यवसायासाठी करून घेण्याचं इस्त्राएलनं ठरवलं आहे. आणि म्हणूनच ‘डिफेन्स टुरिझम’ ही नवी संकल्पना इस्त्राएल विकसित करत आहे. ‘डिफेन्स टुरिझम’चा श्रीगणेशा भारताच्या सहा शहरांमध्ये रोड शो आयोजित करून होणार आहे.
ही एकदम खास संकल्पना आहे. अमेरिका आणि युरोपमधून येणा-या ब-याच पर्यटकांना इस्त्राएलची संरक्षणसिद्धता कशी आहे, युद्धकाळात स्वसंरक्षणासाठी नागरिक नेमकं काय करतात याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता दिसायची. किंबहुना अशा काही संरक्षणाच्या युक्त्या शिकता येतील का? याचाही ते अंदाज घ्यायचे. त्यातूनच आम्हाला आमच्या संरक्षणसिद्धतेतील प्रतिमेचा वापर करत पर्यटनाला अधिकाधिक चालना देण्याची कल्पना सुचली, असं इस्त्राएलच्या पर्यटन मंत्रालयाचे भारतातील संचालक हसन मदाह यांनी सांगितलं.
लोकांना कसं लपायचं, वेळप्रसंगी बंदूक कशी चालवायची, अनपेक्षित हल्ल्याला प्रत्युत्तर कसं द्यायचं हे शिकण्यात रस आहे. हे म्हणजे पेंटबॉल नावाच्या एका एडव्हेन्चर स्पोर्टसारखं आहे. इस्त्राएलमधल्या काही आंत्रेप्रिनर्सनी या सगळ्याचा नीट विचार केला आणि त्यातून व्यवसाय संधी शोधली. त्याचाच परिणाम म्हणजे ही ‘डिफेन्स टूरिझम’ची कल्पना असल्याचं मदाह यांनी म्हटलंय.
एकदा संरक्षण आणि पर्यटनाची सांगड घालायचं ठरल्यानंतर सुरूवात भारतापासून केली जाणार आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जुलैमध्ये इस्त्राएलला दिलेल्या भेटीनंतर दोन्ही देशांतल्या संबंधांचं एक नवीन पर्व सुरु झालं. दोन्ही देशांत निर्माण झालेल्या सकारात्मकतेचा फायदा घेत इस्त्राएलच्या पर्यटन मंत्रालयातील अधिकारी आणि पर्यटन व्यावसायिकांचं शिष्टमंडळ भारताला भेट देत आहे. हे शिष्टमंडळ देशातल्या सहा शहरांमध्ये रोड शो करणार असून प्रत्येक शहरात 100 ट्रॅव्हल एजंटही या शोमध्ये सहभागी होतील.
भारतातून इस्त्राएलला जाणा-या पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळेही भारताची निवड करण्यात आली आहे. जून 2016 मध्ये इस्त्रायलला जाणा-या पर्यटकांच्या तुलनेत जून 2017 मध्ये भारतून इस्त्राएलला जाणा-या पर्यटकांमध्ये तब्बल 79 टक्के वाढ झाली होती. जुलै 2017 पर्यंत इस्त्रायलला भेट देणा-या भारतीय पर्यटकांची संख्या होती 36000.
काहीजण निवांतपणे राहायला म्हणून पर्यटनाला बाहेर पडतात. तर काहींना असं काही थ्रीलिंग अनुभवायचं असतं, जे रोजच्या आयुष्यात आपण कधीच करु शकत नाही. अशा लोकांसाठीच इस्त्राएली आंत्रेप्रिनर्सनी ही भन्नाट कल्पना शोधली आहे.
इस्त्राएलमधलं पर्यटन यापूर्वी शेतीभोवतीच फिरायचं. पाण्याची वानवा असलेला देश अन्नधान्य उत्पादनात अग्रेसर कसा हे जाणून घेण्याच्या ओढीनं पर्यटक इथे यायचे. पण आता आपल्या पर्यटनाला एक वेगळा चेहरा देण्याच्या प्रयत्नात इस्त्रायल आहे. ज्या इस्त्राएलच्या संरक्षणाचे आपण दाखले देतो, त्या इस्त्राएलची सुरक्षा अनुभवण्याची, त्यात सहभागी होण्याची संधीच आता मिळत आहे. ही संधी न चुकवलेलीच चांगली!