Janmashtami 2019 : येथे खिडकीतूनच घ्यावं लागतं श्री कृष्णाचं दर्शन; एकदा नक्की द्या भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 02:34 PM2019-08-21T14:34:34+5:302019-08-21T14:40:15+5:30
Janmashtami 2019: श्री कृष्णाचं आपल्या भक्तांवर असलेलं प्रेम वेळोवेळी अनेक कथांमधून व्यक्त होतं. आज आम्ही तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहोत, त्यातूनही पुन्हा एकदा श्री कृष्ण आपल्या भक्तांसाठी कोणतीही अशक्य गोष्ट शक्य करू शकतात, हे सिद्ध होईल.
श्री कृष्णाचं आपल्या भक्तांवर असलेलं प्रेम वेळोवेळी अनेक कथांमधून व्यक्त होतं. आज आम्ही तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहोत, त्यातूनही पुन्हा एकदा श्री कृष्ण आपल्या भक्तांसाठी कोणतीही अशक्य गोष्ट शक्य करू शकतात, हे सिद्ध होईल. कर्नाटकातील उडुपी शहरामध्ये भगवान श्री कृष्णांचं एक फार सुंदर मंदिर आहे. जर तुम्हीही एखाद्या धार्मिक यात्रेसाठी जाण्याच्या विचारात असाल तर, उडुपीमधीस भक्त आणि श्री कृष्णांच्या प्रेमाचं प्रतिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंदिराला नक्की भेट द्या...
अशी मान्यता आहे...
उडुपी मंदिराची स्थापना 13 व्या शतकामध्ये वैष्णव संत श्री माधवाचार्य यांनी केली होती. असं सांगितलं जातं की, देवाचे एक भक्त होते, त्यांचं नाव कनकदास असं होतं. परंतु, काही कारणांमुळे त्यांना मंदिराच्या आतमध्ये जाऊ दिलं जात नव्हतं. त्यांनी देवाचं दर्शव व्हावं यासाठी देवाकडेच प्रार्थना केली. यावर असं सांगितलं जातं की, स्वतः देवानेच आपल्या भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी एक अनोखा मार्ग शोधून काढला. देवानेच मंदिराच्या मागील बाजूस एक खिडकी तयार केली. असं सांगितलं जातं की, कनकदास यांनी याच खिडकीतून देवाचं दर्शन घेतलं होतं. त्यानंतर देवाचं दर्शन खिडकीतून घेण्यची परंपरा रूढ झाली.
अद्भूत आहे श्री कृष्णाची प्रतिमा...
मंदिरामध्ये स्थापन केलेली श्री कृष्णाची प्रतिमा बालपणीची आहे. बालपणीचं हे मनमोहक रूप अत्यंत सुंदर आहे. श्री कृष्णाचं हे रूप अनेक भक्तांच्या काळजाचा ठाव घेतं.
मंदिरामध्ये यावेळी घेता येतं दर्शन
उडुपीमध्ये श्रीकृष्णाचं दर्शन घेण्यासाठी भक्त सकाळी साडे सहापासून दुपारी दीड वाजेपर्यंत जाऊ शकतात. याव्यतिरिक्त सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 12च्या दरम्यान देवाची पूजा करण्यात येते. तसेच संध्याकाळी 5 वाजल्यापासून पुन्हा भक्तांसाठी मंदिर खुलं करण्यात येतं.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.