हिंमत आणि उमेद देणारा स्वप्नपूर्तीचा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 03:17 PM2017-08-30T15:17:43+5:302017-08-31T18:12:11+5:30
कुठल्याही विद्यापीठातून आणि उत्तमोत्तम शिक्षकाकडून मिळणार नाही असं शिक्षण मिळू शकतं फक्त प्रवासातून!
- मयूर पठाडे
प्रवासानं आपल्याला काय मिळत नाही? प्रवास आपल्याला समृद्ध करतो, आपल्या आयुष्याला नवी दिशा देतो, आपल्यातल्या क्षमतांची, उणिवांची जाणीव तर तो अपल्याला करून देतोच, पण आपल्या आयुष्यात सुखाची, आनंदाची पेरणीही करतो.
त्यामुळेच प्रवासाचा आनंद सगळ्यांनीच घेतला पाहिजे. गेल्या भागात आपण प्रवासाचे काही फायदे बघितले, आणखी काही फायदे बघूया, या भागात. प्रवासाचा अनुभव आपल्या आयुष्यात एक नवी ऊर्जा भरेल, एक नवं चैतन्य तुमच्यात सळसळायला लागेल. अगदी नक्की. पहा तर घेऊन अनुभव. पण हा अनुभव डोळस असला पाहिजे, एवढी एकच या प्रवासाची अट आहे.
काय मिळतं प्रवासानं?
१- प्रवास म्हणजे एक उत्तम शिक्षण आहे. जे शिक्षण तुम्हाला शाळा, कॉलेजात जाऊन आणि उत्तमातल्या उत्तम शिक्षकाकडून मिळणार नाही असं शिक्षण तुम्हाला प्रवासातून मिळू शकतं.
२- प्रवासानं तुम्ही आव्हानांशी मुकाबला करायला शिकता आणि नवनवी आव्हानं घेण्याची वृत्तीही तुमच्यात तयार होते.
३- आपल्या स्वप्नपूर्तीसाठीही प्रवास तुम्हाला मदत करतं. निसर्गाचं बोट धरुन आपल्या स्वप्नाच्या दिशेनं जाण्यासाठीची हिंमत आणि उमेद तुमच्यात तयार होते.
४- प्रत्येक ठिकाणची संस्कृती वेगळी असते, त्या त्या ठिकाणचं वैशिष्ट्य वेगळं असतं. त्याला इतिहास असतो, भूगोल असतो. खाद्य संस्कृती असते. त्याचा विशिष्ट असा फ्लेवर असतो. या सगळ्याचे साक्षीदार तुम्ही प्रवासामुळे होतात.
५- ठिकठिकाणच्या लोकांमध्ये जर तुम्ही मिसळलात तर तिथल्या लोककला आणि लोकसंस्कृतीशीही तुमचा परिचय होऊ शकतो. काही ठिकाणची लोकसंस्कृती तर आजच्या आधुनिक विचारांनाही तोंडात बोट घालायला लावील इतकी प्रागतिक विचारांची आहे.
६- प्रत्येक क्षेत्रात प्रवासाचा फायदा होतो. तुमची नाती सुधरण्यात, जॉबमध्ये, कुटुंबात, आॅफिसातलं रिलेशन चांगलं होण्यात, अशाही गोष्टींत प्रवास आपलं योगदान देतं आणि ते संशोधकांनी वेगवेगळ्या प्रयोगांतून सिद्धही केलं आहे.