चल बस, हे पुस्तक वाचू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2019 12:45 AM2019-06-09T00:45:37+5:302019-06-09T00:45:41+5:30

चल बस, एक राउंड मारून येऊ! या वेगळ्या आणि काहीशा विचित्र नावाचा, लघुत्तम कथासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. संवेदना प्रकाशनने तो प्रकाशित केला आहे.

Just walk, read this book! | चल बस, हे पुस्तक वाचू !

चल बस, हे पुस्तक वाचू !

Next

- नारायण लाळे

चल बस, एक राउंड मारून येऊ! या वेगळ्या आणि काहीशा विचित्र नावाचा, लघुत्तम कथासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. संवेदना प्रकाशनने तो प्रकाशित केला आहे. या कथासंग्रहाचे मुखपृष्ठ शैलेश सावंत-भोसले यांनी चितारले आहे. कवी भगवान निळे यांनी या कथासंग्रहाची पाठराखण केली आहे आणि कवयित्री योगिनी राऊळ यांनी, संग्रहाचे कथालेखक सुहास मळेकर यांना सुयोग्य मार्गदर्शन केले आहे. एकूण संग्रहाची निर्मिती देखणी आणि म्हणूनच उत्सुकता वाढवणारी आहे. संग्रहाचे लेखक सुहास मळेकर यांचे मनोगत संग्रहातील कथांची झलक दर्शवणारे आहे. चंद्रकांत खोत यांच्यासारख्या एका मोठ्या लेखकाचे पाठबळ या संग्रहाला लाभले आहे. ‘माझे साहित्यिक गुरू चंद्रकांत खोत’ असा आदरपूर्वक उल्लेख सुहास मळेकर यांनी त्यांच्या मनोगतात केला आहे. संग्रहातील एकूण कथांमधून ‘मी’ डोकावताना दिसेन, असे मळेकर यांनी स्पष्ट केले आहे. आत्मपर कथा म्हणूनही या कथांचा उल्लेख करता येईल. वडिलांकडून पुस्तक वाचनाची मिळालेली प्रेरणा मळेकर यांना त्यांच्या कथालेखनासाठी प्रवृत्त करणारी ठरली आणि त्याचेच हे दृश्य रूप म्हणजे, ‘चल बस, एक राउंड मारून येऊ!’ हा संग्रह वाचकांच्या हाती आला आहे.
मराठी साहित्यात गद्यलेखनातील अनेक प्रकार सांगता येतील. कथा, लघुकथा, लघुत्तम कथा, दीर्घकथा, लघुकादंबरी, कादंबरी असे अनेक प्रकार असून, शिवाय ललित गद्य, स्फूट, वृत्तपत्रीय लेखन असेही गद्य लेखनाचे प्रकार आहेत. ‘चल बस, एक राउंड मारून येऊ!’मध्ये सुहास मळेकर यांचे हे स्फूटलेखन आहे, असे मला म्हणायचे आहे. या स्फूटलेखनाची प्रसिद्धी वृत्तपत्रांतून झाली असल्याचे मळेकरांनी सांगितले आहे. सुहास मळेकर यांना आणखी एक डोळा आहे! त्याला मी ‘तिसरा डोळा’ म्हणेन. म्हणजे त्यांचा कॅमेरा! या क्षेत्रातील त्यांचे अनुभव, दृश्ये, निरीक्षण त्यांनी या तिसऱ्या डोळ्याने टिपले आहे. तेच अनुभव मळेकर यांनी या स्फूटलेखांद्वारे मांडले आहेत. प्रथमदर्शनी या संग्रहाचे नाव अनोखे वाटत असले, तरी या नावाचेच एक स्फूट संग्रहात समाविष्ट आहे. ते वाचून आपण चकित होतो आणि त्याचवेळी मळेकर यांच्या स्फूटलेखनाची ताकदही वाचकांच्या लक्षात येते.
सुहास मळेकर यांचे प्रत्येक स्फूट त्यांच्या अनुभवातून साकारले आहे. ‘काल्पनिक’ला त्यांनी कुठेच थारा दिलेला नाही. स्फूट लिहिताना मळेकर यांची भाषाही तितकीच ओघवती, सोपी, लहानलहान वाक्यांनी समृद्ध झालेली दिसते. संग्रहातील ‘समृद्धा’ हा लेख वाचतानाही असाच अनुभव येतो. कचरा गोळा करणारी भिकारीण, एका बाजूला विश्रांतीसाठी बसलेली आहे. तिच्या पोत्यात अनेक तुटक्याफुटक्या वस्तू. त्यात ती काहीतरी शोधून एक लहानशी बाटली बाहेर काढते. ती बाटली म्हणजे नेलपॉलीशची फेकून दिलेली बाटली असते. ती कचरा गोळा करणारी बाई स्त्रीसुलभ भावनेने नेलपेंट काढून नखं रंगवीत असते. या एकपानी स्फूटलेखातून मळेकर यांनी स्त्रीच्या मनात उपजत असलेली ‘चांगलं दिसण्याची’ भावना सांगितली आहे.
‘एक काळाकुट्ट मुलगा’मधील प्रभूबार्इंची व्यक्तिरेखा एक आदर्श म्हणून समोर ठेवावी अशी आहे. या लेखामधूनदेखील मळेकर यांनी, स्वप्न देणाºया व्यक्तींबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. एक स्त्री शिक्षिका सतत मनोबल खच्ची करणारी वागणूक देते आणि एक स्त्री (प्रभूबाई) शिक्षिका सकारात्मक वागून मनोबल वाढवणारी ऊर्जा देते. या स्फूटलेखातूनही लेखक बरंच काही सांगून जातो. ‘संस्कार’ या एकपानी स्फूटलेखातूनही लेखक, संस्कार म्हणजे काय, काही संस्कारांची उकल मोठेपणी कशी होते, याचे वर्णन करतो.
अनुभवातला चटका लावणारा क्षण स्फूटलेखात उतरवणं, हे लेखकाचं कसब असतं आणि तेही मोजक्याच शब्दांमधून. याच कारणास्तव स्फूटलेखनाचा वाचक मोठा आहे. वृत्तपत्रांतील रविवारच्या पुरवण्यांचं यश, यातच दडलेलं आहे, असं म्हटलं तर ते गैर ठरू नये. ‘चल बस, एक राउंड मारून येऊ’ हे पुस्तक एखाद्या वाचकाच्या हाती पडलं आणि तो म्हणाला की, ‘चल बस, आधी हे पुस्तक वाचून काढू’ तर त्याचे आश्चर्य वाटू नये. 

चल बस, एक राउंड मारून येऊ ! हा सुहास मळेकर लिखित काहीशा विचित्र नावाचा, लघुत्तम कथासंग्रह नुकताच प्रकाशित झाला. आत्मपर कथा म्हणूनही यातील कथांचा उल्लेख करता येईल. एकूणच हे स्फूटलेखन असून साध्या,सोप्या भाषेत आणि त्यांच्या अनुभवातून साकारलेले आहे. स्फूटलेखनाची मांडणी करताना प्रत्येक घटना मनाला चटका लावते आणि विचार करायला भाग पाडते हे नक्की. संग्रहातील प्रत्येक लेखातील सामाजिक भान असलेली लेखकाची दृष्टी, मोजक्याच शब्दांत आणि मोजक्याच जागेत केलेली लेखांची मांडणी वाचकांना सुखद ठरते. प्रत्येक लेख प्रबोधन करणारा ठरतो.

चल बस, एक राउंड मारून येऊ! मध्ये ‘मी’ने त्याच्या दोन मित्रांची वृत्ती दाखवली आहे. एक गरीब मित्र त्याला मिळालेली सायकल, जुनी पुराणी वापरलेली... असे असूनही मित्र लेखकाला मोठ्या कौतुकाने, प्रेमाने, मित्रत्वाच्या नात्याने दाखवतो आणि सांगतो, चल बस, सायकलवर, तुला एक राउंड मारून आणतो... आणि एक श्रीमंत झालेला मित्र, एक कोटीचं पॅकेज मिळालेला, महागड्या कारने फिरणारा, परंतु तुच्छतेने लेखकाला कमी लेखणारा म्हणतो, ‘चल बस, माझ्या पॉश कारमध्ये, तुला एक राउंड मारून आणतो’. गरीब व त्याची वृत्ती आणि एक श्रीमंतीनं उद्दाम झालेली वृत्ती, असा मोठा पट या स्फूटलेखनातून वाचकांच्या लक्षात येतो आणि या संग्रहाच्या नावाचाही उलगडा होतो.

Web Title: Just walk, read this book!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे