यंदा काय असणार काळा घोडा आर्ट फेस्टिव्हलचं आकर्षण?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 04:39 PM2019-01-31T16:39:11+5:302019-01-31T16:43:19+5:30
दक्षिण मुंबईमध्ये आयोजित करण्यात येणारा काळा घोडा आर्ट फेस्टिव्हल (केजीएएफ) हा भारतातील सर्वात मोठा सांस्कृतिक स्ट्रीट फेस्टिव्हल म्हणून ओळखला जातो.
दक्षिण मुंबईमध्ये आयोजित करण्यात येणारा काळा घोडा आर्ट फेस्टिव्हल (केजीएएफ) हा भारतातील सर्वात मोठा सांस्कृतिक स्ट्रीट फेस्टिव्हल म्हणून ओळखला जातो. या फेस्टिव्हलचं यंदाचं विसावं वर्ष असून तब्बल दोन दशकं हा फेस्टिव्हल लोकांच्या मनावर राज्य करत आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 2 ते 10 फेब्रुवारीदरम्यान रंगणाऱ्या या फेस्टिव्हलमध्ये कलाप्रेमींसाठी अनेक गोष्टींची मेजवाणी असणार आहे. तसेच डिझाइन, सिनेमा, नाटक, नृत्य, साहित्य आणि अनेक विविध प्रकारांतून हा फेस्टिव्हल साजरा करण्यात येणार आहे. तसेच या वर्षी महात्मा गांधीजींची 150वी जयंती असून या फेस्टिव्हलमधूनही गांधीजींना मानवंदना देण्यात येणार आहे.
अनेक देशी-विदेशी पर्यटक या फेस्टिव्हलसाठी मुंबईत येत असतात. काही वेगळ्या गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी आणि वेगवेगळ्या कला अनुभवण्यासाठी तुम्ही एकदा तरी या फेस्टिव्हलला भेट देणं आवश्यक आहे.
जाणून घेऊया Kala Ghoda Arts Festival मध्ये काय असतं खास :
1. काळा घोडा आर्ट फेस्टिव्हल दरवर्षी 9 दिवसांपर्यंत चालतो. प्रत्येक वर्षी हा फेस्टिव्हल फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या शनिवारी सुरू होतो आणि 9 दिवसांपर्यंत चालतो.
2. यावर्षी हा फस्टिव्हल 2 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून 10 फेब्रुवारीला संपणार आहे. फेस्टिव्हल दररोज सकाळी 10 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत कलाप्रेमींसाठी सुरू राहणार आहे.
3. या फेस्टिव्हलची सुरुवात 1999मध्ये करण्यात आली असून याला देशातील सर्वात मोठा सांस्कृतिक फेस्टिव्हल म्हणून ओळखण्यात येते. दरवर्षी येथे जगभरातून अनेक पर्यटक येत असतात. या फेस्टिव्हलमध्ये कला, क्राफ्ट, सिनेमा, नाटक, नृत्य, साहित्यसंबंधी अॅक्टिव्हिटीज ठेवल्या जातात.
4. लहान मुलांसाठीही काही वर्कशॉप आणि इतर इव्हेंट्स ठेवले जातात. तुम्ही फूडी असाल तर येथ तुम्हाला अनेक नवनवीन पदार्थांची चव चाखता येणार आहे. तसेच या फेस्टिव्हलमध्ये फॅशन रिलेटेड अनेक गोष्टीही उपलब्ध असतात.
5. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या फेस्टिव्हलमध्ये जाण्याची इच्छा असेल तर तुम्हाला कोणता खर्चही करावा लागणार नाही. येथे फिरण्यासाठी कोणतंही शुल्क आकारण्यात येत नाही.
कसे पोहोचाल?
तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स (सीएसएमटी) पासून शेअर टॅक्सी किंवा चालतही जाऊ शकता. त्याऐवजी चर्चगेट स्टेशनपासूनही तुम्ही अवघ्या काही मिनिटांमध्ये फेस्टिव्हलच्या ठिकाणी पोहचू शकतात.