'या' नदीच्या पाण्याला हात लावायला चळाचळा कापतात लोक, यामागे दडलेली आहे एक गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 07:30 PM2022-02-02T19:30:23+5:302022-02-02T19:35:01+5:30

भारतात नदीचा महिमा इतका महान असतानाच एक नदी अशीही आहे जिचे पाणी पिणे तर सोडाच पण पाण्याला स्पर्श करताना सुद्धा लोक घाबरतात.

karmnasha river in Bihar famous for its story | 'या' नदीच्या पाण्याला हात लावायला चळाचळा कापतात लोक, यामागे दडलेली आहे एक गोष्ट

'या' नदीच्या पाण्याला हात लावायला चळाचळा कापतात लोक, यामागे दडलेली आहे एक गोष्ट

Next

भारतात कोणतीही नदी पवित्र मानली जाते. येथे नदीला माता म्हटले जाते. गंगामाता ही देशातील सर्वात पवित्र नदी असून देशात विविध शुभ कार्यात नद्यांचे पवित्र जल वापरण्याची प्रथा फार पुरातन आहे. भारतात नदीचा महिमा इतका महान असतानाच एक नदी अशीही आहे जिचे पाणी पिणे तर सोडाच पण पाण्याला स्पर्श करताना सुद्धा लोक घाबरतात. या नदीच्या पाण्याला स्पर्श झाला तर तुमची सगळी चांगली कर्मे नाश पावतात असा समज आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशातून वाहणाऱ्या या नदीचे नावच मुळी कर्मनाशा असे आहे.

कर्मनाशा हा शब्द कर्म म्हणजे काम आणि नाशा म्हणजे नाश अश्या दोन शब्दातून बनला आहे. या नदीविषयी अनेक कथा प्रचलित आहेत. प्राचीन काळी या नदीचे पाणी वापरून अन्न शिजविले जात नसे तर तिच्या काठावर राहणारे लोक फळे खाऊन गुजराण करत असे सांगितले जाते. ही नदी बिहारच्या कैमुर जिल्ह्यात उगम पावते आणि उत्तर प्रदेशातील सोनभद्र, चांदोली, वाराणसी, गाझीपुर अशी वाहत अखेरी गंगेला मिळते. १९२ किमी लांबीच्या या नदीचा ११२ किमीचा प्रवास उत्तर प्रदेशातून होतो.

पौराणिक कथेनुसार सत्यवचनी राजा हरिश्चंद्र यांचा पिता सत्यव्रत याने त्याचे गुरु वशिष्ठ यांच्याकडे सदेह स्वर्गात जाता यावे असे वरदान मागितले पण वशिष्ट ऋषींनी त्याला नकार दिला. तेव्हा नाराज झालेल्या राजाने विश्वामित्र ऋषींच्या कडे हीच इच्छा व्यक्त केली. विश्वामित्र आणि वशिष्ट ऋषी यांच्यात शत्रुत्व होते त्यामुळे विश्वामित्रांनी तपाच्या बळावर सत्यव्रताला स्वर्गात पाठविले. पण त्यामुळे इंद्र रागावला आणि त्याने सत्यव्रताला डोके खाली, पाय वर, अश्या अवस्थेत स्वर्गातून परत खाली पाठविले. पण विश्वामित्रांनी त्याला मध्येच रोखले आणि तो अधांतरी राहिला त्याला त्रिशंकू अवस्था प्राप्त झाली.

इकडे देवता आणि विश्वामित्र यांच्यात युध्द सुरु झाले तेव्हा त्रिशंकूचे डोके खाली असल्याने त्याच्या तोंडातून वेगाने लाळ पृथ्वीवर गळली आणि त्यातून कर्मनाशा नदी बनली असे मानतात. ऋषी वशिष्ठ यांनी राजाला चांडाळ होशील असा शाप दिला होता. त्यामुळे या नदीच्या पाण्याला स्पर्श केला तर माणसाचे सर्व पुण्य कर्म नष्ट होते असा समज निर्माण झाला. आज घडीला प्रत्यक्षात मात्र नदीचे पाणी वापरले जाते, त्यावर शेती केली जाते असेही समजते.

Web Title: karmnasha river in Bihar famous for its story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.