एक रांगणा खबरदार तर सर्व सुरक्षित
By नामदेव मोरे | Published: June 11, 2023 01:35 PM2023-06-11T13:35:25+5:302023-06-11T13:36:37+5:30
राजमाता जिजाऊंनी स्वत: मोहीम काढून हा किल्ला जिंकला असल्यामुळेही त्याला इतिहासात वेगळे स्थान प्राप्त झाले आहे.
- नामदेव मोरे, किल्ले रांगणा ऊर्फ प्रसिद्धगड सह्याद्रीच्या रांगेतून दक्षिणेस पसरलेल्या व घाटमाथ्यापासून अलग झालेल्या डोंगरावर गोवा, कोकण व महाराष्ट्र यांच्या जवळ मोक्याच्या ठिकाणी वसला आहे. शिलाहार राजा दुसरा भोज याने हा किल्ला बांधला असला, तरी स्वराज्यात त्याला विशेष महत्त्व. राजमाता जिजाऊंनी स्वत: मोहीम काढून हा किल्ला जिंकला असल्यामुळेही त्याला इतिहासात वेगळे स्थान प्राप्त झाले आहे.
कोल्हापूरच्या माणसांप्रमाणे तेथील किल्लेही रांगडेच. जिल्ह्यातील १३ प्रमुख किल्ल्यांमध्ये सर्वांत रांगडा म्हणून रांगणाची ओळख आहे. इतिहासातील अनेक घटनांचा साक्षीदार असलेल्या या किल्ल्याविषयी ‘एक रांगणा खबरदार तर सर्व सुरक्षित’ असे म्हटले जाते. या वैशिष्ट्यामुळेच इतिहासप्रेमींची पावले गडाकडे वळत असतात.
औरंगजेबाच्या दख्खन मोहिमेमध्येही त्याला हा किल्ला जिंकता आला नाही. गडाच्या भव्य बुरुजाच्या डाव्या बाजूने दरीच्या माथ्यावरून छोट्या वाटेने पुढे गेल्यावर पहिला दरवाजा येतो. रणमंडळ संज्ञेप्रमाणे या दरवाजाची रचना केली आहे. पहिल्या दरवाजापासून पुढे गेले की बुरुजाआड लपलेला दुसरा दरवाजा आढळतो. पायवाटेने पुढे गेले की कोरडा तलाव, दगडात बांधलेली जोती आढळतात. एक बुरुजात हनुमंताचे शिल्प कोरलेले पाहावयास मिळते.
गडावर बारमाही पाणी असलेला तलाव पाहावयास मिळतो. रांगणाई मंदिर व इतर छोटी मंदिरेही आहेत. गडावर ऐतिहासिक वास्तूंचे अवशेष, तलाव, दरवाजे, तटबंदी व पाहण्यासारखे बरेच काही आहे. गडाच्या सभोवतीचे जंगल, भौगोलिकदृष्ट्या असलेले महत्त्व लक्षात येते. प्रत्येक इतिहासप्रेमींनी भेट द्यावी, असाच हा किल्ला असून वर्षभर शिवप्रेमींचा गडावर राबता असतो.
काय पाहाल?
- गडावरील पहिला, दुसरा दरवाजा, रांगणाई देवीचे मंदिर, शिवमंदिर, वाडा, वाड्यातील विहिर, तटबंदी, जुन्या बांधकामाचे अवशेष, शिलालेख, भव्य तटबंदी, चिलखती बुरूज आहे.
- कोकणातील सिंधुदुर्ग व कोल्हापूरच्या सीमेवर असलेला हा किल्ला म्हणजे स्वराज्याचा राखणदारच.
- या गडालाही निसर्गाचे वरदान लाभले असून पुरातन बांधकामाच्या व इतिहासाच्या अनेक पाऊलखुणा येथे पाहावयास मिळत असतात.
- माथ्यावरील बारा कमानी असलेल्या दगडात खोदून काढलेला दरवाजाही पाहता येतो.
कसे जाल?
कोल्हापूर-गारगोटी कडगावमार्गे पारगावला जाता येते. पाटगावपासून तांब्याचीवाडी मार्गे पटवाडी व तेथून पुढे चिक्केवाडीपर्यंत जाता येते. चिक्केवाडीतून पायवाट रांगण्यावर जाते. कोकणातील कुडाळजवळील नारुर आणि केखडे गावातूनही रांगणा किल्ल्यावर जाण्यासाठी वाट आहे.