जगातली दुसरी सर्वात मोठी भिंत असलेला कुंभलगढ किल्ला, कसे आणि कधी जाल?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 01:13 PM2018-11-28T13:13:29+5:302018-11-28T13:19:04+5:30
राजस्थानमधील राजसमन्द जिल्ह्यातील कुंभलगढ किल्ला हा भारतातील सर्वश्रेष्ठ किल्ल्यांपैकी एक आहे. १५व्या शतकात राणा कुंभा यांनी हा किल्ला बांधला होता.
राजस्थानमधील राजसमन्द जिल्ह्यातील कुंभलगढ किल्ला हा भारतातील सर्वश्रेष्ठ किल्ल्यांपैकी एक आहे. १५व्या शतकात राणा कुंभा यांनी हा किल्ला बांधला होता. या किल्ल्याची भिंत ही जगातली दुसरी सर्वात मोठी भिंत आहे. ही भिंत ३६ किमी लांब आणि १५ फूट रुंद आहे. असे म्हटले जाते की, यावर एकत्र पाच घोडे धावू शकतात.
या किल्ल्याच्या आत ३६० मंदिरे आहेत. ज्यात ३०० प्राचीन जैन मंदिर आणि काही हिंदू मंदिरांचा समावेश आहे. हा एक अभेद्य किल्ला असून शत्रू कधीही या किल्ल्याची भिंत पार करु शकले नाहीत. किल्ल्याच्या चारही बाजूंनी ही भिंत उभारली असून ही भिंत चीननंतर जगातली दुसरी सर्वात मोठी भिंत आहे.
राजस्थानच्या आमेर, जेसलमेर, रणथम्बोर, चित्तोडगढ आणि कुंभलगढ किल्ल्यांचा २०१३ मध्ये वर्ल्ड हेरिटेज साइट यादीत समावेश करण्यात आला आहे.
किल्ल्याची बनावट
या किल्ल्याची उभारणी १४४३ मध्ये सुरु केली होती आणि तब्बल १५ वर्षांनंतर म्हणजेच १४५८ मध्ये हा किल्ला बांधून पूर्ण झाला होता. या किल्ल्याच्या उंच जागांवर मंदिरे, महल आणि राहण्यासाठी इमारती बांधल्या आहेत. तर सपाट जागांचा वापर शेतीसाठी केला गेलाय. तर खोल भागांचा वापर पाणी साचवण्यासाठी केला गेलाय.
या किल्ल्याच्या आत आणखी एक किल्ला असून त्याला कटारगढ या नावाने ओळखले जाते. या किल्ल्याला सात विशाल दारं असून ते आजही सुरक्षित आहेत. या किल्ल्याच्या प्रमुख भागात बादल महल आणि कुंभा महल सर्वात वर आहेत. महाराणा उदय सिंह यांनाही पन्ना धायने याच किल्ल्यात लपवून पालन पोषण केलं होतं.
कधी जाल?
ऑक्टोबर ते मार्च महिन्यादरम्यानचा काळ इथे फिरायला जाण्यासाठी परफेक्ट काळ आहे. उन्हाळ्यात इथे फिरायला येण्याची चूक अजिबात करु नये. कारण त्यावेळी इथलं तापमान ३२ ते ४५ डिग्री असतं. तर पावसाळ्यात फार जास्त प्रमाणात पाऊस असतो.
कसे जाल?
विमान मार्गे - उदयपूर हे येथील सर्वात जवळचं एअरपोर्ट आहे. हे कुंभलगढपासून दोन तासांच्या अंतरावर आहे. दिल्ली आणि मुंबईहून इथे येण्यासाठी फ्लाइट उपलब्ध आहेत. त्यासोबतच अहमदाबादहूनही तुम्ही विमानाने उदयपूरला पोहोचू शकता.
रेल्वे मार्ग - फालना हे येथील सर्वात जवळील रेल्वे स्टेशन आहे. या रेल्वे स्टेशनपासून कुंभलगढ केवळ ८४ किमी अंतरावर आहे. सर्वच मोठ्या शहरांमधून इथे पोहोचण्यासाठी रेल्वे सेवा उपलब्ध आहे.
रस्ते मार्ग - राजसमंदहून कुंभलगढचं अंतर हे ४८ किमी आहे. नाथव्दारहून ५१ किमी, सदरीहून ६० किमी, उदयपूरहून १०५ किमी, भीलवाडाहून १५७ किमी, जोधपूरहून २०७ किमी, अजमेरहून २१३ किमी आणि जयपूरहून ३४५ किमी अंतर आहे.