उत्तराखंडमधील 'लोहाघाट'ला आवर्जून द्या भेट, तुम्हीही म्हणाल 'स्वर्ग' इथेच!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 12:18 PM2019-02-27T12:18:11+5:302019-02-27T12:23:58+5:30
असे म्हणतात की, निसर्गाला जवळून बघायचं असेल, त्याच्या कुशीत शिरून आनंद मिळवायचा असेल तर एकदा उत्तराखंडला नक्की भेट द्यावी.
असे म्हणतात की, निसर्गाला जवळून बघायचं असेल, त्याच्या कुशीत शिरून आनंद मिळवायचा असेल तर एकदा उत्तराखंडला नक्की भेट द्यावी. उत्तराखंड भारतातील एक लोकप्रिय डेस्टिनेशन आहे. त्याला कारणेही तशीच आहेत. उत्तराखंडमध्ये तशी अनेक ठिकाणे लोकप्रिय आहेत. पण अजूनही अशी काही ठिकाणे आहेत ज्यांना पर्यटकांचा फार जास्त स्पर्शच झाला नाही.
म्हणजे बघा ना इतर ठिकाणांच्या तुलनेत पर्यटक या गुप्त ठिकाणांकडे फार कमी फिरकतात. पण ही ठिकाणे फार सुंदर आहेत. उत्तराखंडमध्ये असलेलं असंच एक ठिकाण म्हणजे लोहाघाट.
काश्मीर नाही लोहाघाटमध्ये आहे स्वर्ग
लोहाघाट हे भलेही एक लोकप्रिय डेस्टिनेशन नसलं तरी सुद्धा तुम्ही इथे क्वालिटी टाइम स्पेंड करू शकता. एकदा जर तुम्ही इथे आलात तर येथील अनेक गोष्टी नेहमीसाठी तुमच्या मनात घर करून राहतील. एकदा चीनी व्यापारी पी बॅरोन यांनी या ठिकाणाबद्दल एका वाक्य लिहिलं होतं, Why go to Kashmir, if there is heaven in the world, so its in Lohaghat. यावरूनच या ठिकाणं सौंदर्य कसं असेल हे दिसून येतं.
ऐतिहासिक आणि धार्मिक मान्यतांमुळे चर्चा
लोहाघाट हे उत्तराखंडच्या चंपावत जिल्ह्यात लोहावती नदीच्या किनाऱ्यावर आहे. आणि येथील मंदिरे चांगलीच लोकप्रिय आहेत. या ठिकाणाबाबत सांगितल्या जाणाऱ्या ऐतिहासिक आणि धार्मिक मान्यतांमुळे या ठिकाणाची नेहमी चर्चा होत असते. खास बाब म्हणजे लोहाघाटजवळ अनेक लोकप्रिय स्पॉट्स आहेत. ज्यात श्यामला ताल, देवीधुरा, गुरूद्वारा रीठा साहिब, एबॉट माऊंट, वाणासुरचा किल्ला यांचा समावेश आहे.
अव्दैत आश्रम
येथील प्रमुख आकर्षणांमध्ये अव्दैत आश्रम आहे. हे मायावतीमध्ये आहे. हा आश्रम रामकृष्ण मठ शाखेची एक ब्रॅंच आहे. हा आश्रम वेगवेगळ्या सुंदर डोंगरांनी वेढलेला आहे. निसर्गाच्या कुशीत असलेला हा आश्रम स्वामी विवेकानंद यांचे शिष्य स्वामी स्वरूपानंद आणि त्यांच्या एका परदेशी शिष्याने १८९९ मध्ये सुरू केला होता. स्वामी विवेकानंद देखील काही दिवस या आश्रमात थांबले होते.
बाणासुर किल्ला
(Image Credit : euttaranchal.com)
लोहाघाटमधील आणखी एक आकर्षण म्हणजे बाणापुर किल्ला. हा किल्ला येथून ७ किमी अंतरावर आहे. असे मानले जाते की, हे तेच ठिकाण आहे जिथे भगवान श्रीकृष्णाने बाणासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. या किल्ल्याच्या एका बाजूने हिमालयाचे उंचच उंच डोंगर दिसतात. तर दुसरीकडे अद्वैत आश्रम आणि इतर पर्यटन स्थळे.
एबॉट माऊंट
या ठिकाणाचा शोध स्वातंत्र्यांपूर्वी जॉन एबॉट नावाच्या एका इंग्रजाने लावला होता. त्यामुळे या ठिकाणाला त्याचच नाव देण्यात आलंय. ७ हजार फूट उंचीवर असलेल्या एबॉटहून हिमालयातील बर्फाने झाकलेल्या डोंगरांचा सुंदर नजारा बघायला मिळतो. इथे साधारण १३ कॉटेज आहेत.
(Image Credit : eUttaranchal)
कसे पोहोचाल लोहाघाट?
लोहाघाटला जाण्यासाठी पतंगनगर हे सर्वात जवळचं विमानतळ आहे. जे शहरापासून १८२ किलोमीटर अंतरावर आहे. लोहाघाटला जाण्यासाठी पंतनगरहून कॅबने किंवा टॅक्सीने जाऊ शकता. जर तुम्ही रस्ते मार्गाने जाणार असाल तर तुम्हाला एक वेगळाच अनुभव मिळेल. तर रेल्वे मार्गाने जाणार असाल तर लोहाघाटला जाण्यासाठी टनकपूर हे सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन आहे. हे लोहाघाटपासून ८७ किलोमीटर अंतरावर आहे.
कधी जाल?
तसं तर येथील वातावरण हे वर्षभर चांगलं असतं. पण उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात इथे याल तर तुम्हाला जास्त एन्जॉय करता येईल. लोहाघाटमध्ये उन्हाळा हा एप्रिल ते जूनपर्यंत असतो. त्यानंतर इथे पावसाला सुरूवात होते.