भारतातील 'अशी' एकमेव नदी जी समुद्राला कधीच मिळत नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 03:23 PM2019-09-21T15:23:26+5:302019-09-21T15:24:35+5:30
प्राचीन काळापासूनच मानव नदी किनाऱ्याजवळ आपलं बस्तान बसवत असल्याचे आपल्याला ऐकायला मिळतं. आताही अनेक अशी शहरं आहेत जी नदीच्या किनाऱ्यावरच वसलेली आहेत.
प्राचीन काळापासूनच मानव नदी किनाऱ्याजवळ आपलं बस्तान बसवत असल्याचे आपल्याला ऐकायला मिळतं. आताही अनेक अशी शहरं आहेत जी नदीच्या किनाऱ्यावरच वसलेली आहेत. नदी म्हटलं की, ती डोंगरदऱ्यांमधून उगम पावते आणि आपला संपूर्ण प्रवास करून समुद्राला मिळते. जवळपास सर्वच नद्यांबाबत असचं होतं परंतु, तुम्हाला माहीत आहे का? आपल्या देशामध्ये एक अशी नदी आहे जी डोंगरांमध्ये उगम पावते पण समुद्राला जाऊन मिळत नाही.
भारतातील या एकमेव नदीचं नाव आहे लूनी नदी. या नदीचा उगम राजस्थानातील अजमेर जिल्ह्यामध्ये 772 मीटर उंचावर असणाऱ्या नाग डोंगररांगामध्ये होतो. ही नदी अजमेरमध्ये उगम पावते आणि दक्षिण-पश्चिम राजस्थान नागौर, जोधपूर, पाली, बाडमेर, जालौर जिल्ह्यांमधून गुजरातच्या कच्छ जिल्ह्यामध्ये प्रवेश करते आणि कच्छच्या वाळवंटामध्ये लुप्त पावते.
काही अंतरावर नदीचं पाणी होतं खारट
लूनी नदीची एकूण लांबी 495 किलोमीटर आहे. राजस्थानमध्ये याची एकूण लांबी 330 किलोमीटर आहे. या नदीची खास गोष्ट अशी आहे की, बालोतरा म्हणजेच, बाडमेरच्या पुढे गेल्यानंतर या नदीचं पाणी खारट होतं. कारण वाळवंटामधून वाहत असताना वाळूमध्ये असलेले मीठाचे कण पाण्यामध्ये एकत्र होतात. त्यामुळे हे पाणी खारट होतं. एवढचं नाहीतर ही नदी कोणत्याही समुद्राला जाऊन मिलत नाहीतर वाळवंटामध्येच सुकून जाते. सुरुवातीला 100 किलोमीटरपर्यंत या नदीचं पाणी गोड असतं. हे पाणी राजस्थानच्या अनेक जिल्ह्यांपर्यंत पोहोचवलं जातं. त्यामुळे स्थानिक लोक या नदीची पूजा करतात.
कधी जाणं योग्य?
लूनी नदीचं सौंदर्य आणि निसर्गाचं अद्भूत दृश्य पाहण्याची उत्तम वेळ म्हणजे, पावसाळा. याव्यतिरिक्त येथे दरवर्षी मार्चमध्ये थार महोत्सवाचं आयोजन केलं जातं. राजस्थानचा जिल्हा बाडमेरची कला, संस्कृती आणि पर्यटन वाढविण्याच्या उद्देशाने या तीन दिवसांच्या महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं. या महोत्सवाला देशी आणि विदेशी पर्यटक आवर्जुन भेट देतात.
येथे मोटर बाइकिंगचाही आनंद घेऊ शकता
येथे तुम्ही मुनाबाव बॉर्डर, किराडू मंदिर, मिठाचे पिरॅमिड्स, हल्देश्वरचे डोंगर यांसारख्या प्रसिद्ध पर्यटन स्थळांना भेट देऊ शकता. तसेच तुम्ही येथे मोटर बाइकिंगचाही आनंद घेऊ शकता.