पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत हिवाळ्यात साजरे होतात अनेक महोत्सव. तुम्हाला कुठे जायचं ते ठरवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 06:47 PM2017-11-20T18:47:01+5:302017-11-20T18:56:45+5:30
हिवाळ्याच्या दिवसात देशातल्या अनेक भागांत विविध सांस्कृतिक फेस्टिव्हल्सचंही आयोजन होत असतं. या फेस्टिव्हलमधून त्या राज्याच्या संस्कृतीचं यथार्थ दर्शन घडतं. त्यामुळे एकाचवेळी ट्रिप आणि एखाद्या राज्याची जवळून ओळख करु न घेण्याची संधी कशाला सोडायची?
अमृता कदम
गुलाबी थंडी म्हणजे ट्रीप प्लॅन करण्यासाठीचा उत्तम काळ. कदाचित त्यामुळेच या काळात देशातल्या अनेक भागांत विविध सांस्कृतिक फेस्टिव्हल्सचंही आयोजन होत असतं. या फेस्टिव्हलमधून त्या राज्याच्या संस्कृतीचं यथार्थ दर्शन घडतं. त्यामुळे एकाचवेळी ट्रिप आणि एखाद्या राज्याची जवळून ओळख करु न घेण्याची संधी कशाला सोडायची? त्यामुळे डिसेंबरमध्ये होणाºया काही महत्त्वाच्या फेस्टिव्हल्सची ओळख नक्की करु न घ्या. म्हणजे त्यांना जोडूनच तुमची ट्रीप प्लॅन करणं तुम्हाला जास्त सोपं जाईल.
हॉर्निबल फेस्टिव्हल, (नागालॅण्ड)
तारीख- 1 ते 10 डिसेंबर 2017.
नागा संस्कृतीची ओळख करु न देणारा हा महोत्सव. या महोत्सवात नागालॅण्डमधल्या विविध आदिवासी जमातींना जवळून भेटण्याची संधी तुम्हाला मिळते. इथे येऊन नागा लोकांचं खाद्य चाखून पाहा, त्यांच्या संस्कृतीतली गाणी ऐकाआणि नागांच्या पारंपरिक कलेची चुणूक दाखवणा-या हजारो वस्तूंमधून तुम्हाला हवी ती वस्तू खरेदीसाठी निवडा. शिवाय सगळ्यात खास आकर्षण म्हणजे तुम्हाला या महोत्सवात पारंपरिक तिरंदाजी आणि कुस्त्यांचाही कार्यक्र म पाहायला मिळतो.
गाल्डन नामचो,( लडाख)
तारीख- 12 डिसेंबर
हा महोत्सव लेहमध्ये ‘जे त्सोंगखापा’ या बौद्ध गुरुच्या जयंतीदिवशी आयोजित केला जातो. तिबेटियन बौद्ध धर्मातले एक प्रमुख गुरु म्हणून ते ओळखले जातात. तिबेटियन बौद्धांमध्ये जेलूग पंथांची स्थापना त्यांनी केली. याच महोत्सवानं लडाखमधल्या नवीन वर्षाचीही सुरूवात होते. बौद्ध मठ आणि शहरातल्या इमारतींवर आकर्षक रोषणाई केली जाते. घरोघरी थुक्पा आणि मोमोसह पारंपरिक पदार्थांची रेलचेलही पाहायला मिळते.
पेरुमिथट्टा थारावाद कोट्टमकुझी,( केरळ)
तारीख- 6 ते 15 डिसेंबर
तब्बल 10 दिवस चालणारा हा महोत्सव केरळमधला एक प्रमुख सांस्कृतिक कार्यक्र म आहे. इथे तुम्हाला थिय्याम या केरळमधल्या लोकनृत्याच्या अनेक छटा पाहायला मिळतील. एलेयूर थिय्यम, चामुंडी थिय्यम, पंचरूला थिय्यम आणि मुथूर थिय्यम असे सगळे प्रकार या एका महोत्सवात साद होतात. कलावंत पुराणातल्या काही दैवतांचं रु प घेऊन आपली कला सादर करतात.
पौष मेला, पश्चिम बंगाल
तारीख-23 ते 26 डिसेंबर
पौष मेला हा शांतिनिकेतनचा ग्रामीण संस्कृतीचं दर्शन घडवणारा उत्सव आहे. याची सुरूवात गुरु देव रवींद्रनाथ टागोरांनीच केलेली होती. बंगालमध्ये येणा-या प्रत्येक पर्यटकाला शांतीनिकेतनच्या या उत्सवाचं आकर्षण असतं. इथे तुम्ही रवींद्रसंगीत ऐकू शकता, अनेक स्थानिक लोकनृत्याचे प्रकार पाहू शकता आणि स्थानिक हस्तकलेचे नानाविध नमुनेही खरेदी करु शकता.
हिवाळी महोत्सव, माऊंट अबू, राजस्थान
तारीख- 29, 30 डिसेंबर
माऊंट अबू हे राजस्थानातलं एकमेव थंड हवेचं ठिकाण. इथला हिवाळी महोत्सव हे दिवसेंदिवस पर्यटकांचं एक प्रमुख आकर्षण केंद्र बनत चालला आहे. राजस्थानी कलावंत त्यांच्या हस्त आणि शिल्पकलांचे नमुने दाखवण्यासाठी इथे जमतात. यासोबतच राजस्थानी लोकसंगीत ऐकण्याची इथले घुमड, गैरसारखे पारंपरिक लोकनृत्य पाहण्याची संधीही या महोत्सवात तुम्हाला मिळते.
हे सगळे महोत्सव पाहणं तर शक्य नसतं. पण यातला एखाद्या महोत्सवाला तरी आवर्जून भेट द्या.