माथेरानला पर्यटकांची गर्दी, पण मुक्काम परवडेना; वर्षाविहाराचा घेतला मनसोक्त आनंद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 06:34 AM2023-07-10T06:34:29+5:302023-07-10T06:35:06+5:30
माथेरानला येण्यासाठी नेरळ येथे टॅक्सीसाठी गेली दोन दिवस लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
माथेरान : वर्षा सहलीसाठी शनिवारी व रविवारी पर्यटक मोठ्या संख्येने बाहेर पडले. मात्र, धबधब्यांवर बंदी असल्याने मुंबई, पुण्यातील पर्यटकांनी माथेरानला पसंती दिली. त्यामुळे गेली दोन दिवस माथेरानमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी आहे. मात्र हॉटेल, लॉजचे बुकिंग संपल्याने अनेकांनी राहण्याचे दरही वाढवले होते. त्यामुळे पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली. एवढ्या पैशांत आम्ही गोव्याला जाऊन परत येऊ अशीही टिप्पणी काही पर्यटकांनी केली.
माथेरानला येण्यासाठी नेरळ येथे टॅक्सीसाठी गेली दोन दिवस लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दस्तुरी नाक्यावर खासगी वाहनांची पार्किंग व्यवस्था वनविभागाने केली होती. जवळपास सहा हजार पर्यटकांनी हजेरी लावल्याचा अंदाज आहे. त्यामुळे माथेरानला दोन दिवस जत्रेचे स्वरूप आले होते. रस्त्यावर सर्वत्र पर्यटकांची गर्दी होती. कोणी हात रिक्षा तर कोणी घोड्याचा आधार घेऊन माथेरान गाठत होते. अनेकांनी तर पायीच माथेरान गाठले. रेल्वेच्या शटल सेवेलाही मोठी गर्दी होती.
आम्ही पती-पत्नी यावर्षी पहिल्यांदाच माथेरानला वर्षा सहलीसाठी आलो. एवढी गर्दी अन्य पर्यटन ठिकाणी पाहिली नव्हती. मात्र वाहतुकीचे आणि मुक्कामाचे नियोजन न परवडणारे होते. एवढ्या खर्चात तर आम्ही विमानाने गोवा रिटर्न होऊ शकतो. त्यामुळे इच्छा असतानाही परत निघालो. मात्र खूप मजा आली. परत नक्कीच माथेरानला येऊ, पण सुट्यांच्या दिवसांत येणे टाळू. - नागार्जुन अवस्थी, पर्यटक, मुंबई
मनसोक्त भिजण्याचा आनंद
पावसाच्या रिमझिम जलधारा अंगावर झेलत पर्यटक माथेरानमधील पॉईंट्सवरील नयनरम्य देखावे न्याहाळत होते. कोणी पायी तर कुणी घोडेस्वारी, हातरिक्षांनी फिरत होते. घाटरस्त्यात असणाऱ्या धबधब्यांच्याखाली पर्यटक मनसोक्त भिजत होते. माथेरानमध्ये धबधबा नसल्याने शारलोट तलावाच्या ओसंडून वाहणाऱ्या पाण्याखाली पर्यटकांनी आनंद घेतला.
हॉटेल्स आणि लॉजिंग फुल्ल
मोठ्या प्रमाणात पर्यटक आल्याने हॉटेल्स व लॉज फुल्ल झाले होते. त्यामुळे अनेकांना मुक्काम करायचा असताना परत जावे लागले. तर अनेकांनी वाढीव दर देऊन मुक्काम केला.
व्यावसायिक समाधानी
पर्यटक मोठ्या संख्येने आल्याने स्टॉल्स धारकांसह रेस्टॉरंट, कँटीन, चिक्की, किरकोळ विक्रेत्यांचा चांगला व्यवसाय झाला. खरेदीसाठी बाजारात मोठी रेलचेल होती.