मे महिन्याचे अजूनही नऊ दिवस उरलेत. मग चार पाच दिवस धनौल्टीला जाऊन या की!
By Admin | Published: May 22, 2017 06:54 PM2017-05-22T18:54:04+5:302017-05-22T18:54:04+5:30
धनौल्टी निसर्गानं मुक्त हस्तानं सौंदर्याची उधळण केलेलं हे उत्तराखंडमधलं छोटंस हिलस्टेशन. गजबजाटापासून दूर, शांत आणि निवांतही! आवर्जून जावून यावं असचं !
-अमृता कदम
मे महिना सरत आलाय. उकाडा हळू हळू वाढतोच आहे. अजूनही कुठे जर फिरायला गेला नसाल तर एक हिल स्टेशन गाठाच. पण यासाठी आधी टूरिस्ट गाइडमधल्या हिलस्टेशन्सला फाटा द्या आणि एकदम नवीन ठिकाण एक्सप्लोअर करा. यासाठी बेस्ट आॅप्शन आहे धनौल्टी. निसर्गानं मुक्त हस्तानं सौंदर्याची उधळण केलेलं हे उत्तराखंडमधलं छोटंस हिलस्टेशन. गजबजाटापासून दूर, शांत आणि निवांतही! डेहरादूनपासून धनोल्टी दोन तासांच्या अंतरावर आहे. त्यामुळे तुम्ही डेहरादून-धनौल्टी असाही प्लॅन करु शकता. डेहरादूनहून प्रवासाला सुरूवात केल्यावर वाटेत देवदारांची गर्द झाडी धनौल्टीमध्ये तुम्हाला काय नजारा पहायला मिळणार आहे याची झलक दाखवून देतात. वाटेत लागणारी टुमदार पहाडी गावं मागे टाकत तुम्ही धनौल्टीला पोहचता. समुद्रसपाटीपासून 7500 फूट उंचावरच्या या हिलस्टेशनचं उन्हाळ्यातलं तापमान असतं 21 डिग्रीपर्यंत असतं, तर थंडीत पारा 1 अंशापर्यंत खाली उतरतो. इथे पोहचल्यावरच तुम्ही ठरवून टाका आता कसलीही घाईगडबड नाही, सारं कसं शांत अन निवांत.
सुरकंडा देवीचं मंदिर आणि इको पार्क
धनौल्टीमध्ये फिरण्यासाठी मोजकीच ठिकाणं आहेत, पण सगळीच अतिशय सुंदर. त्यांपैकीच एक म्हणजे सुरकंडा देवीचं मंदिर. आजूबाजूच्या निसर्गसौंदर्याचा आनंद घेत जायचं असेल तर सरळ पायी निघा. मंदिराकडे जाताना छोटीछोटी दुकानं लागतात. चहा-नाश्त्यापासून गढवाली आणि अन्यपद्धतीच्या कारागिरीच्या वस्तू तुम्हाला मोहात पाडू शकतात. पण इथे फार न रेंगाळता तुम्ही सरळ मंदिरात जा. या प्रशस्त, स्वच्छ आणि सुंदर मंदिरात तुम्हाला मन:शांतीचा मन:पूत अनुभव येईल, जो शहरातल्या धावपळीत सध्या मिसिंग असतो. मंदिरासोबतच इथे अजून एक खास जागा आहे ती म्हणजे इको पार्क. पंधरा एकरांच्या परिसरात पसरलेल्या पार्कमध्ये वळणावळणाच्या पायवाटा, फुलांनी डवरलेली झाडं, ध्यानधारणेसाठी काही खास पॉइंट आहेत. शिवाय मनोरंजनासाठी बर्मा ब्रिज, फ्लाइंग फॉक्ससारखी आकर्षणंही आहेत. तुम्हाला जर फोटोग्राफीची आवड असेल तर तुमच्या कॅमेऱ्याला इथे बरंच काही मिळून जाईल. इथून साधारण 200 मीटरच्याच अंतरावर अजून एक इको पार्क आहे.