विकेन्डला धमाल-मस्ती करण्यासाठी खास वन-डे डेस्टिनेशन!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2018 11:50 AM2018-06-22T11:50:12+5:302018-06-22T11:50:12+5:30
आम्ही मुंबई-ठाण्याजवळील काही खास ठिकाणांची माहिती घेऊन आलो आहोत. या ठिकाणांना भेट देऊन तुम्ही एका दिवसात परत येऊ शकता.
सध्या सगळीकडे पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. मुंबई-ठाण्यातही पाऊस सुरु आहे. त्यामुळे विकेंडला ट्रिपला जाण्याचा प्लॅन अनेकांच्या डोक्यात सुरु असेल. त्यामुळे आम्ही मुंबई-ठाण्याजवळील काही खास ठिकाणांची माहिती घेऊन आलो आहोत. या ठिकाणांना भेट देऊन तुम्ही एका दिवसात परत येऊ शकता.
१) बारवी डॅम –
ठाणे जिल्ह्यातील बदलापूर जवऴील बारवी डॅमला पावसाळ्यात फारच गर्दी असते. धरणात जायला बंदी असली तरी आजूबाजूचा परिसर पावसाळ्यात बहरून जातो. त्यामुळे पावसात तुम्ही इथे भरपूर एन्जॉय करु शकता.
2) जयसागर डॅम-
धरणाच्या भिंतीवरील पाण्यात भीजायचे असेल तर जव्हारला जायला हवे. जव्हार म्हणजे ठाणे जिल्ह्याचे महाबळेश्वरच. ठाणे ते जव्हार हे अंतर सुमारे १०० किमी आहे. पावसाळ्यात दाट धुक्यात जव्हार हरवून जातं. जव्हारला पाणी पुरवठा करणारा जयसागर डॅम पावसाळ्यात भरून वाहू लागतो.
3) पेल्हार
अहमदाबाद हायवेवर वसई विरार दरम्यान पेल्हार गाव आहे. पेल्हार गावाजवळ असलेल्या छोट्या धरणातून पाणी भरभरून वाहू लागतं. तेव्हा पर्यटकांची तेथे गर्दी उसळते. वसई-विरारहून एसटी किंवा रिक्षाने पेल्हारला जाता येतं.
4) दाभोसा धबधबा
जव्हार तालुक्यातला हा धबधबा म्हणजे पावसाळ्यात पर्यंटकांचे मोठे आकर्षण ठरले आहे. शेतमाळ, सनसेट पॉईंट, हनुमान पॉईंट, जयविलास पॅलेस अशी अनेक सौंदर्यस्थळ इथे असून रस्त्यालगत अनेक छोटे धबधबे आहेत. दाभोसा धबधबा हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असून या धबधब्यातून बाराही महिने पाणी वाहतं.
5) कुंडेश्वर धबधबा
(Image Credit : www.indiamike.com)
बदलापूर -कर्जत मुख्य महामार्गावर खरवई गावात येताच कोंडेश्वरकडे जाणारा एक मार्ग लागतो. दहिवली गावाची वेस ओलांडली की समोरं दिसतं थक्क करणारं, डोळ्यांना आणि मनालाही सुखावणारं दृश्य. डोंगर कपारीतून वाहणारे झरे, हिरव्यागार वनराजीतून फेसाळत कोसळणारे धबधबे, हिरवीगार भातशेतीची खाचरं, रिमझिमणारा पाऊस आणि दुस-या बाजुला ताठ मानेनं डौलत उभी असलेली सह्याद्रीची पर्वतरांग. सारं काही मनाचा, शरिराचा थकवा घालवणारं असंच.